Team Agrowon
सांगलीत गेल्या आठवडाभरापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. तर उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी तालुक्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे.
तालुक्यात टंचाईचे सावट दिसू लागले आहे. तर जलसंपदा विभागाने टेंभू व ताकारी सिंचन विभागाने आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावीत व आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
विहिरींनी तळ गाठला असून अनेक विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत. तर तालुक्यातील तलावांची पाण्याची पातळी निम्म्यापेक्षा कमी झाली आहे.
जुना चिखली रस्ता ते कडेपूर रस्ता परिसरात व अन्य भागात पाणी टंचाई भासू लागली आहे. या परिसरासह तालुक्यातील पूर्व भागात अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत.
गतवर्षीपेक्षा यावर्षी कडक उन्हाळा असणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहेत.
दिवसेंदिवस तापमान वाढू लागले असून उन्हाच्या तीव्र झळांनी लोक हैराण होऊ लागले आहेत. पाण्याची पातळी खलावल्याने शेती पिकावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे.
पाण्याअभावी ऊस पिकासह अन्य बागायत पिके वाळू जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
तालुक्यातील टेंभूच्या अखत्यारित असलेले कडेगाव, शाळगाव, हिंगणगाव, शिवाजीनगर, कोतीज, करांडेवाडी या सहा तलावांपैकी टेंभूचे अनुक्रमे शिवाजीनगर व हिंगणगाव हे दोन टप्पे असल्याने या दोन्ही तलावांत सध्या मुबलक पाणी आहे.