Farming Technique : अकोला शहपारासून १० ते १२ किलोमीटरवरील मासा (ता. जि. अकोला) गावातील दिनेश फाले यांची एकत्रित कुटुंबाची ५० एकर शेती आहे. अजय या धाकट्या भावासोबत ते पूर्णवेळ शेती करतात. तर बंधी संतोष व पंकज नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात.
अकोला तालुक्यात खारपाणपट्ट्याचे क्षेत्र अधिक आहे. दिनेश यांच्या शेतीचा समावेश मात्र त्या भागात येत नाही. त्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांच्या उत्पादनात त्यांनी चांगलाच हातखंडा तयार केला आहे.
मित्राने दाखवला लसूण शेतीचा मार्ग
दिनेश यांची काही जमीन डोंगराळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाची आहे. त्यात त्यांनी डाळिंबाची लागवड केली. मात्र दर कमी मिळाल्याने व काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना ही बाग अधिक काळ ठेवताआली नाही. त्या वेळी मराठवाड्यातील एका डाळिंब उत्पादक मित्राने त्यांना लसूण लागवडीचा सल्ला दिला.
शिवाय अडीच क्विंटल बेणे देण्याचीही तयारी दर्शविली. विदर्भात लसूण लागवड फारशी पाहण्यास मिळत नाही. मात्र सारासार विचार करून दिनेश यांनी २०२० मध्ये लसूण लागवडीचे धाडस केले. मित्राच्याच मार्गदर्शनातून व्यवस्थापनही केले. त्या वर्षी एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादनही मिळाले.
दरम्यान, तो कोरोनाचा काळ असल्याने विक्रीवर मर्यादा आल्या होत्या. अशावेळी तत्कालीन कृषी सहायकाकडून दिनेश यांना ग्राहक तयार करून देण्यात आले. त्यामुळे थेट विक्री होऊन दरही चांगले मिळाले. हा अनुभव उत्साहवर्धक ठरला. मग पुढील वर्षीही या शेतीत सातत्य टिकवले. यंदाचे लागवडीचे चौथे वर्ष आहे.
...असे आहे लसूण शेतीचे तंत्र
सुरुवातीला अडीच एकर लसूण क्षेत्र होते. त्यानंतर ते पाच एकरांवर नेले. परंतु दराचा फटका बसल्याने नंतर ते कमी केले. यंदा हे क्षेत्र चार एकर आहे. जमीन निचऱ्याची आहे.
दरांची जोखीम कमी करण्यासाठी यंदा तीन टप्प्यांत लागवड. २५ सप्टेंबरमध्ये दीड एकर. त्यानंतर २५ ऑक्टोबरमध्ये दीड एकर व एक नोव्हेंबरमध्ये एक एकर.
पहिल्या लागवड टप्प्यातील लसूण गाठी परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसणाची उगवण झाली आहे. टप्प्याटप्प्याने लागवड करण्याचा दुसरा फायदा म्हणजे मजूरबळही उपलब्ध होत राहते. त्याची टंचाई भासत नाही.
सुरुवातीला जे बियाणे आणले होते त्यापासून उत्पादन व बियाणे वापर होतो. त्यामुळे दरवर्षी बियाणे आणण्याचा खर्च करावा लागत नाही.
ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने गादीवाफे (बेड) तयार करून मजुरांकरवी टोकण पद्धतीने लागवड. यामुळे उगवण चांगली होत असल्याचे दिनेश सांगतात.
हे सुमारे पाच महिन्यांचे पीक आहे. थंडीच्या काळातच पीक तयार होत असल्याने विदर्भातील या भागातील उष्णतेच्या झळा लसणाला सहन कराव्या लागत नाहीत. परिणामी, चांगले उत्पादन मिळू शकते.
पाकळ्या जाड, लांब असलेल्या व लसणाचा पांढरा शुभ्र रंग असलेल्या वाणाची निवड. त्यामुळे दर अधिक मिळतो असा दिनेश यांचा अनुभव. एकरी अडीच क्विंटलपर्यंत बियाणे लागते.
चोख पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे. त्यादृष्टीने एक विहीर व बोअर यांच्या साह्याने ठिबक वा रेनपाइपद्वारे पाणी देतात. त्यामुळे पिकाला एकसमान पाणी मिळून जमीनही भुसभुशीत राहते. एकूण पीक कालावधीत १० ते १२ वेळा पाणी.
बेसल डोसमध्ये ‘एनपीके’ यांच्यासह दाणेदार गंधकाचा एकरी १० किलो याप्रमाणे वापर.
थ्रिप्स (फुलकिडे) व रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर.
लसणाचा बेवड पुढे खरिपात कापूस व सोयाबीनसाठी चांगला असल्याचे दिनेश सांगतात.
उत्पादन व लसणाचे ‘मार्केटिंग’
एकरी ३० ते ४० क्विंटलपर्यंत उत्पादनक्षमता साध्य केली आहे. मागील वर्षी अडीच एकरांत सुमारे १०० क्विंटल उत्पादन हाती गवसले आहे. दिनेश सांगतात, की माझा लसूण पांढराशुभ्र व दर्जेदार असल्याने ग्राहक थेट घरातून घेऊन जातात. सुमारे ४०० ते ५०० ग्राहक जुळले आहेत.
कुणी चार किलो, पाच ते दहा किलो अशी खरेदी आपल्यासाठी व नातेवाइकांसाठी करतात. एक किलोचे जाळीदार प्लॅस्टिकचे पॅकिंग केले आहे. अकोला, अमरावती, नागपूरच्या ग्राहकांपर्यंत माझ्या शेतातील लसूण पोहोचला आहे. काही प्रमाणात बाजार समितीतही विक्री होते. जवळच काही होटेल्स असल्याने त्या आसपास थेट छोटे विक्री केंद्र सुरू करून तेथूनही ग्राहक लसणाची थेट खरेदी करतात.
मिळालेले दर
सन २०२१ मध्ये तीन एकरांत लागवड होती. त्या वेळी प्रति किलो १०० ते १२५ रुपयांदरम्यान दर मिळाले. सन २०२२ मध्ये किलोला केवळ ३० ते ३५ रुपये दराने विक्री करावी लागली. मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये तीन एकरांतील लसणाला किलोला १५० ते २०० रुपयांदरम्यान व काही स्थितीत २५० ते ३०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला आहे.
अर्थकारण उंचावले
दरवर्षी प्रत्येकी १५ एकर सोयाबीन व कपाशी व दहा एकर तूर असते. रब्बीत कांदा बीजोत्पादन, गहू, हरभरा असतो. यंदा आले पिकाचाही प्रयोग केला असून, त्याचे पीक उत्कृष्ट असल्याचे दिनेश सांगतात. सोयाबीन, कपाशीत तणनाशकाचा वापर असल्याने निंदणीचा खर्च बंद झाला आहे. अलीकडील वर्षांत हंगामी पिके व लसूण शेतीतून मोठ्या प्रमाणात अर्थकारण बदलल्याचे दिनेश सांगतात. त्यातून शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली. कुटुंबातील मुलांचे शिक्षण झाले. घर बांधकाम झाले. ट्रॅक्टर खरेदी, शेतीसाठी सिंचन सुविधा अशी विविध कामे झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.