Sugarcane Rate : साखर उताऱ्याकडे लक्ष द्या...

Sugarcane Market : गेले अनेक वर्षे उसाला साखर उताऱ्यावर दर दिला गेला पाहिजे अशी तज्ज्ञ मंडळीत चर्चा होते. परंतु त्याची कार्यवाही होण्यासंबंधी पुढे काहीही हालचाल होत नाही. आपण संख्यात्मक प्रगती करीत आहोत, गुणात्मक प्रगतीपासून कोसो दूर आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

प्रताप चिपळूणकर

Sugarcane Production : आपल्याकडे उसाची तोडणी झाली म्हणजे कसा उतारा पडला अशी विचारणा केली जाते. शेतकरी सांगतात, की ४०, ५०, ६० टन उतारा मिळाला किंवा एखादा शेतकरी १०० टन उतारा मिळाला असे सांगतो. परदेशात मात्र ऊस उत्पादनाची निरीक्षणे खालील प्रमाणे नोंदवली जातात.

प्रति एकर ऊस उत्पादन

प्रति एकर साखर उत्पादन

प्रतिदिन प्रति एकर ऊस उत्पादन

प्रतिदिन प्रति एकर साखर उत्पादन

एक टन साखर उत्पादन करण्यासाठी गाळला गेलेला ऊस.

परदेशात खासगी साखर कारखाने आहेत. ऊस उत्पादन हे साखर कारखाना स्वतःच करतो. प्रत्येक कारखान्याचे प्रचंड मोठे उसाचे लागवड क्षेत्र असते. ऊस उत्पादनापेक्षा जास्तीत जास्त साखर कशी मिळेल याकडे बारकाईने लक्ष दिले जाते.

आपल्याकडे शेतकऱ्यांना किती टन ऊस पुरवठा यावर पैसे मिळतात. गेली अनेक वर्षे उसाला साखर उताऱ्यावर दर दिला गेला पाहिजे अशी तज्ज्ञ मंडळीत चर्चा होते. परंतु त्याची कार्यवाही होण्यासंबंधी पुढे काहीही हालचाल होत नाही.

आपण संख्यात्मक प्रगती करीत आहोत, गुणात्मक प्रगतीपासून कोसो दूर आहे. उताऱ्यावर पैसे मिळणारा गूळ उद्योग याला अपवाद नाही.

Sugarcane
Sugar Production : देशात २२३ लाख टन साखरेची निर्मिती

आपल्याला साखर उताऱ्यावर दर देणे शक्य आहे. आपण दूध उद्योगात शेतकऱ्यांना प्रथम लिटरवर दर देत होतो. त्यानंतर फॅटवर दर देण्यास सुरुवात झाली. पुढे फॅट अधिक ‘एसएनएफ’वर दर देण्याचे काम आता चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला दिवसातून दोन वेळा वरील निरीक्षणे मोजणे हे सुरुवातीला केवळ अशक्य वाटत होते.

आता त्यासाठी अनुरूप स्वयंचलित यंत्रसामग्री विकसित केली गेली आहे. उसाचा उतारा मोजण्याचे तंत्र विकसित झाले आहे. परदेशातील कारखान्यांकडे स्वतःची मोठ्या आकारमानाची ऊस शेती असते. योग्य प्रशिक्षित मजूर, कर्मचारी असतात. प्रयोगशाळा असतात. त्यांच्याकडील उतारा वाढविण्याचे तंत्र खूप क्लिष्ट आहे.

आपल्याकडे कित्येक हजारो सभासदांच्या लहान मोठ्या शेतातून ऊस आणून गाळला जातो. यासाठी त्यांचे तंत्र जसेच्या तसे वापरणे आपल्याला शक्य नाही. आपण आपल्या परिस्थितीत काय करू शकतो यावर कुठेतरी चिंतन चालू होण्याची गरज आहे.

उतारा वाढविण्याची गरज

प्रथम वरील पाच निरीक्षणांसंबंधी विचार करूयात. आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तम कार्यक्षम चालणाऱ्या कारखान्याचे उदाहरण पाहू. साखर उतारा १२.५ टक्के आहे. याचा अर्थ एक टन साखर तयार करण्यासाठी ८ ते ८.५ टन उसाची गरज लागते.

त्यांच्या अभ्यासाप्रमाणे उतारा वाढवीत नेला तर सहा टन ऊस गाळून एक टन साखर तयार करता येईल. इतकी कार्यक्षमता सुरुवातीला गाठणे अवघड आहे. परंतु त्यादृष्टीने विचारांची सुरुवात होणे गरजेचे वाटते.

