Dharashiv News : उन्हाची तीव्रता जशी वाढू लागली तशी तालुक्यात पाणीटंचाई उग्ररूप धारण केले आहे. सर्वच ठिकाणचे जलस्त्रोत आटल्याने तालुक्यात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात मार्च महिन्याच्या मध्यातच पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत टंचाईग्रस्त २५ गावांना अधिग्रहण केलेल्या ६१ विंधन विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे.
अवर्षणग्रस्त म्हणून लोहारा तालुक्याची ओळख आहे. नेहमीच सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमीच असते. त्यामुळे दरवर्षी पाचवीला पूजलेल्या जल संकटाला येथील नागरिकांना तोंड द्यावे लागते. परंतु, मागील सलग तीन वर्ष सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने टंचाईपासून सुटका झाली होती. मात्र, यंदा सुरवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली.
पावसाळ्यात आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही. परिणामी तालुक्यात धरण, तलाव, विहिरीमध्ये आवश्यक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील काही गावांमध्ये हिवाळ्यातच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तालुका प्रशासनाला विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा लागला. सध्या उन्हाच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणात भाष्पीभवन होत असल्याने बहुतांश जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत.
नऊ विहिरी पाण्याअभावी बंद
टंचाईग्रस्त गावांसाठी दोन महिन्यापूर्वी अधिग्रहण केलेल्या जवळपास नऊ विंधन विहिरी पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. परिसरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी पाण्याची पर्यायी व्यस्था करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. सालेगाव, वडगाव, होळी तोरंबा, सालेगाव, जेवळी, होळी, सास्तूर या गावांसह उर्वरित गावांमध्येही अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नोकरी, काम धंद्यावर पाणी सोडून हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. सद्य स्थितीत तालुक्यातील २५ गावांमध्ये ६१ विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.
अधिग्रहणाचे आलेले प्रस्ताव
सास्तूर, तावशीगड, बेंडकाळ, मार्डी, कानेगाव, लोहारा (खुर्द) या ग्रामपंचायतीने प्रत्येकी एक विंधन विहिर तर सालेगाव २ अधिग्रहणाचे आलेले प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत. तर जेवळी, दक्षिण जेवळी तोरंबा येथून ६ विंधन विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.
या गावांनी केली टँकरची मागणी
तालुक्यातील सास्तूर, वडगाव, सालेगाव या तीन ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. येथील पाण्याचे स्त्रोत बंद पडले असल्याने या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.