Kolhapur Flood : पावसाने धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागाला दिलासा मिळाला. पंचगंगेची पातळी मागच्या २४ तासांत सुमारे पावणेदोन फुटाने घट झाली आहे. दरम्यान कोल्हापूर शहर परिसरात पाणी पातळी कमी होत आहे परंतु शिरोळ तालुक्यात काल दिवसभरात पाण्याचा फुगवटा कायम राहिला होता. तर राधानगरीचे स्वयंचलित दोन दरवाजे अद्याप खुले असून, त्यातून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणाचा धरणाचा विसर्गही घटविला असून, तो १२ हजार २८५ इतका आहे.
दुसरीकडे मात्र कोयना धरणातून अद्याप ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती आणखी काही काळ कायम राहण्याची भीती आहे. दुपारी काही काळ कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पंचगंगेचे पाणी ओसरत चालल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला बालिंगा पूल हलक्या वाहनांसाठी सायंकाळपासून खुला करण्यात आला.
बालिंगा पूल वाहतुकीसाठी खुला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली. दुपारी काही वेळ कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात नऊ इंचाने कमी झाली. ती रात्री नऊच्या सुमारास ४५.७ फूट होती. पाणी ओसरत चालल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा पूल हलक्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत आज (ता. ३०) निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरातील काही भागांत पाणी ओसरल्याने बहुतांश प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. ४४० स्थलांतरित निवारा केंद्रांतून घरी परतले. अद्याप जिल्ह्यातील राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण असे एकूण ९० मार्ग बंद आहेत, तर ७७ बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या आलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४ फूट ७ इंचावर आली आहे. २४ तासांत १० बंधारे खुले झाले आहेत तर सध्या पाण्याखाली ७७ बंधारे आहेत.
दूधगंगा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता
दरम्यान दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग कायम करण्यात आला आहे. आज (ता.३०) सकाळी १० वाजता धरण सांडव्यावरून ७ हजार ६०० क्युसेक्स व विद्युत ग्रहातून १ हजार ५०० क्युसेक्स विसर्ग असा एकूण ९ हजार १०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.