Nashik News : कसमादे भागातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नद्या व कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी वाढणार आहे. चणकापूर उजव्या वाढीव कालव्याला पाणी सोडावे यासाठी तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेने बैठका घेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देत जनरेटा वाढवला.
इतर भागांतही पाणीपुरवठा व शेतीसाठी आतापासूनच पाण्याची मागणी होऊ लागली आहे. नद्या, धरणे, तलाव कोरडे पडल्याने पाण्यासाठी ‘तूतू-मैमै’ होऊ लागल्याने पाण्यावरून नजीकच्या काळात मतभेदाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार हे नक्की!. दुसरीकडे प्रशासनाने यातून मार्ग काढत वेळीच नियोजन, उपाययोजना करण्याची गरज आहे.
कसमादेचा पूर्व भाग जलसिंचनाच्या दृष्टीने तसा तहानलेलाच आहे. गिरणा, आरम, मोसम नद्यांसह काही कालव्यांमुळे काही भागाची तहान भागत असली तरी इतर भाग तहानलेलाच आहे.
यावर्षी कसमादे भागात पुरेसा पाऊस न झाल्याने येथील छोटी-मोठी धरणे, नद्या, तलाव कोरडेच आहेत. परिणामी वर उल्लेख केलेल्या नद्या व कालवे यातून जे पाणी मिळेल तेवढीच आशा उरली आहे.
यामुळे आगामी काळात सगळ्यांना पिण्यासाठी असो की शेतीसाठी पाणी पुरवणे अवघड जाणार आहे. त्यातच आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने या पाणीप्रश्नाबाबत उमेदवारांना व नेत्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.
कसमादेतील चणकापूर, पुनंद, हरणबारी, केळझर या धरणांतून पाण्याचा प्रामुख्याने पुरवठा होतो. परंतु या धरणांतील पाणीसाठा मर्यादित असल्याने संपूर्ण कसमादेला पाणीपुरवठा करण्यास मर्यादा पडतात. यामुळे पाण्यावरून गावागावांत वाद होण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी या भागाला पाणीपुरवठ्याचा नवीन सक्षम पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. सुरगाणामधील पावसाचे वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्याद्वारे अडवून ते गिरणा खोऱ्यात वळविण्याची गरज आहे.
हक्काचे पाणी मिळवण्यासाठी व कसमादेसह नांदगाव, सुरगाणा व इतर परिसराला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी वांजुळपाणी संघर्ष समिती गेल्या सात-आठ वर्षांपासून शासनदरबारी व जनतेत आवाज उठवत आहे.
नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्य शासनाच्या ८ हजार कोटींच्या निधीतून मान्यता देण्याचे सूतोवाच मागेच झाले होते, त्याबाबतच्या कामाकडेही जनता आस लावून आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काळात पाण्यावरून बिकट प्रसंग उद्भविण्याची शक्यता वाढली आहे.
कालव्यांची वहनक्षमता घटली
कसमादेतील कालवे पाणी वाहून नेत असले तरी यातील काही कालव्यांची वहनक्षमता अत्यंत कमी आहे. ती वाढवणे गरजेचे आहे. चणकापूर उजवा कालव्याची मंजूर वहनक्षमता १७३ क्युसेक आहे, परंतु प्रत्यक्षात ती तेवढी नसल्याने ९० ते ११० इतकेच क्युसेक पाणी सोडले जाते.
त्यातही गळती आणि चोरी अडवणे हे एक कठीण काम त्यामुळे रामेश्वर धरणापर्यंत ते ४० ते ६० क्युसेक इतकेच जेमतेम पाणी पोहोचते. या कालव्याची वहनक्षमता ३०० क्युसेक केल्यास पावसाळ्यातील पूरपाण्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होईल.
यावर्षी पन्नास हजार क्सुसेकपेक्षा जास्त पूरपाणी गिरणा धरणात वाहून गेले. कालवे मोठे असते तर हे सर्व पाणी वळविता आले असते. गिरणा उजव्या कालव्याची वहनक्षमता सुरुवातीला २६६ क्युसेक आहे, मात्र तेही शेवटी कमीच पोहोचते.
कसमादेतील प्रमुख कालवे
कळवण चणकापूर उजवा कालवा, सुळे डावा, सुळे उजवा
देवळा चणकापूर उजवा व वाढीव कालवा, गिरणा उजवा कालवा
सटाणा हरणबारी उजवा व डावा कालवा, गिरणा डावा कालवा, केळझर डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा.
मालेगाव मोसमसाळ कालवा, १८ बंधाऱ्यांचे कालवे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.