आपल्याकडे साखर उतारा वाढविणे संबंधित काम झालेच नाही असे माझे म्हणणे नाही. आपल्याकडील कारखान्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांत उतारा कमी मिळत असल्यामुळे अंतिम सरासरी उतारा कमी होतो. यासाठी या दोन महिन्यांत प्राधान्याने लवकर पक्व होणाऱ्या जातीचे गाळप करावे.

जानेवारी १५ नंतर उशिरा पक्व होणाऱ्या जातीचे गाळप करावे. असे तंत्र पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी तयार केले. त्यासाठी कोसी ६७१ ही लवकर पक्व होणारी जात प्रथम गाळण्याचे ठरले. त्यासाठी सभासदांचे प्रबोधन करण्यात आले. प्राधान्याने ऊस तोडला जातो म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कोसी ६७१ जातीची लागवड केली. कोसी ६७१ जातीला उशिरा पक्व होणाऱ्या जातीचा साखर उतारा आणि १५ जानेवारीनंतर मिळतो तो नोव्हेंबर मध्येच मिळतो.

त्यामुळे अनेक कारखान्यांच्या सरासरी उताऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लवकर ऊस तुटतो, या आनंदात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लवकरच असे लक्षात आले, की आपल्याला पूर्वीसारखे उसाचे उत्पादन मिळत नाही. लवकर पक्वता म्हणजे हळव्या जातीप्रमाणे गरव्या जातीपेक्षा कमी उत्पादन असे होणे, यात काही चूक नव्हती.

परंतु साखर उतारा वाढवून मिळाल्याने कोणत्याही साखर कारखान्याने या उसाला एक पैसाही जादा भाव दिला नाही. शेतकऱ्यांनी कोसी ६७१ जातीचे उत्पादन वाढविण्यासाठी खताचे जादा हप्ते देण्यात सुरुवात केली. गरजेपेक्षा जास्त नत्राची टक्केवारी पानात झाल्याने पुढे को ६७१ उसावर मोठ्या प्रमाणावर तांबेरा पडला आणि लागवड कमी झाली.

मात्र या तंत्राचे योग्य नियोजन करून नंदुरबार जिल्ह्यातील कमी साखर उतारा विभागातील शहादा कारखान्याने १२ टक्के म्हणजे उत्तम साखर उतारा विभागातील कारखान्याचे बरोबरीने सरासरी साखर उतारा मिळवला. पुढे उसावरील तांबेऱ्याच्या प्रादुर्भावामुळे हे तंत्र मागे पडले आणि संपले.

Sugarcane
Sugarcane Growth : उसाची वाढ आणि दरप्रश्‍नाचा अभ्यास

साखर उतारा हा आता चर्चेचा विषय राहिला नाही. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. एकरी शंभर, दोनशे टन असे नवे प्रयोग शेतकरी करतात. आज तसे आकर्षण निर्माण झाले आहे.

अनेक कारखान्यांनी यासाठी काही खास योजना आखल्या, अनुदान, बक्षीस ठेवले. असा ऊस गाळत असताना साखर उतारा काय मिळाला? याबाबत कुठेच टिप्पणी वाचावयास मिळाली नाही. १० ते २० हजार सभासदांपैकी शंभर, दोनशे शेतकरी या योजनेत भाग घेतात.

बांधलेला भाव, हमीभाव तंत्रात इतर चांगला साखर उतारा देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच शंभर टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा दर मिळतो. थोडे शेतकरी असल्याने महासागरात खपून जातात.

ऊस वाढीचे शास्त्र समजून घ्या

१५ ऑगस्टला सुरळीत नवीन पानाऐवजी तुरा तयार झाल्याने उसाची वाढ थांबते. त्यानंतर येणाऱ्या पानांचे निरीक्षण केले तर मागील पानापेक्षा पुढील पान लहान आकाराचे तयार होते. असे बदल झाल्याने पानात जितकी साखर तयार होते ती सर्व वाढीसाठी वापरली जात नाही. शिल्लक साखर उसाच्या पेरात साठत जाते.

असे पुढे नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिल्याने उसात साखर उतारा वाढतो आणि हंगाम सुरू होतो. १०० टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तंत्रात अशी वाढ खुंटणे योग्य मानले जात नाही. ऊस तुटेपर्यंत वाढ चालूच राहिली पाहिजे, यासाठी तुटण्याची वेळ आली तरी सातत्याने ठिबकमधून विद्राव्य खताचे हप्ते दिले जातात.

