Human Psychology : विवेकी विचारपद्धती म्हणजे काय?

Dr. Anand Nadkarni Article : स्वत:मध्ये काही बदल घडवायचा, नव्या कल्पना आणि तंत्रज्ञान स्वीकारायचं; तर मुळात आपल्याला आपले विचार तपासून पाहायला हवेत. त्यात यथायोग्य बदल करायला हवेत.
Human Psychology
Human Psychology Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Human Thinking : आपल्या मनात येणारे विचार विवेकी की अविवेकी हे कसं ठरवायचं? यासाठीचं एक चांगलं प्रारूप (मॉडेल) आपल्याला डॉ. अल्बर्ट एलिस यांनी दिलं आहे. डॉ. एलिस हे विसाव्या शतकातले अमेरिकेतील एक ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ. अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून त्यांनी विवेकी विचारप्रणाली (REBT – Rational Emotive Behaviour Therapy) तयार केली, त्यात कालानुरूप भर घातली. आज जगातील सार्वकालिक श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. एलीस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

स्वत:मध्ये काही बदल घडवायचा, नव्या कल्पना आणि तंत्रज्ञान स्वीकारायचं; तर मुळात आपल्याला आपले विचार तपासून पाहायला हवेत. त्यात यथायोग्य बदल करायला हवेत.

विचार म्हणजे काय हे आपण आजपर्यंतच्या भागांत पाहिलं आहे. त्याची थोडी उजळणी करूया.
- विचार म्हणजे आपल्या मनामध्ये स्वतःशी चाललेला संवाद, स्वगत म्हणजेच सेल्फ-टॉक.
- सेल्फ-टॉकचं रूपांतर टॉकमध्ये म्हणजे प्रत्यक्ष आपण काय बोलतो त्यात होतं.
- आपल्या सेल्फ टॉकमध्ये आपल्या विचारांची सूत्रे असतात.
- काही विचारांची सूत्रे मदत करणारी असतात, तर काही मदत न करणारी.
- स्वतःबद्दलचे आपले जे विचार असतात, त्या विचारसूत्राला आपण सेल्फ बिलीफ किंवा आत्मविश्‍वास/ स्व-प्रतिमा असे म्हटले.
- स्व-प्रतिमा किंवा सेल्फ बिलीफचे चार खांब आहेतः तटस्थ, भिडस्त, आग्रही/निर्धारी आणि आक्रमक.
- हे चार खांब म्हणजे आपले स्वत:कडे आणि इतरांकडे बघायचे पॅटर्न/ दृष्टिकोन होत.
हा सगळा झाला आपला विचारांबद्दलचा विचार.

Human Psychology
Human Psychology : मन म्हणजे काय?

हे विचार विवेकी की अविवेकी हे कसं ठरवायचं? यासाठीचं एक चांगलं प्रारूप (मॉडेल) आपल्याला डॉ. अल्बर्ट एलिस यांनी दिलं आहे.
डॉ. एलिस हे विसाव्या शतकातले अमेरिकेतील एक ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ. अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि संशोधनातून त्यांनी विवेकी विचारप्रणाली (REBT – Rational Emotive Behaviour Therapy) तयार केली, त्यात कालानुरूप भर घातली. आज जगातील सार्वकालिक श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. एलीस यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
काय आहे नेमकी ही विवेकी विचारप्रणाली? आणि त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा उपयोग करून घेता येईल? ते आजच्या लेखात समजून घेऊया.

विवेकी विचारप्रणाली विचारांचे विवेकी (rational thoughts) आणि अविवेकी विचार (irrational thoughts) असे वर्गीकरण करायला शिकवते.

Human Psychology
Human Psychology : आपल्या मनाचा सेल्फी

विचारांचे गुणधर्म आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी उपयोगी पडतील अशा काही चाचण्या आपण पाहूया ः
विवेकी विचार अविवेकी विचार
वास्तवाला धरून असतात. वास्तव अतिरंजित किंवा त्याचे क्षुल्लकीकरण करणारे असतात.
आरोग्याला पोषक, आरोग्यवर्धक असतात. आरोग्याला घातक असतात
ध्येयाकडे नेणारे असतात. ध्येयाकडे नेणारे नसतात
स्वस्थता देणारे असतात. अस्वस्थता वाढविणारे असतात.
नातेसंबंधांसाठी उपयोगाचे, पोषक असतात. नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करणारे असतात.
उत्पादकता वाढविणारे असतात. उत्पादकता कमी करणारे असतात
विकासाकडे नेणारे असतात. विकासात बाधा आणणारे असतात.

