Nagpur News : राज्यात शेतकरीपुत्रांनी कष्टाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र या शिफारसपात्र २०३ उमेदवारांना गेल्या चार महिन्यांपासून नियुक्तीसाठी टाळाटाळ केली जात आहे.
प्रशासनाच्या पातळीवर लालफितशाहीच्या कारभाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे. या प्रकरणी वेळीच तोडगा न काढल्यास कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
कृषी विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. त्यामध्ये वर्ग एक दर्जाची १२७, वर्ग-२ वरिष्ठ तालुका कृषी अधिकारी ३३४ तर वर्ग-२ कनिष्ठ कृषी अधिकारी ५९५ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आकडा हा देखील काही हजारांमध्ये आहे. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पदाचा प्रभार सोपविण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे रिक्त पदे भरावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार २०१८ नंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये २०३ अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये वर्ग १ कृषी उपसंचालक १९ पदे, वर्ग-२ वरिष्ठ तालुका कृषी अधिकारी ६१ तर वर्ग-२ कनिष्ठ कृषी अधिकारी १२३ याप्रमाणे पदभरती करण्यात येणार होती. त्यासाठी पूर्वपरिक्षा, मुख्य परिक्षा, मुलाखती झाल्या. परिक्षेचा अंतिम निकाल १२ जुलै २०२३ रोजी जाहीर झाला. आधीपासूनच ‘एमपीएससी’मार्फत संथ गतीने प्रक्रिया राबविण्यात आली.
शासन निर्णयानुसार अंतिम निकालानंतर तीन महिन्यात नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र २०३ जणांच्या निवडीला चार महिने लोटूनही ही प्रक्रिया पुढे सरकली नाही. १७ ऑगस्ट रोजी पुणे कृषी आयुक्तालयात कागदपत्रे पडताळणीचे काम झाले. त्यानंतर उमेदवारांना आठ दिवसांत विभागीय विकल्प मागण्यात येईल आणि नियुक्तीपत्र मिळेल, असे सांगण्यात आले.
परंतु कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. उमेदवारांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दोनवेळा निवेदन दिले. वारंवार विचारणा केली. कृषी सचिवांना ईमेलव्दारे विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रश्नी तोडगा न काढल्यास कृषी आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा उमेदवारांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.