Village Story
Village StoryAgrowon

Village Story : भेट...

Article by Sameer Gaikwad : सुतार आळीतल्या विठ्ठल मंदिरात दरवाजा फोडल्यानंतर वेगळेच दृश्य दिसले. विठ्ठलाच्या गळ्यातला शेला आणि कंबरेचे पीतांबर भिजलेलं होतं. मूर्तीचे डोळे रडल्यागत दिसत होते.

समीर गायकवाड

Village Story : गावाच्या मधोमध असणारं सुतार आळीतलं विठ्ठल मंदिर नेमकं कधी, कुणी बांधलंय याची माहिती गावातल्या पिकल्या पानांनाही नव्हती. मंदिर बरंच जुनं असल्याने जीर्ण झालं होतं. कधीकाळी ते भव्य असावं. त्याची बांधणी आता ढासळण्याच्या बेतात आलेली. माळवदावर कुणी पाय ठेवले तरी खाली माती पडू लागली होती. सभामंडपाची शान गेली होती.

त्याला आधार देणाऱ्या लाकडी खांबांच्या ढलप्या उडून त्यांना चिरा पडल्या होत्या. एकेकाळचा त्यावरचा लालभडक रंग पुरता मिटून गेलेला. भिंतींचे दगड बऱ्यापैकी निसटले होते. त्यातून माती, चुना, मुरूम डोकावत होतं. पायऱ्यांचे दगड निम्मेअर्धे गायब झालेले तर बाकीचे ढासळलेले. पायऱ्या म्हणून दोनेक आडमाप दगडांच्या रांगा होत्या. त्यावरून मंदिरात जाणं हे दिव्य असे. पोराठोरांना थोडंफार जमायचं पण म्हाताऱ्याकोताऱ्यांची आब्दा व्हायची.

मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट कुबट दर्पाचा घमघमाट असे. साठ वॉटच्या टंगस्टनच्या काचेरी बल्बचा तांबूस पिवळा उजेड थिजल्या अवस्थेत असे. एकजागी असलेल्या विठ्ठल-रुखमाईच्या मूर्त्या बऱ्यापैकी ठिसूळ झालेल्या. त्यांची काया पुरती तेलकट झालेली, अंगावरची वस्त्रं जुनाट झालेली. रोज नित्यनेमाने अर्पिलेल्या हारफुलांचा, तुळशी मंजुळांचा वेगळा गंध तिथं जाणवे, त्याचं निर्माल्य झालं की त्यावर माश्‍या घोंघावत.

त्यातले बारीकसारीक चिलटं, किडे सगळ्या गाभाऱ्यात पसरत. गाभाऱ्याच्या भिंतींना दिलेला रंग नेमका कोणता असावा असा प्रश्‍न पडे, दरसाली दिलेले रंग आपसांत मिसळून तपकिरी निळसर रंग पावसाळ्यात ओघळू लागायचा. गाभारा गळू लागला की भिंती फुगून येत. विठु-रुखमाईंची मूर्ती ताशीव दगडी कट्ट्यावर असल्याने तिथे पाणी साचत नसे,

पण अन्यत्र फरशीवर सतत चिकट ओल जाणवे. विझलेल्या उदबत्त्यांच्या काड्या, नारळाच्या करवंट्यांचे तुकडे पायात घुटमळत. सभामंडपात लावलेल्या संतांच्या तसबिरी इतक्या जुन्या होत्या की आतल्या फोटोंचे रंग फ्रेमच्या काचांशी एकजीव झालेले. संतांच्या डोक्यांवरच्या पगड्यांवरून कळायचे की कोणती तसबीर कुणाची आहे. कधीकाळी कुणा दानशूराने दिलेले चंदनी झुरमळ्यांचे निस्तेज हार त्या तसबिरींवर लटकून होते.

तसबिरीआड पालींचा मुक्त वावर होता. माळवदाला मधोमध झुंबर अडकावण्यासाठी भलं मोठं हुक होतं, त्यात कुणी तरी बांधलेले नवसाचे नारळ तगून होते. ते जागेवर आक्रसले होते. फरसबंदी जागोजागी उखडली होती. त्याच्या फटीत गवताची चिवट पाती पुन्हा पुन्हा उगवत होती. भिंतींवरची वायरिंग अनेक ठिकाणी मोकळी होऊन लोंबत होती.

