
Jalgaon water Update : खानदेशात जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. जलसाठा एकूण २४ टक्के एवढा आहे. जळगावसाठी वरदान असलेल्या सर्वांत मोठ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा सुमारे २७ टक्के एवढा आहे.
गिरणा धरण नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नाशिकमधील नांदगाव जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. पण त्याचा अधिकचा लाभ जळगाव जिल्ह्यात होतो.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव एरंडोल या भागात या धरणाचे पाणी पोहोचते. धरणातून तीन वेळेस पाण्याचे पिकांसाठी आवर्तन देण्यात आले. तसेच तीन वेळे नदीत टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले. या धरणाची एकूण क्षमता १८ टीएमसी आहे.
मागील चार वर्षे हे धरण १०० टक्के भरले आहे. त्यात जलसाठा मुबलक असतो. परंतु कृषीसह पिण्याच्या पाण्यासाठी नाशिकमधील मनमाड, जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या शहरांसाठीदेखील पाणी द्यावे लागते. तसेच टंचाई निवारणार्थ नोव्हेंबर ते मे या कालावधीत पाच वेळेस नदीत पाणी सोडावे लागते. यामुळे या धरणातील जलसाठा झपाट्याने घटला आहे.
जळगाव जिल्ह्यात गिरणा पट्ट्यात किंवा पश्चिम भागात बहुळा, मन्याड, अंजनी, बोरी, अग्नावती हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. फक्त भोकरबारी प्रकल्प १०० टक्के भरला नव्हता. या प्रकल्पांतील साठाही ३५ टक्क्यांखाली आहे.
तसेच सातपुड्यालगत जळगावमधील रावेरातील मंगरूळ, अभोरा व सुकी मध्यम प्रकल्पांसह यावलमधील गारबर्डी हा लघु आणि मोर नदीवरील मोर हा मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. त्यातील साठाही ३० टक्क्यांपर्यंत आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पातील जलसाठाही ३० टक्क्यांवर आहे.
धुळ्यातील अनेर, पांझरा, बुराई हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यातही जलसाठा ३० टक्केच आहे. नंदुरबारमधील दरा, सुसरी प्रकल्पातील जलसाठाही २८ टक्के एवढा असल्याची माहिती मिळाली.
हतनूर, वाघूर प्रकल्पातील साठाही कमी
जळगाव जिल्ह्यात महत्त्वाच्या मध्यम प्रकल्पांतील तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) नजीकच्या हतनूर आणि जामनेरातील वाघूर नदीवरील वाघूर प्रकल्पातील जलसाठाही घटला असून २४ टक्क्यांपर्यंत आला आहे. तर हतनूर प्रकल्पातील साठाही १८ टक्केच आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.