सतीश खाडे
Importance of Water Management : आपण एक कप कॉफी पितो. एका कपात साधारण १०० मि.लि. द्रवपदार्थ असतो. या शंभर मि.लि. द्रवपदार्थाच्या निर्मितीचा विचार केला तर त्याला किती पाणी लागते सांगता येईल? उत्तर ऐकून चकित व्हाल, कारण तब्बल १४० लिटर एवढे पाणी लागते. का लागेल बरं इतकं पाणी? अहो, त्यात दोन चमचे साखर, एक चमचा काॅफी पावडर आणि दहा चमचे दूध असते.
आता ज्या उसापासून साखर बनते, त्या उसाला लागणारे पाणी, पुढे त्यापासून कारखान्यात साखर निर्मितीसाठी लागणारे पाणी, काॅफीच्या झाडाला लागणारे पाणी, काॅफी बीची पावडर बनवण्याच्या प्रक्रियेत लागणारे पाणी, तसेच दुधासाठी गाय वा म्हशीने प्यायलेले पाणी, त्यांच्या चाऱ्यासाठी लागलेले पाणी, त्यांच्या स्वच्छतेसाठी लागलेले पाणी, दूध प्रक्रियेसाठी लागलेले पाणी या सर्वांचा हिशेब लावला की तो येतो १४० लिटरपर्यंत! याला म्हणतात अप्रत्यक्ष पाणी वापर.
निसर्गात असो वा कारखान्यात वा अन्यत्र कुठेही बनणाऱ्या उत्पादनाला पाणी हे लागतेच. पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्याच गोष्टींसाठी पाण्याचे हे गणित मांडता येते. याची अजून काही उदाहरणे पाहू म्हणजे अप्रत्यक्ष पाणी वापराची संकल्पना स्पष्ट होऊन जाईल.
एक किलो भाजीपाल्यासाठी ३५० लिटर पाणी लागते. एक किलो चिकनसाठी साडेचार हजार लिटर, तर एक किलो मटणासाठी साडेआठ हजार लिटर पाणी लागते. एक किलो बीफसाठी साडेपंधरा हजार लिटर पाणी निसर्गातून खर्च होते. (बीफ उत्पादन व निर्यातीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. म्हणजे आपण बीफवाटे किती पाणी निर्यात करतो ते काढता येईल.) एका सुती
शर्टसाठी ४००० लिटर, तर एका जीन्स पॅन्टसाठी साडेदहा हजार लिटर पाणी लागते. अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन वा वस्तूंसाठी लागणाऱ्या पाण्याला व पाणी वापराला अप्रत्यक्ष पाणी वापर असे म्हटले जाते. ते ‘जलपदचिन्ह’(Water footprint) या संकल्पनेअंतर्गत नोंदवले जाते. १९९३ मध्ये ‘आभासी पाणी’ किंवा ‘जलपदचिन्ह’ (वॉटर फूट प्रिंट) ही संकल्पना लंडन येथील किंग्ज कॉलेजचे प्राध्यापक जॉन अँथनी ॲलन यांनी सर्वप्रथम मांडली.
वस्तू आणि पाणी वापर
आपल्या आयुष्यात दैनंदिन व नित्य गरजेच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या घटकांसाठी अप्रत्यक्ष पाणी लागतेच. पण त्याहीपेक्षा अनावश्यक, निरर्थक किंवा केवळ फॅशन वा प्रतिष्ठा, स्पर्धा यातून घेतलेल्या वस्तूंसाठी अधिक पाणी लागते. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केला कोट्यवधी लोक किती पाणी वापरतात, याची आकडेवारी काढू गेल्यास तो प्रचंड मोठा होतो. त्याही पुढे जाऊन या वस्तूंचा वापर केल्यानंतर शिल्लक राहणारे टाकाऊ घटक किंवा कचरा जमिनीमध्ये, पाण्यात
जाऊन किती नुकसान करतात, तो हिशेब तर त्याहून मोठा होतो. (तो जलपदचिन्हात धरत नाहीत, हे नशीब!)
