
Seema Deo Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे गुरुवारी (ता. २४) सकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. त्या गेली बरीच वर्षे आजारी होत्या. त्या त्यांचा छोटा मुलगा अभिनय देव याच्यासोबत राहत होत्या. सीमा यांनी ८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले होते.
फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे पती अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले होते. आता त्यानंतर दीड वर्षातच सीमा यांचेही निधन झाले. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याची भावना त्यांचा मोठा मुलगा आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.
सीमा रमेश देव यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. त्यांचे बालपण मुंबई येथील गिरगाव परिसरात गेले. तेथेच राममोहन इंग्लिश स्कूलमधून त्यांनी इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातून समूहनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्या नलिनी सराफ यांनी कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी चित्रपटांमध्ये प्रवेश केला. ‘आलिया भोगासी’ हा नलिनी सराफ यांचा पहिला चित्रपट.
यात त्यांचे सहकलावंत होते रमेश देव. पुढे यांनी आपले मूळ नाव सोडून ‘सीमा’ हे नाव धारण केले. ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या. पुढे रमेश देव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला.
सीमा देव या अल्झायमर आजाराशी झुंज देत होत्या. अजिंक्य यांनी काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली होती. अजिंक्य म्हणाले, की आज माझ्या आईचे, सीमा देव यांचे निधन झाले. आज सकाळी ७ वाजता ती गेली. पण गेली तीन चार वर्षे ती आजाराशी झुंज देत होती आणि पूर्ण विस्मृती झाली होती तिला.
बाबांना जाऊन आता दीड वर्ष होत आले होते आणि आईला काही आठवत नसे ती सगळे विसरून गेली होती. आज आता असे झालेय की दोघेही नाहीत आणि त्यांच्या जाण्याने एवढी मोठी पोकळी कुटुंबात निर्माण झाली आहे की मी बोलू नाही शकत सांगू नाही शकत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.