Nitin Gadkari : गडकरी हवेत की दुसरा उमेदवार? भाजप निरीक्षकांची विचारणा; कार्यकर्ते संतापले

Lok Sabha Election : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हवेत की दुसरा उमेदवार, अशी विचारणा भाजपच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

BJP : नागपूर ः आगामी लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हवेत की दुसरा उमेदवार, अशी विचारणा भाजपच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच आमचे नेते आणि उमेदवार असल्याचे ठासून सांगितले.
भाजपच्या वतीने सर्वच लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे. सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत. गुरुवारी (ता. २९) निरीक्षक खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे नागपूरला येऊन गेले. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

भाजपची निवडणुकीची तयारी, उमेदवाराविषयी मत, विजयाची शक्यतासह विविध माहिती जाणून घेतली. नितीन गडकरी उमेदवार हवेत की दुसरा  उमेदवार, अशी विचारणा निरीक्षकांनी केली. हा प्रश्न अनेकांना रुचला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री म्हणून गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यांचा संपर्क, जनाधार, समाजकार्य, विकासकामे याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्चच नागपूरमध्ये उपस्थित होत नसल्याचे अनेकांनी ठणकावून सांगितल्याचे कळते.

Nitin Gadkari
Nitin gadkari : गडकरी-मुंडेंची विद्यापीठात शिवारफेरी आणि संशोधकांशी संवाद

भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकीत अनेक खासदार व केंद्रीय मंत्र्यांनी राज्यात पाठवले होते. काही ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवले. हे बघता लोकसभेच्या निवडणुकीत मोठे बदल केले जातील अशी चर्चा आहे. अधूनमधून नितीन गडकरी यांच्याही उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी उमेदवाराबाबत मत विचारल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते. दहा वर्षांपासून केंद्रीय मंत्री आहेत. नागपूरमधून सलग दोनवेळा लोकसभा जिंकली आहे. असे असताना त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित करणे अनेकांना रुचले नाही.

कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती
सोशल मीडियावर देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे देखील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com