Matheran News : वाढत्या उष्णतेमुळे माथेरानमधील ब्रिटिशकालीन सिमसन्स टॅंकने (धोबी तलाव) तळ गाठला आहे. या तलावातून पाणी पिणाऱ्या मालवाहू घोड्यांचे मात्र अतोनात हाल सुरू झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी घोड्यांचा आटापिटा सुरू असून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माथेरानमध्ये प्रवासी वाहनासाठी घोडे आणि मालवाहू घोडे असे दोन प्रकार आहे. त्यापैकी दस्तुरी म्हणजे वाहनतळातून जीवनावश्यक माल पाठीवर लादून मालवाहू घोडे माथेरानमध्ये सेवा देत असतात. गॅस टाकी, दूध, भाजी, धान्य हे सर्व या मालवाहू घोड्यांद्वारे माथेरानकरांपर्यंत पोहोचते. या मालवाहू घोड्यांना पिण्यासाठी सिमसन्स टॅंक म्हणजे धोबी तलावाचा उपयोग होतो.
अमन लॉज स्थानकाजवळ आणि वाहनतळापासून पाच मिनिटांच्या अंतरावर हा छोटा तलाव असून ब्रिटिशांनी तो आपत्कालीन परिस्थितीसाठी बनविला होता. हा भाग घनदाट जंगलाने वेढला असून परिसर सदाहरित असतो. त्यामुळे घोड्यांना खाण्यासाठी गवतसुद्धा उपलब्ध होते. तलावाच्या बाजूलाच लागून असलेले वन विभागाचे बालोद्यान आहे.
२५ वर्षांपूर्वी या तलावाचा उपयोग बालोद्यानालासुद्धा व्हायचा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्ट यांनी हा तलाव घेतल्यानंतर घोड्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टने हा तलाव कधीच गाळमुक्त केला नाही. येथील पाणीउपसा करून झाडांना पाणी घालून परिसर स्वच्छ ठेवत आहेत; मात्र तलाव स्वच्छतेकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एमटीडीसी लक्ष देणार का?
एमटीडीसीने या तलावातील पाणीउपसा करून परसबागेसाठी हे पाणी वापरात आणले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा तुटवडा भासतो. यावर्षी लवकरच पाणी संपले असून घोड्यांना पाणी कुठून या आणणार, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे हा तलाव गाळमुक्त केल्यास काहीअंशी पाणी वाढेल यासाठी एमटीडीसी हा तलाव स्वच्छ करणार का, असा सवाल मालवाहू घोडेवाले विचारत आहेत.
धोबी तलाव नाव का पडले?
१९८० ते ९०च्या दशकात माथेरानमधील रजपूत समाज हा हॉटेलमधील पर्यटकांचे आणि हॉटेलचे कपडे घेऊन या तलावावर धुण्यासाठी जात असे. या तलावाला त्याकाळी धोबी घाट बनविला होता. मोठ्या प्रमाणात इथे कपडे धुतले जायचे. सकाळी कपडे धुऊन ते तेथील काळ्या कातळावर सुकवून ते लाँड्रीमध्ये नेले जात असत. त्यामुळे या सिमसन्स टँकला धोबी तलाव नाव पडले आहे. आता कपडे धुण्याच्या मशीनमुळे कोणीही इकडे कपडे धुण्यासाठी तलावावर जात नाहीत. वन विभागाचे बालोद्यानसुद्धा ३० वर्षांपासून बंद असल्यामुळे मालवाहू घोडे या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.