अनेक जण तुरा येण्यावर टीका करतात. तुरा येणे चुकीचे मानले जाते. तुरा आल्यास ऊस पोकळ होईल, उत्पादन घटेल अशी भीती व्यक्त केली जाते. आपल्याला साखर पाहिजे असेल तर तुरा योग्यवेळी आलाच पाहिजे. तुरा न येण्यावर काही तज्ज्ञांच्या लेखात ज्या वेळी सल्ले दिले जातात, त्या वेळी आश्चर्य वाटते. तुरा न येणाऱ्या जाती विकसित केल्या पाहिजेत असाही प्रचार चालतो. याऐवजी योग्य वेळी तुरा तयार होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे, यावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन होणे गरजेचे वाटते.

योग्य वेळी पानाऐवजी तुरा येण्यासाठी उसाच्या रसात नत्र व स्फुरदाचे योग्य गुणोत्तर येणे गरजेचे असते. हे गुणोत्तर योग्य पातळीवर येण्यासाठी खताचा हप्ता मे महिन्यात बंद होणे गरजेचे असते. आपल्याकडे जून महिन्यात पावसाळ्याचे सुरुवातीला मोठा खताचा हप्ता देण्याची प्रथा आहे. काही शेतकरी जुलै, ऑगस्टमध्ये खते देतात. हे सर्व अंतिम शेतकरी आणि साखर उद्योगाचे नुकसान आहे. रासायनिक खतांचा येथे गैरवापर होतो.

आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये असा एक गैरसमज आहे, की पाणी देऊन ऊस तुटला तर जास्त वजन येईल आणि उत्पादन वाढेल. शास्त्र सांगते, की पाणी दिल्यास साखरेचे विघटन होते. अशा उसापासून साखर कमी मिळते. ऊस हलका होतो. उसात साखर उतारा जितका वाढेल तितका जड होत जातो.

यासाठी शेतकऱ्यांनी पाणी देऊन लगेच ऊस तोडू नये. यासाठी साखर कारखान्यांनी एक स्वतंत्र विभाग नेमावा. तोड अंदाजे केव्हा मिळू शकेल याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना एक महिना अगोदर तोडणीची कल्पना द्यावी तसेच पाणी बंद करण्याची सूचना द्यावी. हलक्या जमिनीसाठी ही वेळ थोडी कमी करावी. दिलेल्या तारखेच्या मागेपुढे दोन-चार दिवस तोडणी झाली तरी चालते. इतका फरक केल्यास कारखान्याचा सरासरी उतारा वाढू शकतो.

क्रमपाळीप्रमाणे तोडणी हा पूर्वीचा कार्यक्रम आता बंद पडला आहे. फडकरी कोणाचा ऊस तोडायचा ते ठरवतात. बहुतेक ठिकाणी खुशालीचा ठराव प्रथम केला जातो. फड तोडायचे की नाही हे ते ठरवतात. आपल्याकडे जमीनधारणा लहान असल्याने सर्वत्र यंत्राने काम होत नाही अशावेळी मजुरांना पाया पडून काम करून घेण्याचे दिवस आले आहेत.

तूर्त सर्व गाळप या मार्गाने न करता काही मोजके होतकरू शेतकरी निवडून सुधारित बेणे, योग्य खत मात्रा व पाणी बंद करणे वगैरे शक्यता सर्व मार्गाने वापरून आपण साखर उतारा वाढवू शकतो का, याचा विचार करावा. साखर उतारा वाढवण्याच्या प्रयोगात उत्पादनात घट आली तर त्यांना उताऱ्यावर दर देऊन त्यांचे नुकसान भरून काढता येईल का, असा एक प्रयोग राबवावा. त्याच्या यशापयशातून पुढील धोरण ठरविणे शक्य होईल.

आज कमी उताऱ्याचा ऊस गाळून आपण तोडणी ओढणी व प्रक्रिया अशा तिन्ही खर्चात वाढ करतो. कमी उतारा असल्यास प्रक्रियेत वेगवेगळ्या घटकातून साखर निघून जाण्याचे प्रमाण वाढते. याला टोटल लॉस असे म्हणतात. शेतकऱ्यांचा रासायनिक खते, पाणी वापर, रोग-कीड नियंत्रण अशा बाबींवरील खर्च वाढत जातो. रासायनिक खते आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो. या उपक्रमातून खूप मोठे परकीय चलन वाचविण्यास वाव आहे. प्रत्यक्ष प्रयोग हातात घेतल्यानंतर आणखी खूप बारकावे लक्षात येऊ शकतात. शेतकरी आणि साखर उद्योगाचा दोघांचाही फायदा या उपक्रमातून साधने शक्य आहे.

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com