Alibaug News : चार वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात अवघ्या दोन-तीन तासांत कोट्यवधींची हानी केली. हजारो कुटुंबे बेघर झाली. बागायतदार पुरता कोलमडून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री, नेते मंडळी, केंद्रीय पथकांचे दौरे झाले. सरकारकडून तातडीने पावणे चारशे कोटी रुपये निधी देण्यात आला, परंतु चार वर्षांनंतरही जिल्ह्यातील बागायत क्षेत्राचे झालेले नुकसान भरून निघाले नाही.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या फळबागांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत पुनर्लागवड व पुनरुज्जीवन योजना जिल्ह्यात राबवण्यात आली. या योजनेतून नऊ हजार ४२० हेक्टर क्षेत्रातील फळबाग लागवडीला मंजुरी देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात पाच हजार २०० हेक्टर क्षेत्रातच रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक साह्य देण्यात आले. अद्यापही ४० टक्के म्हणजे चार हजार २२० हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड योजना राबविण्यातच आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागांमध्ये ३ जून २०२० रोजी आलेले आतापर्यंत सर्वांत मोठ्या वादळाच्या पाऊलखुणा आजही दिसतात. हे नुकसान भरून काढण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने विशेष फळबाग लागवड योजना बागायतदारांसाठी सुरू केली होती. परंतु रोपाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची बदलती मानसिकता यामुळे अद्याप चार हजार २२० हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रात लागवड झालेली नाही.
चक्रीवादळात सर्वाधिक फटका सुपारी पिकाला बसला होता. सुपारीच्या ६० टक्के बागा भुईसपाट झाल्या होत्या, त्यामुळे कमी उंचीच्या सुपारी जातीची रोपे शेतकऱ्यांना देण्यात आली. तरीही सुपारीचे पीक पूर्वपदावर आलेले नाही.
५६ कोटी ५८ लाखांची तांत्रिक मंजुरी
संपूर्ण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला. श्रीवर्धन आणि मुरूडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून, पोलादपूर, माणगाव, रोहा, कर्जत आदी किनारपट्टीच्या आत असणाऱ्या ठिकाणांनाही वादळाचा फटका बसला होता. ११ हजार २८१ हेक्टरमधील बागांचे आणि पिकांचे नुकसान झाले होते. अलिबाग ते कर्जतपर्यंतच्या पट्ट्यात शेकडोंच्या संख्येत झाडे उन्मळून पडली. सरकारने या निसर्गग्रस्तांसाठी ५६ कोटी ५८ लाख रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करूनही फारशी मदत मिळाली नसल्याचे नुकसानग्रस्त सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.