Agriculture News : राज्यातील विकास सेवा संस्था संगणकीकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान यावर राज्यातील अनेक गावात सेवा संस्थांवर आता संगणकीकरण बसवण्यात आले आहे. यामुळे गावातील सेवा सोसायटींमध्ये बुकवर चालणारे काम आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. तसेच अन्य कामेही ऑनलाईन पद्धतीने व्यवहार सुरू झाले आहेत. या संस्था गावातच शेतकऱ्यांना १५१ सेवा पुरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पूर्वी केवळ रासायनिक खते पुरवणारी गावपातळीवरील विकास सेवा संस्था सध्या नवे रूप घेऊन समाजासमोर आली आहे. वीज बिल भरणा करणे, आॕनलाईन बँकेचे व्यवहार करणे याचबरोबर गावातील सभासदांसाठी उपयुक्त गरजेच्या सेवाही या संस्था पुरवणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असणाऱ्या सेवा संस्था शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
या संस्था गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण करतात. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सेवा संस्थांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो. गेल्या दोन महिन्यांत प्रत्येक गावातील विकास सेवा संस्थेच्या कार्यालयात नवे संगणक, प्रिंटर, इंटरनेट उपकरणे दाखल झाली आहेत. सहकारी सेवा संस्थांचे दप्तरही संगणीकृत झाले असून, त्या अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रत्येक गावातील सेवा संस्थांचा पारंपरिक लूक आता बदलला असून, त्या आधुनिक होत आहेत.
ग्रामीण भागात पूर्वीपासून सेवा संस्थांचे योगदान चांगले आहे. जेव्हा मित्रखताची शेतकऱ्यांना गरज असे, तेव्हा सोसायटीत खत उपलब्ध व्हायचे. अलीकडच्या काळात सेवा संस्थेतून पीक कर्ज घेऊन शेतकरी रासायनिक खते, बी-बियाणे रोखीने घेऊ लागले. सेवा संस्थेतून शेती पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला.
जेव्हा जेव्हा कर्जमाफी झाली, तेव्हा सामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. सेवा संस्था शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या आधार संस्था आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे गावे जगाशी जोडली जात आहेत. अशावेळी विकास सेवा संस्थांकडून सभासद शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा वरदान ठरणार आहेत.
गावोगावच्या विकास सेवा संस्था शासनाच्या मदतीने संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काळात सामान्य सभासदांना गावच्या सेवा संस्थेतून अधिक चांगल्या व आॕनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहेत. सेवा संस्थेच्या सभासदांसाठी ही चांगली बाब असल्याची माहिती सेवा संस्थांच्या संचालकांकडून देण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.