Hailstorm Vineyard Damage : गारांच्या माऱ्यात द्राक्ष बागांचे उरले सांगाडे

Grape Crop Damage in Nashik : द्राक्ष बागेत एकीकडे उत्पादन खर्च करून परतावा आणि दराची शाश्‍वती नाही. तर निविष्ठा, मजुरी आणि इंधन दर वाढल्याने एकरी खर्च अडीच लाखांवर गेला आहे.
Vineyard Damage
Vineyard Damage Agrowon

Nashik News : द्राक्ष बागेत एकीकडे उत्पादन खर्च करून परतावा आणि दराची शाश्‍वती नाही. तर निविष्ठा, मजुरी आणि इंधन दर वाढल्याने एकरी खर्च अडीच लाखांवर गेला आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्नाचे गणित सातत्याने व्यस्त आहे. अशातच रविवारी (ता. २६) झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने दाणादाण उडविल्याने सारे काही होत्याचे नव्हते झाले आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ११ हजार ५९७ हेक्टरवर नुकसान आहे. त्यात पंचनामे झाल्यानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी संपूर्ण, तर अनेक ठिकाणी निम्म्याहून अधिक द्राक्ष बागा व मालाचे अतोनात नुकसान झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी केलेला ५०० कोटींच्या उत्पादन खर्च अधांतरी आहे. तर आता फक्त बागांचे सांगाडे उभे आहेत.

गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यापूर्वी वार्षिक पिकात अनेकदा पूर्ण हंगाम हातातून गेला तरीही संकटांशी दोन हात करीत आहे. मात्र सततच्या फटक्यांनी शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.

द्राक्ष उद्योग कधी गारपीट, कधी वादळी वाऱ्यासह पाऊस, नोटबंदी, नंतर कोरोनामुळे प्रभावित बाजारपेठ अशा नानाविध संकटांनी अडचणीत सापडला आहे. यापूर्वी पाण्याची टंचाई असताना २००९ मध्ये ऐन द्राक्ष लगडण्याच्या अवस्थेत फयान वादळाने होत्याचे नव्हते केले होते, त्याची वेदनादायी आठवण या आलेल्या संकटांनी झाली आहे.

Vineyard Damage
Hailstorm Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने पिके जमीनदोस्त

कसमादे भागात पूर्वहंगामी द्राक्ष बागा काढण्यासाठी सुरुवात झाली होती, अशातच नियमित हंगामातही पुढील महिन्यात खुडे सुरू झाले असते. यंदा समाधानकारक पाऊस नव्हता, तरी यापूर्वी वातावरण मोकळे असल्याने स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले असताना गारपिटीने द्राक्ष मण्यांना नव्हे; तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तडे गेले आहेत.

सप्टेंबरमध्ये छाटणी केलेल्या बागांमध्ये आता द्राक्ष मण्यात पाणी उतरण्यास सुरुवात झाली होती. तर रंगीत वाणांच्या बागांमध्ये मण्यांना रंग येऊ लागला होता. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे एका रात्रीत द्राक्ष मालासह बागांचा बेरंग झाला आहे. अनेक ठिकाणी फुलोरा व दोडा अवस्थेतील बागांमध्ये झड होऊन बोधावर पाने व कोवळ्या घडांचा सडा पडल्याची भयाण परिस्थिती आहे.

द्राक्ष बागेत कोवळ्या घडांचा साचला थर

मुसळधार पावसाचे टपोरे थेंब व गारपिटीचा फटका यामुळे अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचे पाने झडून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी द्राक्षवेलीला फक्त काड्या उरल्या आहेत. बोधावर द्राक्षमणी व कोवळ्या घडांचा थर साचला आहे. गारांच्या फटक्यात घड तुटून पडले व मण्यांना इजा होऊन सड सुरू झाली आहे.

त्यामुळे माल वाचणार नाही, आता फक्त बागांना काड्या उरल्या आहेत. हे मोठे संकट आहे, द्राक्ष शेती संपविते की काय? अशी गंभीर परिस्थिती आहे, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी बोलताना सांगितले.

...तरच अशा संकटांवर मात करणे शक्य होईल

झालेले नुकसान गंभीर आहे; मात्र ज्या ठिकाणी नुकसान आहे, त्याची पातळी पाहून त्या अनुषंगाने उपाययोजना करून या संकटातून बाहेर येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हार न मानता आता हवामान बदलांच्या अनुषंगाने नियोजन करावे लागेल. हवामान बदलाचे फटके थांबविता येणार नाही.

मात्र शासनाने त्या अनुषंगाने उपाययोजनांसाठी ताकद देण्याची गरज आहे. क्रॉप कव्हर व हवामान बदलाला अनुकूल वाण यासाठी शासनाने खर्च तरतूद करण्याची गरज आहे, तरच अशा संकटांवर मात करणे शक्य होईल, असे मत सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले.

Vineyard Damage
Crop Damage : पाऊस, जोरदार वादळामुळे पिकांचे नुकसान

नुकसानीची स्थिती अशी...

- निफाड, चांदवड तालुक्यांत गारपिटीमुळे जवळपास ४० हून अधिक गावांत जवळपास १०० टक्के द्राक्ष बागांचे नुकसान.

- निर्यातक्षम द्राक्ष बागा, वायनरी बागांचे गारपिटीच्या भक्ष्यस्थानी.

- रोगात डाऊनी, भुरी व करपा रोगाचा तर थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढवून नुकसान वाढ.

- कीड, रोगांच्या प्रादुर्भावामुळे एकरी ३० हजार रुपये पीक संरक्षण खर्च वाढला.

- हंगाम हातातून जाऊनही द्राक्ष वेली व काड्यांना इजा झाल्याने बागांची पुढील स्थिती बिकट असल्याने पुढील दोन वर्षे अडचणी.

- अनेक भागांत अद्याप बागेत पाणी असल्याने फवारण्या करताना अडचणी.

तालुकानिहाय नुकसान :

तालुका...नुकसान क्षेत्र (हेक्टर)

सटाणा...४४४

नांदगाव...२४.१०

कळवण...६

दिंडोरी...२,५३२

नाशिक...४१०

निफाड...६,८७०

चांदवड...१,२५०

येवला...६१.२०

सुपारीहून मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने द्राक्ष माण्यांना जोराचा मर लागला. घडातील मण्यांना तडे जात असल्याने नुकसान वाढण्याची शक्यता आहे. लाखो रुपयांचा खर्च करून निर्यातक्षम बागा स्थानिक व्यापाऱ्यांना देण्याची वेळ येणार आहे. नुकसानीचे हे चौथे वर्ष आहे. अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येईल, की निफाड तालुक्यात द्राक्ष बागा पाहायला मिळणार नाही.
- श्रीकांत पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, चितेगाव, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com