Nagar News : साधारण एक महिन्यानंतर पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी संगमनेर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रोजच उन्हाचा तडाखा वाढत असल्याने ३३ गावे, १६ गावठाणांसह १०७ वाड्या-वस्त्यांवरील ४८ हजार ३४८ लोकसंख्येला रोज २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे व वरिष्ठ सहायक तथा टंचाई कक्षप्रमुख संजय अरगडे यांनी दिली.
गेल्या वर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नसल्याने उन्हाळ्याच्या तोंडावर अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्याचे स्रोत भरले नसल्याने वर्षभराचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे शेतीलाही मोठा फटका बसला. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाणी देणेही मुश्कील झाले. त्यामुळे दैनंदिन जीवनमानावरच परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले. आजमितीला २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे.
सर्वाधिक पठारभागातील गावांचा समावेश आहे. नव्याने सावरगाव घुले गावठाण आणि वनकुटे गावासह तीन वाड्यांना टँकर मंजूर झाले आहेत. यावरून अजूनही टंचाईची दाहकता असल्याचे दिसून येते. जून महिन्यातील १२ ते १३ तारखेला मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. याशिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस होणार असल्याचेही सांगितले. तोपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावाच लागणार आहे.
संगमनेर तालुक्यातील गावे
सध्या पानोडी, खरशिंदे, कुंभारवाडी, सोनोशी, सायखिंडी, खंडेरायवाडी, हिवरगाव पठार, काकडवाडी, कर्जुले पठार, पोखरी बाळेश्वर, चिकणी, पिंपळगाव देपा, डोळासणे, शेंडेवाडी, बिरेवाडी, चौधरवाडी, नांदूर खंदरमाळ, पेमरेवाडी, पारेगाव बुद्रुक, दरेवाडी, नान्नज दुमाला, पारेगाव खुर्द, चिंचोली गुरव, निमोण, जांभूळवाडी, कौठे मलकापूर, खांबे, सावरगाव घुले, मालदाड, माळेगाव पठार, साकूर या गावांतील १०७ वाड्या-वस्त्यांवरील ४८ हजार ३४८ लोकसंख्येला पाणी पुरवठा केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.