
Buldana : मोताळा, जि. बुलडाणा येथे एकेकाळी पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या सिंदखेड गावाने आता जलसंपन्नतेचा पल्ला गाठला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या शासनाच्या अभियानाचा प्रत्यय येथे खऱ्या अर्थाने येतो. सिंदखेड शिवारातील एका विहिरीत अवघ्या १२ फुटांवर पाणी लागल्याची आनंददायक घटना घडली आहे. हे जलक्रांतीचे यश पाणी फाउंडेशन आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.
सिंदखेड गावाने जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. १५ हजार घनमीटर सीसीटी, २६ शेततळ्यांची निर्मिती, मियावाकी वृक्षलागवड, सिमेंट बांध, माती- दगडी बांध आणि पाणलोट क्षेत्रातील विविध कामांमुळे इथे जलसाठा वाढला. याच परिश्रमांचा परिणाम म्हणजे अवघ्या १२ फुटांवर पाणी लागलेली विहीर ! मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील छोटे - मोठे बांध तुडुंब भरले होते परिणामी जळपातळीत वाढ झाली आहे.
नुकतीच सिंदखेड शिवारात एक विहिरी खोदण्यास सुरुवात झाली. जलसंधारणाच्या कामामुळे ही क्रांती घडली आहे. गावगाड्याचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर गावातील गट - तट व राजकारण थांबल्यास शक्य होते. सिंदखेड या गावाने हे सिद्ध केले आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे गाव पाणीदार झाले आहे.
पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप स्पर्धेत’ सहभाग घेताना गावकऱ्यांनी शिस्तबद्ध व वैज्ञानिक पद्धतीने जलसंधारण केले. याच कामामुळे राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिकही गावाला मिळाले. आज हे गाव खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामामध्ये भरघोस उत्पादन घेऊ शकते आहे. पाणी फाउंडेशनचे समन्वयक नीलेश बढे, ‘‘या रखरखत्या मे महिन्यात देखील सिंदखेडमध्ये विहिरीत १२ फुटांवर पाणी लागणं, ही जलसंधारणाच्या यशाची जिवंत साक्ष आहे.’’
गावचे सरपंच प्रवीण कदम म्हणाले, ‘‘सहा वर्षांपूर्वी जेव्हा गावात खरिपासाठीही पाणी नव्हतं, तेच गाव आज १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आहे. पाण्याची चिंता मिटल्यामुळे आता समृद्धीचं नवं पर्व सुरू झाले आहे.’’ या जलक्रांतीमागे गावकऱ्यांची एकजूट, युवा वर्गाचे श्रमदान, राजकारण बाजूला ठेवून विकासाचा ठाम निर्धार कामाला आलेला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.