मंदिरात पूजाअर्चना करणाऱ्या रामा गुरवाचा मृत्यू वृद्धत्वाने झाला. त्याला मूलबाळ नव्हतं. त्याच्याही आधी गावात विविध वदंता होत्या. त्यामुळे मंदिराला कळस नव्हताच. नुसतंच शिखर होतं, ज्याचे टवके उडाले होते, सोनेरी रंग इतिहासजमा झाला होता. तरीही या मंदिरावर, इथल्या विठु-रुखमाईवर गावाची विलक्षण श्रद्धा होती. मंदिर सुतारआळीत असल्यानं सुताराच्या घराचा विशेष जीव होता. घरातलं म्हातारं माणूस असो वा रांगतं बाळ असो रोज मंदिरात गेल्याशिवाय त्यांचा दिवस कलत नसे. याच घराचा कर्तापुरुष होता ज्ञानू सुतार.

Village Story
Crop Competition : रब्बी हंगाम पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा

काळासावळा वर्ण, सडपातळ बांधा, स्वच्छ साधे कपडे, भाळी गोपीचंदन आणि बुक्का, मुखी विठ्ठलनाम असं ज्ञानूचं रूपडं. सत्तरीला पोहोचलेल्या ज्ञानूचं शिक्षण जेमेतेम आकडेमोडीचं होतं. तरीही सगळे अभंग त्याला तोंडपाठ होते. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सगळं त्याला अवगत होतं. कीर्तन प्रवचन असलं की पखवाजावर त्याच्या बोटांची जादू चाले.

त्याच्या चढ्या आवाजात वेगळीच जादू होती. तो गाऊ लागला की पांडुरंगाचेही देहभान हरपून जात असावे. त्याचे बापजादेही कित्येक पिढ्यापासून याच मंदिरात विठूचरणी भक्तिसेवा अर्पित. ज्ञानू सुताराला त्या मंदिराचं इतकं वेड होतं की त्यापायी संसाराकडे दुर्लक्ष झालेलं. भागवत सप्ताह, नामस्मरण सोहळा, पुण्यतिथी, व्रतवैकल्ये काहीही निमित्त असलं की घरदार टाकून गडी पुढे असे.

त्याच्या बायकोनं सावित्रीनं कसा संसार रेटला हे त्याला देखील कधी उमजले नव्हते. मुलं कधी मोठी झाली हे ही कळले नाही. त्याचं सगळं चित्त टाळ कुटण्यात, पखवाज वादनात असे. गावात मात्र त्याला मोठा मान होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. त्याचा सालस, सच्चा भक्तिभाव म्हणजे गावाची शानच जणू. ज्ञानूच्या घरी भौतिक साधनांची वानवा असूनही सुख नांदत होतं. ते नियतीला बघवलं नसावं.

गावाच्या रस्त्यालगत असलेल्या जमिनी हमरस्त्यासाठी संपादित होऊ लागल्या. गावात बक्कळ पैसा खेळू लागला. अनेकांना लाखो रुपये मिळाले. त्यातलाच एक उंबरा होता भोला पाटलाचा. ज्ञानूचा मानसन्मान अल्पमती भोलाच्या मनात खुपायचा. त्यानं शक्कल लढवली. वेशीवरच्या मारुतीरायाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विडा उचलला.

सोबत विठु-रुखमाईच्या नव्या भव्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठाही घोषित केली. उंच गोपूर, भव्य कळस, विशाल सभामंडप, नक्षीदार भक्कम मजबूत खांब, ऐसपैस गाभारे, चकचकीत लख्ख फरशा, लक्षवेधी रंगकाम, भपकेबाज लाइट्स, जोरदार स्पीकरसह मोठाले साउंड बॉक्स, टाळ-पखवाजाचे संच, हार्मोनियम सगळं काही त्यानं दिलं. मंदिराच्या नव्या रूपाची गावाला ओढ लागली.

जुन्या मंदिरातली लगबग कमी झाली. तिथल्या रोजच्या पूजाविधीला होणारी गर्दी आटली. हळूहळू मंदिर ओस पडू लागले. ही गोष्ट ज्ञानूच्या काळजाला लागली. त्यानं स्वतःला मंदिर आणि घरापुरतं मर्यादित केलं. त्याचं एकाकीपण सुरू झालं. ज्ञानू घराबाहेर पडायचा बंद झाला पण गावाला त्याचं सोयरसुतक नव्हतं.

Village Story
Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस

गावानं आपली इतकीही दखल घेतली नाही याचं वैषम्य त्याच्या मनात दाटलं. या कठीण समयी त्याचं कुटुंब त्याच्या मदतीला धावलं. घरातली सगळी माणसं सारखी मंदिरात दिसू लागली. थकलेली श्रमलेली बायको, तिन्ही पोरं-सूना, आठ-दहा नातवंडं सगळेच त्याच्यासोबत मंदिराच्या नित्यकर्मात सहभागी होऊ लागले.

