Pune News : जम्मू-काश्मीर पाठोपाठ हरियाणात विधानसभा निवडणुकीचे मतदान शनिवारी (ता.५) पार पडले. येथे जवळपास ६७ टक्के मतदान झाले आहे. याचदरम्यान एक्झिट पोलचे अंदाज देखील आले. ज्यात भाजपला धक्का बसला असून काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण जम्मू-काश्मीर असो किंवा हरियाणा येथे कोण बाजी मारणार कोणाची सत्ता येणार हे मंगळवारी (ता. ८) स्पष्ट होईल. यावेळी हरियाणात भाजप, काँग्रेस, एनेलो-बसपा आणि जेजेपी-आजाद समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात होते. पण बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत पहायला मिळाली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९० विधानसभा जागांवर मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची आणि हाणामारीच्या घटना घडल्या. तर राज्यात जवळपास ६७ टक्के मतदान झाले आहे. पण२०१९ च्या निवडणुकीपेक्षा हे कमी आहे. यामुळे याचा थेट फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता विविध एक्झिट पोलनी व्यक्त केली आहे. २०१९ मध्ये हरियाणात जवळपास ६८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
हरियाणात भाजप, काँग्रेस, एनेलो-बसपा आणि जेजेपी-आजाद समाज पार्टी आणि अपक्ष असे एकूण १ हजार ०३१ उमेदवार रिंगणात होते. ज्यात १०१ महिला आणि ४६४ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. शनिवारी या १ हजार ०३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएममध्ये बंद झाले. आता ८ ऑगस्टला मतमोजणी होणार असून याच दिवशी निकाल लागणार आहे. तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसला ४४-५४ तर भाजपला १५-२९ जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला ५०-५८ आणि भाजपला २०-२८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपची हॅट्रीक हुकणार?
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हुड्डा यांनी राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमताने येईल. सत्ता काँग्रेस स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मावळते भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सैनी यांनी एक्झिट पोलच्या अंदाज काहीही असो पण राज्यात तिसऱ्यांदा मोठा जनादेश भाजपला मिळेल. भाजपच सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान या निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसने मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचा आरोप भाजपाने केला. या आरोपांवर पलटवार करताना, कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगट यांनी प्रत्युत्तर दिले. विनेश फोगट म्हणाल्या, संपूर्ण हरियाणात काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण दिसत आहे. भाजपाचे आरोप बिनबुडाचे आहेत. आम्ही चुकीचं काही काम करत नाही, आमचा मतदारांवर विश्वास आहे.
निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे
गेली दोन टर्म येथे भाजपची सत्ता आहे. तर केंद्रात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचीच सत्ता होती. आता तर केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान देखील हरियाणाचे आहेत. तरिदेखील येथील शेतऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. हरियात यंदा हमीभाव कायद्याच्या मागणीवरून शेतकऱ्यानी आंदोलन तीव्र केले आहे. याचबरोबर अग्निवीर योजना - बेरोजगारी आणि रोजगार निर्मिती, कुस्तीपटूंचे आरोप असे महत्वाचे मुद्दे यावेळी निवडणुकीत अग्रस्थानी होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.