
Satara Water News : दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळून गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या घटना टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे आवश्यक असते.
त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी २० जूनपर्यंत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
दर वर्षी पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथरोगाच्या घटना घडत असल्याचे दिसून येत. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
त्यासाठी पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणीपुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटुंबे आदी स्रोतांचे पाणी नमुने रासायनिक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने गुणवत्ता पोर्टलवर युआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात येतील.
संबंधित पाणी गुणवत्ता तपासणी अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी हे संनियंत्रण करत आहेत. रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने घेताना मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या स्रोतांतून व योजना नसल्यास पिण्याच्या पाण्याच्या वापरात असलेल्या स्रोतांमधून घ्यायचे आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जलसुरक्षक व आरोग्यसेवक यांनी संयुक्तपणे पाणी नमुने गोळा करणे, त्याच्या नमुना आयडी क्रमांकासह जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत.
तपासणीचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील ११ तालुक्यांत पाणीपुरवठा योजना, शाळा व अंगणवाडीचे मॉन्सूनपूर्व रासायनिक तपासणीचे एकूण उद्दिष्ट पाच हजार १५ आहे. यात जावळी ३३३, कऱ्हाड ६३२, खंडाळा २०९, खटाव ५४२, कोरेगाव ३७१, महाबळेश्वर २५७, माण ३२६, पाटण ९०९, फलटण ५०२, सातारा ६८७, वाई ३३७ असे उद्दिष्ट आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.