
Palghar News : पावसाळा सुरू झाल्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड होतात आणि त्याचा थेट परिणाम हा रहिवाशांवर होतो. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून वीज खंडित होत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातून वितरित केले जाणारे पिण्याचे पाणी पुढील चार दिवस शहराला कमी दाबाने, तसेच अनियमित पुरवठा होणार असल्याने नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
वसई-विरार शहरात उभी राहणारी गृहसंकुले पाहता पाण्याची गरज अधिक निर्माण होऊ लागली आहे; परंतु त्यामानाने पाण्याची कमतरता आहे. उन्हाळ्यात पाण्याची झळ सोसावी लागते, तर आता जोरदार पाऊस, वारा अशा कारणाने तांत्रिक बिघाड होत असून वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे.
वसई-विरार महापालिकेला सूर्या टप्पा एक व तीन या योजनेतून २०० द.ल.लि. प्रतिदिन पाणी उपलब्ध होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या ४०३ द.ल.लि. पाणीपुरवठा योजनेतून १५० द.ल.लि. प्रतिदिन पाणी उपलब्ध होते; मात्र एमएमआरडीएच्या पाणीपुरवठा योजनेतील कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्यानगर जलशुद्धीकरण केंद्र येथे महावितरणमार्फत वीजपुरवठा होतो.
या परिसरात १३ जूनपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत असल्याने विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडून योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सूर्या योजनेतील मासवण आणि धुकटण येथे हीच परिस्थिती आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
एकीकडे वाढते नागरीकरण, नवीन जोडण्या, जलवाहिनीला गळती, तांत्रिक बिघाडामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच पावसाळ्यातदेखील अशीच परिस्थिती उद्भवल्याने प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
पाणी जपून वापरावे!
वसई-विरार महापालिका क्षेत्रात पुढील चार दिवस पाणीपुरवठा हा अपुऱ्या व कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे महापालिकेचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी आवाहन केले आहे.
‘पाणी उकळून प्या’
वसई-विरार महापालिकेला पेल्हार, उसगाव व सूर्या टप्पा एक व सूर्या टप्पा तीन, तसेच एमएमआरडीएच्या सूर्या ४०३ द.ल.लि. योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आता पावसाळा सुरू झाला असून जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पावसाळ्यात पाणी गाळून, उकळवून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे नुकसान
विरार (बातमीदार) : गेल्या दोन दिवसांपासून वसईमध्ये वादळी वारा आणि पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्याचे समोर आले आहे. विरारजवळील वैदोडी गावात एक झाड विजेच्या तारेवर पडल्याचे नागरिकांना दिसले. बविआचे माजी नगरसेवक मार्शल लोपीस यांना ही घटना कळवताच त्यांनी तातडीने वसई विरार महापालिकेशी संपर्क करून कर्मचाऱ्यांच्या मदतीने मॅक लिफ्ट गाडी मागवून झाड कापून घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.