गेल्या ५०-६० वर्षांत जगभरात सर्वत्रच जीवनशैली खूप झपाट्याने बदलली असून, दिवसागणिक बदलतच आहे. गेल्या काही वर्षांत जीवनशैली बदलण्याचा वेगही खूप वाढला आहे. पूर्वी कालची फॅशन आज जुनी होते आणि उद्या टाकाऊ ठरते. पण आता रोज वापरांच्या वस्तूंबाबतही हीच बाब घडताना दिसत नाही. अगदी पंचवीसच वर्षांपूर्वी बांधलेले घरही जुने म्हणून पाडून परत नवीन बांधणारे लोक दिसून लागले आहेत.
म्हणजे साध्या साध्या गोष्टी टाकून देण्यामध्ये हे लोक किती आघाडीवर असतील, याचा विचारच करता येत नाही. त्यातच मार्केटिंगच्या वापरा आणि फेकून द्या (यूज ॲण्ड थ्रो) या गिमिकमुळे त्यासाठीचा पाणी वापर आणि कचऱ्यामध्ये मोठी वाढ होत आहे. आपल्याला खरंच आवश्यक वस्तू कोणत्या आहेत?
याऐवजी प्रतिष्ठेसाठी काही वस्तूंची खरेदी, दुसऱ्याकडे आहे म्हणून माझ्याकडे हवे यातून होणारी खरेदी आणि आजकाल तर कंटाळा आला म्हणून खरेदी करणाऱ्यांचा तथाकथित नवश्रीमंताचा वर्ग तयार झाला आहे. त्यात तर आणखी वेगळीच गडबड आहे. कुणाकडे पैसा आहे म्हणून खरेदी करतो, तर एखादा पैसा नसताना कर्ज काढून, हप्त्यांवर (ईएमआयवर) खरेदी करत सुटतो.
यातील प्रत्येक वस्तू निर्मितीसाठी वरील उदाहरणाप्रमाणे किती पाणी लागते, याचा हिशेब केला तर आपली अनावश्यक खरेदी ही पृथ्वीवरील अनावश्यक पाणी वापराशी जोडता येईल. शेवटी त्याचा संबंध प्रथम पाण्याच्या कमतरतेशी आणि नंतर पृथ्वीवरील पाणी संपण्याची जोडता येईल.
गेल्या ७० वर्षांत भारताची आणि जगाची लोकसंख्या तिपटीहून अधिक वाढली आहे. पण आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे पाणी वापर चक्क सहा पटीने वाढला आहे. त्यातही गेल्या ७० वर्षांत पाण्याची मागणी एकूण १८ पटीने वाढली आहे. सांगा, कसं पुरायचं पाणी?
जलपदचिन्ह संकल्पनेचा वापर करून शेती, निसर्गातून मिळणाऱ्या अन्नधान्यापासून औद्योगिक उत्पादनापर्यंत अनेक गोष्टींचा पाणी वापर काढता येतो. एखाद्या राष्ट्राचा देखील संपूर्ण पाणी वापर काढता येतो. पुढे राष्ट्राच्या पाणी वापरावरून दरडोई अप्रत्यक्ष पाणी वापरही काढला जातो. प्रगत राष्ट्रे प्रत्यक्ष पाणी वापर योग्यपणे करत असले तरी त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांचा अप्रत्यक्ष पाणी वापर अफाट आहे.
एका आकडेवारीनुसार प्रगत राष्ट्रांचा दरडोई प्रतिदिन अप्रत्यक्ष पाणी वापर साडेदहा हजार लिटर आहे. तर आफ्रिकन गरीब राष्ट्रांचा वापर अडीच हजार लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती इतका आहे. आपल्यासारख्या विकसनशील देशातही तो आकडा सहा हजार लिटर प्रति दिन प्रति व्यक्ती इतका आहे. अर्थात, ग्रामीण -शहरी, श्रीमंत- गरीब यावर आधारित पाणी वापरात तफावत निश्चितच आहे.
काही जागरूक देश त्यांच्या देशातले पाणी सुरक्षित राहावे म्हणून जास्त पाणी लागणारी नैसर्गिक व कारखान्यातील उत्पादने दुसऱ्या देशातून आयात करतात. त्यासाठी आवश्यक ती धोरणे आखून जलपद चिन्हाच्या आधारे निर्णय घेतात. अन्य विकसनशील राष्ट्रांमध्ये या संकल्पनेचा त्यांच्या जलव्यवस्थापनामध्ये वापर करू लागले आहेत. आता पुढील लेखामध्ये जलपदचिन्ह आणि त्यावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, याची माहिती घेणार आहोत.
- सतीश खाडे, ९८२३०३०२१८
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.