Maharashtra Vidhansabha 2024 : विधानसभेसाठी राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान

Maharashtra Election Update : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Maharashtra Vidhansabha
Maharashtra VidhansabhaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी मंगळवारी (ता.१५) दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.

तसेच नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरही २० रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच केरळमधील वायनाड आणि पश्चिम बंगालमधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. वायनाड येथून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने, तर पश्चिम बंगाल येथील बशीरहाटमधील तृणमूल काँग्रेसचे हाजी शेख नरुल इस्लाम यांचा मृत्यू झाल्याने जागा रिक्त होती.

झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होणार असून पहिला टप्प्यासाठी १३, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे.

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ लढत झाली होती. त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरत भाजपला कोंडीत पकडले. त्यानंतर शिवसेनेने युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्षांचे सरकार चालले. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याने सरकार कोसळले. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यामुळे सध्या महायुतीत भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर विरोधात काँग्रेस, ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार आहे.

Maharashtra Vidhansabha
Vidhansabha Election 2024 : दिवाळी, अन्य सणांचा विचार करून निवडणुका

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख १८७ मतदार केंद्रे असतील. निवडणुकीसाठी ९ कोटी ६६ लाख मतदार असून त्यापैकी ४ कोटी ९८ लाख पुरुष, तर ४ कोटी ६६ लाख महिला मतदार आहेत.

या निवडणुकीत २० लाख ९३ हजार नवमतदार असून, एक कोटी ८५ लाख युवा मतदार आहेत. मतदानासाठी ३८८ महिला संचलित मतदार केंद्र आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ३० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, ४ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

मतदारांसाठी सोयीसुविधा

लोकसभा निवडणुकीत मतदारांची प्रचंड गैरसोय झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्याचे आयुक्त राजेश कुमार यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रांगांमध्ये खुर्चा ठेवण्यात येणार असून प्राथमिक सुविधा देण्यात येतील. दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्र असेल. ८५ वर्षांवरील मतदारांच्या घरी मतदान करून घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया गोपनीय असेल. तसेच मतदान प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात येणार असल्याची माहिती राजेश कुमार यांनी दिली. मतदारांना वोटर हेल्पलाईनवरून आपली सर्व माहिती मिळवता येऊ शकते. यामध्ये नाव, मतदान केंद्र आदीबाबतची माहिती मिळू शकते.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उ मेदवारांना द्यावी लागणार जाहिरात

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी आयोगाने बैठका घेतल्या त्यावेळी अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले आहेत, असेही आयुक्त कुमार यांनी सांगितले.

Maharashtra Vidhansabha
Maharashtra Election Date 2024 : अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर; २० नोव्हेंबरला मतदान तर निकाल २३ नोव्हेंबरला!

अशी होईल मतदान प्रक्रिया

अर्ज दाखल : २२ ते २९ ऑक्टोबर

अर्ज छाननी : ३० ऑक्टोबर

माघारीची अंतिम मुदत : ४ नोव्हेंबर

मतदान : २० नोव्हेंबर

मतमोजणी : २३ नोव्हेंबर

मतदार : ९ कोटी ६६ लाख

मतदान केंद्र : एक लाख १८७

पुरुष मतदार : ४ कोटी ९८ लाख

महिला मतदार : ४ कोटी ६६ लाख

नवमतदार : २० लाख ९३ हजार

युवा मतदार : एक कोटी ८५ लाख

झारखंड मतदान

मतदार : २ कोटी ५५ लाख १८ हजार ६४२

पुरुष मतदार : १ कोटी २९ लाख ९७ हजार ३२५

महिला मतदार : १ कोटी २५ लाख, २० हजार ९१०

एकूण मतदारसंघ : ८१

पहिला टप्पा : १३ नोव्हेंबर ( ४३ जागा)

दुसरा टप्पा : २० नोव्हेंबर (३८ जागा)

व्हीएमबाबत किती वेळा स्पष्टीकरण देऊ’

ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकांबाबत उत्तर देताना आयुक्त राजेशकुमार यांनी ‘आम्ही किती वेळा या सगळ्या गोष्टी सांगायच्या’ असा सवाल केला. जर पेजरने स्फोट घडवता येऊ शकत असेल तर ईव्हीएमने का नाही, असा प्रश्न केला असता पेजर कनेक्टेड असतात, ईव्हीएम नाही, असे ते म्हणाले. ईव्हीएमची पहिल्या पातळीवरील तपासणी पाच ते सहा महिन्यांपूर्वी होते. आमच्याकडे ईव्हीएमबाबत २० तक्रारी आल्या होत्या. त्या प्रत्येक तक्रारींच्या तथ्यांच्या आधारे स्वतंत्र उत्तर देऊ. तसेच मतदार प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. मशिन कनिशनिंग होते तेव्हा त्यात बॅटरी टाकली जाते. बॅटरी मशिनमध्ये घातल्यानंतर त्यावर उमेदवाराची सही घेतली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकिया पारदर्शी पद्धतीने होतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com