
Jalgaon News : पावसाळा शेतकऱ्यांसाठी चिंता करणारा ठरत आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले, पण खानदेशात अद्याप मोठ्या प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पावसाची टक्केवारी मात्र ७४ पर्यंत आहे. अपवाद वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नसल्याने समस्या वाढल्या आहेत.
आतापर्यंत ७४.२ टक्के सरासरी पाऊस झाल्याची आकडेवारी असली, तरी शेतातील पिकांची उंची एक फुटापेक्षा अधिक नाही. दरम्यान, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यांत अद्यापही १२ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जळगाव शहरासह जिल्ह्यातही काही ठिकाणी पाणी कपात केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुळ्यातील पांझरा वगळता प्रमुख पाच प्रकल्पांत जलसाठा नाही. नंदुरबारातही दरा व देहली प्रकल्प भरले. इतर प्रकल्प रिकामे आहेत. नंदुरबारनजीकचा तलावही कोरडाच आहे.
२५ जूनपर्यंत ‘अल निनो’ने पावसाची वाट अडविली. नंतर मात्र चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. सध्या पाऊस खंडीत स्वरूपात व कमी प्रमाणात आहे. तोच पाऊस दमदार झाला आणि उघडीप मिळत गेली. परत पाऊस पडत गेला, तरच यंदाचा हंगाम तरेल असे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४.२ टक्के सरासरी पाऊस झाला. सर्वाधिक १११.१ टक्के पाऊस रावेरला, तर त्यापाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात १०९ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत सरासरी ५० ते ८५ टक्के दरम्यान राहिला. आगामी काळात पावसाने तूट भरून काढल्यास खरीप हंगामही चांगला येईल आणि पाणीटंचाई होणार नाही, असा अनुभव प्रशासन विभागाच्या सूत्रांनी सांगितला.
जामनेर तालुक्यात मोरगाव, रोटवद, जळांद्री बुद्रुक, सोनारी, करमाड या पाच गावांना, चाळीसगाव तालुक्यातील मोजे पिंपळगाव, विसापूर तांडा, अंधारी, हातगाव, करजगाव, कृष्णानगर या सहा गावांना, तर पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे तीन टँकर असे एकूण १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.