Crop Damage : द्राक्षमण्यांना तडे; अर्ली द्राक्षाचे थांबले खुडे

Unseasonal Rain : रशिया व आखाती देशांमध्ये प्रामुख्याने निर्यात होते. हा माल नाताळासाठी जात असतो. मात्र रविवारी (ता. २६) झालेल्या पावसामुळे छाटणीच्या ९० दिवसांपेक्षा अधिक दिवसांच्या बागेत द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत.
Grape crop damage
Grape crop damageAgrowon

Nashik News : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून सर्वांत पहिल्यांदा द्राक्ष निर्यात ही नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातून सुरू होत असते. ज्यामध्ये सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असतात.

रशिया व आखाती देशांमध्ये प्रामुख्याने निर्यात होते. हा माल नाताळासाठी जात असतो. मात्र रविवारी (ता. २६) झालेल्या पावसामुळे छाटणीच्या ९० दिवसांपेक्षा अधिक दिवसांच्या बागेत द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत.

त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सलग चौथ्यांदा हे संकट शेतकऱ्यांवर आहे सध्या द्राक्षमण्यांना तडे गेल्याने अर्ली द्राक्ष पट्ट्यात खुडे थांबले आहेत. ‘अधिक जोखीम अधिक दर’ असे अर्ली द्राक्ष हंगामाचे गणित आहे. शेतकरी जुलै महिन्यापासून गोडी बहर छाटण्याची तयारी करत असतात.

मात्र गेल्या पाच वर्षांपासून पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले आहे. सातत्याने हा द्राक्ष पट्टा अडचणीच्या गर्तेत सापडल्याने मोठी आर्थिक कोंडी झाल्याची स्थिती आहे. परिणामी, जवळपास दीड हजार एकरवर द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालविली आहे.

Grape crop damage
Grape Crop Damage : द्राक्ष झाली आंबट ! अवकाळी, गारपीठीनंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले...

यंदाच्या हंगामागील खुडे नवरात्रीनंतर सुरू झाले होते. कामकाज असताना नैसर्गिक आपत्तीच्या सावर्डाखाली येथील द्राक्ष उत्पादक पट्टा सापडला आहे. या भागात १५ ते २५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला.

परिणामी, द्राक्ष बागांमध्ये होत्याचं नव्हतं झाल्याची गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे हा द्राक्ष पट्टा पुन्हा एकदा तणावाखाली आहे. सटाणा तालुक्यात सर्वाधिक नुकसान असून मालेगाव, कळवण व देवळा तालुक्यांतही बागांची दैना झाली आहे.

१५ ऑगस्टपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी गोडी बहर छाटणी केलेली आहे; ९० दिवसांच्या पुढे होऊन ज्या बागेतील द्राक्ष मण्यात साखर उतरलेली आहे अशा भागांमध्ये मण्यांना तडे जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक भागांत हे नुकसान कमी अधिक असले तरीही ५० टक्क्यांहून अधिक नुकसान दिसून येत आहे.

निफाड, चांदवड व नांदगाव तालुक्याच्या तुलनेत गारपीट नसली तरीही पावसाने या भागात नुकसान वाढवले आहे. ज्यामध्ये सफेद व रंगीत वाणांचे मोठे नुकसान झाल्याने एकरी ३ लाखांहून अधिक नुकसान आहे.

Grape crop damage
Grape Crop Damage : लेकरासारखं सांभाळलेल्या द्राक्षाचा अवकाळीने घात

५० कोटींवर नुकसान सफेद व रंगीत या दोन्हीही वाणांचे उत्पादन असते. दरवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे २०० कंटेनरपर्यंत द्राक्षाची निर्यात होते. मात्र पावसाने यंदाही व्यत्यय आणला आहे. निर्यातक्षम द्राक्ष माल खराब झाल्याने द्राक्ष निर्यातीला फटका बसला आहे. सध्या सफेद वाणाला ८० ते १०० रुपये, तर रंगीत वाणाला १२० ते १५० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत होता. मात्र एकच रात्रीत शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे.

‘वाण बदल; संरक्षित शेती हाच उरला पर्याय’ पूर्वी पाच एकर द्राक्ष बाग होती; मात्र सततच्या नुकसानीमुळे तीन एकर द्राक्ष लागवड काढून टाकली. त्यातच आता यंदाही पावसाने दणका दिला आहे. निर्यातक्षम काढणीयोग्य बागांमध्ये नुकसान अधिक आहे.तर ज्या बागांमध्ये द्राक्षांना कागदी वेष्टण लावलेले होते.

त्याही भागांमध्ये धुक्यामुळे तडे जाऊन नुकसान वाढत आहे. दरवर्षी हे नुकसान सोसत नसल्याने आता वाण बदल हा एकमेव पर्याय आहे. याशिवाय संरक्षित द्राक्ष शेती करण्यासाठी सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. फक्त आता घोषणा करून चालणार नाही, तरच प्रत्यक्ष मदत दिली तर शेतकरी जगू शकेल, असे मत आसखेडा (ता. सटाणा) येथील प्रगतिशील शेतकरी अमृत कापडणीस यांनी व्यक्त केले.

२०१९ पाऊस संकटाचे हे चौथे वर्ष आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांवर आहे. मागील वर्षी तुलनेत नुकसान कमी होते. सध्या रशिया आणि दुबईत द्राक्ष निर्यात सुरू होती, मात्र सध्या कामकाज ठप्प झाले आहे. मागणी आहे मात्र मालाची टंचाई होईल.
- खंडेराव शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, भुयाणे, ता. सटाणा

कसमादे भागातील नुकसानग्रस्त गावे

सटाणा पिंगळवडे, बिजोटे, निताणे, भुयाणे, करंजाड, पारनेर, वागळे, टेंभे, वीरगाव, आसखेडा, कोटबेल, जायखेडा, डोंगरेज.

देवळा वाजगाव, खर्डे.

मालेगाव येसगाव, मथुरपाडे, अजंदे, भुईगव्हाण.

कळवण कणाशी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com