Kolhapur News : संभाव्य पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली असून त्याचा पहिला फटका यंदा उन्हाळी भाजीपाल्याला बसणार असल्याचे निश्चित होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये भाजीपाला रोपांची मागणी तब्बल ५० टक्क्यांनी घटली आहे. रोपवाटिका चालकांनी सावधगिरी बाळगताना मागणी आल्यानंतरच रोपे तयार करण्याला प्राधान्य दिले आहे.
अनेक नद्यांवर उपसाबंदी घालण्यात येत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनीही भाजीपाला लागवडीकडे यंदा दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दरवर्षी असणारे बागायती पट्टेही यंदा पाणीटंचाईने हबकले आहेत. ज्यांच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत आहे व तो पुढील दोन-तीन महिना पुरेल याची खात्री आहे, अशाच शेतकऱ्यांकडून भाजीपाला लागवडीला प्राधान्य देण्यात देत आहे. यामध्येही अन्य भाजीपाल्याच्या तुलनेत फ्लॉवर व टोमॅटोलाच अधिक मागणी असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.
वर्षाच्या इतर हंगामांच्या तुलनेत उन्हाळी महिन्यात भाजीपाल्याला मागणी व दर जास्त असतो. एप्रिल व मेमध्ये भाजीपाला बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. यामुळे फेब्रुवारी व मार्चमध्ये रोपांची मागणी अधिक असते. यंदा मात्र गेल्या दोन महिन्यांपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक ठिकाणी जलस्रोतही आटले आहेत. भाजीपाल्याला पाणी पुरेसे होईल याची खात्री शेतकऱ्यांना नाही. सध्या पाणी असले तरी ते पुढील दोन महिने ते टिकण्याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीचा बेत पुढे ढकलला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रोपवाटिकांकडे राज्यभरातील शेतकरी भाजीपाला रोपांची मागणी नोंदवतात. रोपवाटिका चालक मागणीपूर्वीच रोपे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देत असतात. यंदा मात्र तयार केलेली रोपे पडून राहून नुकसान होऊ नये यासाठी रोपवाटिका चालक नोंदणी घेतल्यानंतर एक महिन्यात तयार करून देत आहेत. या अगोदर नाममात्र रक्कम देऊन नोंदणी केली जायची.
शेतकऱ्यांनी ऐनवेळी नोंदणी रद्द केल्यास त्याचा फटका रोपवाटिका चालकांना बसत होता. शेतकऱ्यांनी नोंदणी रद्द करू नये यासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम घेऊनच रोपांची मागणी घेतली जात असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.