टाळकरी, वीणेकरी, पेटीवादक, पखवाजवादक सगळी घरातलीच मंडळी. पाव्हणेरावळे देखील त्यांनी वर्ज्य केले. सणवार, मानपान, संसार सगळं सोडून त्या कुटुंबानं ज्ञानूचं मन सावरलं. अवघं घर विठ्ठलमय होऊन गेलं.

इकडं नव्या मंदिरात आजूबाजूच्या पंचक्रोशीतली माणसं येऊ लागली. मोठमोठाले नामांकित कीर्तनकार पायधूळ झाडू लागले. सगळीकडं भोला पाटलाच्या दानशूरतेची चर्चा होऊ लागली. गावाला जणू विठ्ठलाची नशा चढली पण त्यात तो जुना अस्सल भक्तिभाव नव्हता.

भोला पाटलानं आणखी डाव टाकत स्वखर्चानं आषाढीसाठी गावातली दिंडी नेणार असल्याचं सांगितलं. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्ञानूकडे कुणी फिरकलंच नाही. गावातून दिंडी जाऊ लागल्याचा ज्ञानूला मात्र खूप आनंद झाला. परंतु आपल्या कुंकवाच्या धन्याला, बापाला, आज्ज्याला गावानं साधं विचारलंदेखील नाही याची टोचणी त्याच्या बायकोला, पोरांना, नातवंडांना लागली.

तरीही त्यांनी आपल्या मनातलं शल्य कुणाला सांगितलं नाही. द्वितीयेच्या दिवशी गावातून वाजतगाजत दिंडी निघाली. त्या दिवशी ज्ञानूच्या एका डोळ्यात सुख होतं, तर एका डोळ्यात दुःख. त्या दिवसापासून त्याचं कशातच लक्ष लागेनासं झालं. त्यानं घरी झोपणं बंद केलं, मंदिरातच पथारी अंथरली. त्याचं खाणंपिणं घटलं.

दशमीच्या दिवशी तो पुरता कासावीस झाला होता. खरं तर त्यालाही पंढरीला जायला आवडलं असतं, पण रामा गुरवाच्या मागं गावातल्या विठुरायाची जबाबदारी त्याच्या अंगावर होती, खेरीज त्याला कुणी आवतनही दिलं नव्हतं. गावातली सांप्रदायिक मंडळी आता पंढरीच्या वेशीवर पोहोचली असतील, आपण मात्र इथेच आहोत या विचाराने त्याला पोखरलं. त्या रात्री मंदिराची साफसफाई करून पहाटेच तयारीस लागायचंय म्हणून तो मंदिरातच झोपला. तिकडं पंढरीत आलेल्या गावकऱ्यांपैकी अनेकांना वारीत ज्ञानू दिसल्याचा भास झाला.

दरम्यान, इकडे गाभाऱ्यात झोपलेला ज्ञानू उठलाच नाही. पहाटे त्याच्या मुलांनी बराच वेळ दार ठोठावलं. अखेर दरवाजा फोडून त्याला बाहेर काढावं लागलं. एकादशीच्या पहाटेस ज्ञानू सुतार विठ्ठलाच्या खऱ्या वारीला गेला. ज्ञानूच्या घराला सुतक लागलं. बापाच्या मयतीचा निरोप मिळताच शेजारच्याच गावी राहणारी त्याची कन्या सत्यभामा साश्रूनयनांनी धावत पळत तांबडं फुटायच्या आधी गावात आली.

तिकडे वारीत गेलेल्या गावातल्या हरेक माणसाला पांडुरंगाच्या मंदिरातही ज्ञानूच दिसला, खरं तर तो भास होता. सुतार आळीतल्या विठ्ठल मंदिरात दरवाजा फोडल्यानंतर वेगळेच दृश्य दिसले. विठ्ठलाच्या गळ्यातला शेला आणि कंबरेचं पीतांबर भिजलेलं होतं. मूर्तीचे डोळे रडल्यागत दिसत होते,

त्याच अश्रूंच्या धारा पीतांबरापर्यंत पोहोचल्या असाव्यात. विठ्ठलाच्या भाळीचा अष्टगंध पुसट वाटत होता आणि अगदी तसाच गंध ज्ञानूच्या कपाळावर उमटला होता. आजाराने कोमेजून गेलेल्या ज्ञानूचा चेहरा विलक्षण तेजस्वी नि प्रसन्न वाटत होता. बहुधा त्याला खरा विठ्ठल भेटला होता. या भेटीसाठी त्याने आयुष्य पणाला लावले होते ही बाब अलाहिदा.

: ८३८०९७३९७७ (लेखक प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com