Beed News : गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात आगामी काळात चारा- पाणी टंचाईचे संकट उभा राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाणी संकट गडद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १४३ लहान- मोठ्या धरणांमध्ये केवळ १८.७२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता अधिक राहिली तर फेब्रुवारी अखेरपर्यंत पाणीसाठा तळ गाठू शकतो. शिरूर, बीड व माजलगाव तालुक्यात जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान पाणी संकट गडद होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने उपाय योजनांना सुरवात केली आहे. अंबाजोगाई, परळी, गेवराई, धारूर, केज व आष्टी या तालुक्यांत जून- जुलैपर्यंत पाणीटंचाई होणार नाही, अशी शक्यता आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील चार तालुक्यांत १८ विहिरी- बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे. मार्च महिन्यानंतर पाणी स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात या वर्षी ७२ टक्के पावसाची नोंद असली तर प्रत्यक्षात पाणीसाठा झालेला नाही. यंदा एकही मोठा पाऊस न झाल्याने नद्यांतून पाणी वाहिले नाही व जलस्त्रोतांतील पाणी वाढले नाही. जून महिन्यात पावसाने दडी मारली, तर जुलै महिन्याच्या शेवटी बऱ्यापैकी पाऊस झाला होता.
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी या पिकांचा उतारा घटला आहे. इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. तर, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला.
अवकाळी पाऊस झाला नसता तर शेतकऱ्यांच्या हातून रब्बीची पिके गेली असती. आता ग्रामीण भागात ज्वारी बहरली आहे. आतापर्यंत पाण्याचे संकट शेतकऱ्यांपर्यंत होते; परंतु आता धरणे आटू लागली असल्याने चिंता वाढत आहे. त्याच प्रशासनाचा फेब्रुवारीअखेरपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज आहे.
प्रशासनाचा अंदाज
(पाणी पुरेल)
बीड : फेब्रुवारी
अंबाजोगाई : जून
परळी : जून
गेवराई : जून
माजलगाव : फेब्रुवारी
धारूर : जुलै
केज : जुलै
आष्टी : जुलै
पाटोदा : एप्रिल
शिरूर : जानेवारी
वडवणी : मे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.