Human Psychology
Human Psychology : आग्रही नेतृत्व

विवेकी विचारांचे सप्तसूत्र

१) विवेकी विचार वास्तवाला धरून असतात
वास्तव म्हणजे काय? माझ्या सभोवताली मला जे दिसते, जाणवते, सर्वसाधारणपणे सगळ्यांना जसे ते दिसते, जाणवते; तसेच आपले विचार असतील तर ते वास्तवाला धरून आहेत. पण जर ते वास्तवाला अवास्तव मोठे करून पाहणारे किंवा वास्तवाचे अगदी क्षुल्लकीकरण करणारे असतील तर ते विचार अविवेकी असतात. एक उदाहरण घेऊ. समजा पावसाने ओढ दिली आहे, पाऊस आठ-दहा दिवसांनी लांबला आहे. अशा वेळी वास्तववादी विचार कुठला? तर “पाऊस यंदा आठ-दहा दिवस लांबला आहे. काय करता येईल आता, बघायला हवं!”
अतिरंजित विचार कसा असेल? “हळूहळू या आठ-दहा दिवसांचे नक्की वीस-पंचवीस दिवस होणार! हा पूर्ण महिना असाच जाणार आणि उभे पीक झोपणार आता..” हा वास्तव स्थिती सोडून केलेला कल्पनाविलास आहे. हे असं होईलच, असं काही नक्की सांगता नाही येत. म्हणून हा विचार अविवेकी आहे.
क्षुल्लकीकरण करणारा विचार म्हणजे, “येईल की, आज नाही तर उद्या नक्की येईल पाऊस. त्यात काय मोठं? बसा शांत, काही करायची गरज नाही.”
हा विचार बघाल तर तो वास्तव परिस्थितीला, समस्येला अगदीच क्षुल्लक असल्यासारखं बघणारा. पण आता पाऊस येईलच अशी काही खात्री तर देता नाही येत. आणि नाहीच आला तर काय करायचं याचा काहीच विचार नाही. असा हा विचारदेखील अविवेकी आहे.
विवेकी विचार म्हणजे असा विचार जो समोरच्या परिस्थितीकडे यथातथ्य (जशी परिस्थिती आहे तशीच) पाहतो. (आकृती २)

२) विवेकी विचार आरोग्याला पोषक असतात
मनात घोळणाऱ्या विचारांचे परिणाम शरीरावर दिसतात. उदाहरणार्थ, बँकेने कर्ज द्यायला नकार दिला की मनात येणारा विचार – ‘आता लागली का वाट! संपलं आता सगळं. काय सांगायचं घरी?’ या विचारांनंतर छातीत धडधडू लागते, दाटून आल्यासारखे होते, डोकं दुखू लागतं, झोप येईनाशी होते. एखादा विचार मनात इतका घोळत भिरभिरत राहतो, की कुठेही लक्ष लागत नाही, काम नीट होत नाही. अशा विचारामुळे टोकाचे शारीरिक परिणाम होतात. जो विचार शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पोषक नाही असा विचार विवेकी नाही, तर तो अविवेकी विचार असतो.
एखादा चांगला विचारदेखील अस्वस्थ करणारा असू शकतो. विचार सुखद किंवा दुःखद असणे हा एक भाग झाला. त्याने झोप येत नाही, मन लागत नाही; असा विचारही विवेकी नाही, अगदी चांगला वाटणारा असला तरी. ‘यंदा पीक अगदी भरघोस येणार.’ किंवा ‘मुलीचे लग्न धामधुमीत करीन मी. सगळ्या गावाने तोंडात बोट घातलं पाहिजे. तरच नावाचा मी.’ हे अनुभवायला सुखद विचार आहेत. पण या विचाराने झोप उडाली, जेवण-खाण-काम यात लक्ष लागेनासं झालं तर हा विचार विवेकी नाही.

३) विवेकी विचार ध्येयाकडे नेणारे असतात
स्वहित आणि परहित यांची सांगड घालणारे ध्येय हे विधायक ध्येय (constructive goal) असते. असे ध्येय साध्य करायला मदत करणारे विचार, प्रेरित करणारे विचार हे विवेकी विचार होत.

४) विवेकी विचार स्वस्थता देणारे असतात
विवेकी विचार आपल्या मनाला जपणारा, स्वतःबरोबरचे नाते आणि सहजता जपणारा असतो. जो विचार माझंच माझ्याशी भांडण लावून देतो, अस्वस्थता वाढवतो, तो अविवेकी विचार होय. उदाहरणार्थ, ‘माझ्यात काही कसं धड नाही बरं? साधं चार लोकांमध्ये नीट बसता-बोलतासुद्धा येत नाही मला.’ हा झाला अस्वस्थ करणारा विचार. ‘मला चारचौघांशी बोलणं, त्यांच्या बरोबर वावरणं हे शिकण्याची गरज आहे. त्यासाठी मी काय काय करू शकतो?’ हा विचार अस्वस्थ करत नाही. तो झाला विवेकी विचार.

५) विवेकी विचार नातेसंबंधांसाठी पोषक असतात
माझ्या जवळच्या नातेसंबंधांना जो विचार त्रास देतो, त्यांच्यात दुरावा निर्माण करतो, अंतर वाढवतो, संघर्ष निर्माण करतो तो विचार विवेकी नसतो. आपल्या नातेसंबंधांमधले संघर्ष आटोक्यात ठेवण्यास व ते सुधारण्यास अथवा मजबूत बनवण्यास मदत करणारे विचार म्हणजे विवेकी विचार.

६) विवेकी विचार उत्पादकता वाढविणारा असतो
माझी माझ्या क्षेत्रातील उत्पादकता वाढविणारा विचार म्हणजे विवेकी विचार. उदाहरणार्थ, मला शेतीचे उत्पादन वाढवायचे आहे म्हणून मी विचार करायला लागलो, की मी काय काय नवीन नवीन प्रयोग करून बघू शकतो; ज्याने उत्पादन वाढायला मदत होऊ शकते? असा मनात येणारा विचार विवेकी विचार होय.

७) विवेकी विचार विकासाकडे नेणारा असतो
विवेकी विचार आपल्या ज्ञानात भर पाडणारा, आपल्या व इतरांच्या विकासाकडे नेणारा असतो.

असे विवेकी विचार करायला मदत करणारं एखादं यंत्र आपल्याला मिळालं तर? अशाच एका यंत्राची ओळख आपण पुढील लेखात करून घेऊया.

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=erDf-PAaJrU

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com