संदीप नवले
Dam Water Shortage : तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यात पाण्याचे बाष्पीभवन आणि पाणी वापरही वाढल्याने ५० हून अधिक धरणांनी तळ गाठला आहे. विशेषतः बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बुलडाणा जिल्ह्यांतील धरणांचा यामध्ये समावेश असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पाणीटंचाईची चांगलीच झळ बसू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांत (मार्च आणि एप्रिल) पाण्याचा वापर सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे मे अखेरीस जलसाठा २२.६४ टक्क्यांवर आला असून, तो आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मिळून एकूण २ हजार ९९४ एवढी धरणे आहेत. यंदा मार्च, एप्रिल आणि आता मे मध्ये तीव्र उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे धरणांचा पाणीसाठा अतिशय वेगाने कमी होऊ लागला आहे.
गतवर्षी याच महिन्यात ३१.८१ टक्के असलेला पाणीसाठा या वर्षी ३२३ टीएमसी म्हणजेच २२.६४ टक्क्यांवर आला आहे. सुमारे ९.१७ टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. पाण्याची स्थिती एकूणच अत्यंत गंभीर बनली असून, उरलेल्या धरणांमधील पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
मागील वर्षी ऐन पावसाळ्यात मोजकेच दिवस पाऊस पडला. त्यातही मराठवाड्यात पावसाने अत्यंत कमी प्रमाणात हजेरी लावली. कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्यांतील धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे संपलेला आहे. कायम सधन आणि पाण्याखालचा प्रदेश असलेल्या पुणे विभागात मागील वर्षी पावसाने ओढ दिली.
त्यामुळे या विभागातील पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाण्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातही उजनी धरणाचा पाणीसाठा खालावल्याने सोलापूर जिल्ह्यातील भागांनाही पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यांतील स्थितीदेखील बिकट झाली आहे. नागपूर आणि अमरावती विभागात राज्यातील इतर विभागांपेक्षा काही प्रमाणात मोठा पाणीसाठा असलेली धरणे आहेत.
मात्र कमी पावसामुळे याही भागातील धरणे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत देखील भरली नाहीत. त्याचा फटका आता बसू लागला आहे. या भागातील धरणांमधील पाणीसाठा ४० टक्क्यांच्याही खाली गेला आहे. कोकण विभागातही धरणांमधील पाणीसाठादेखील खालावलेला आहे. त्यामुळे जलस्थिती गंभीर झाली आहे.
राज्यातील विभागनिहाय धरणसाठा (टीएमसीमध्ये)
विभाग --- पाणीसाठा --- टक्केवारी
नागपूर -- ६२.४७ -- ३८.४१
अमरावती -- ५२.०१ -- ३८.९६
छत्रपती संभाजीनगर -- २३.२२ --- ९.०६
नाशिक -- ५१.३४ -- २४.५०
पुणे --- ८७.७२ --- १६.३५
कोकण --- ४६.९२ -- ३५.८८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.