Vegetable Advisory : भाजीपाला सल्ला

Vegetable Management : सध्या उन्हाळी भाजीपाला पिकांचा हंगाम सुरू आहे. तापमानही शिगेला पोहोचले आहे. अशावेळी पाणी आणि पीक संरक्षणाकडे अधिक लक्ष देऊन पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
Vegetable
VegetableAgrowon

मंजाबापू गावडे

Vegetable Farming : मार्च व एप्रिल हे महिने अति उन्हाचे आणि प्रखर सूर्यप्रकाशाचे असतात. या काळात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते. जमिनीतील पाणी झपाट्याने कमी होते. त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थपन अतिशय महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात अन्य पिकांबरोबर भाजीपाला पिके घेतल्यास आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरतात असा अनुभव आहे.

उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता मर्यादित असते. अशावेळी कमी पाण्यावर, कमी कालावधीत येणारी पालक, मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत, करडई, तांदुळजा अशी पिके किफायतशीर ठरतात. भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, दुधीभोपळा, कारले, दोडके, घोसाळे, पालक, मेथी आदींची लागवड उन्हाळी हंगामात मुख्यतः होते. मिश्र व आंतरपीक पद्धतीत तसेच शेडनेट किंवा पॉलिहाउसमध्ये भाजीपाला पिकांची लागवड केल्यास कमी क्षेत्रामध्ये चांगल्या गुणवत्तेचे अधिक उत्पादन घेता येते.

Vegetable
Vegetable Cluster : जुन्नरला रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारणार - अजित पवार

उन्हाळ्यात अधिक तापमानाचे परिणाम व उपाययोजना

टोमॅटो

वाढलेल्या तापमानामुळे टोमॅटोची पाने करपतात. नव्या शेंड्याची वाढ थांबते. फळावर चट्टे पडतात. ती खराब होतात. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

उपाय : रात्रीच्या वेळी कमी तापमान असताना पाणीपुरवठा करावा. पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पांढरी माशी, मावा, तुडतुडे याचे नियंत्रण करावे. त्यासाठी इमिडॅक्लोप्रीड (७० टक्के डब्लूजी) १ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

भेंडी

उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण पडल्यास पीक सुकते. झाडे पिवळी पडतात. रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो.

उपाय : पाणीपुरवठा सायंकाळी कमी तापमान असताना करावा. पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. रस शोषक किडीचे नियंत्रण करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूजी) किंवा फ्युपायरॅडीफ्युरॉन (१७.०९ एसएल) २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

मिरची

प्रामुख्याने फुलगळती होते. त्यामुळे फळधारणेवर विपरित परिणाम होतो. पांढरी माशी, फुलकिडे आदींमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाण्याचा ताण पडल्यास पिके सुकतात.

उपाय : शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल (५ एससी) २ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. किंवा फेनप्रोपॅथ्रीन (३० टक्के ईसी) अर्धा मिलि किंवा पायरीप्रोक्झीफेन (१० टक्के इईसी) पावणेदोन मिलि प्रति ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Vegetable
Vegetable Market : उन्हाचा तडाख्यात भाजीपाला पिकावर परिणाम, भाज्यांच्या दरात वाढ

वांगी

कोवळी फूट करपते. फुलगळ होते. फळावर उन्हामुळे चट्टे पडतात. रस शोषक किडीचा तसेच फळे पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव होतो.

उपाय : शक्यतो रात्रीच्या वेळी कमी तापमानात पाणीपुरवठा करावा. पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (२५ टक्के ईसी) अर्धा मिलि किंवा डायफेन्थ्युरॉन (५० टक्के) सव्वा ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस दोन मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ एससी) अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

काकडी

काकडीची पाने करपतात. फुलगळ होते. फळाची चव कडवट होते. पिकास पाण्याचा ताण पडल्यास पिके सुकतात. रस शोषत किडींचा प्रादुर्भाव होतो

उपाय : पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो रात्रीच्या कमी तापमानामध्ये पाणीपुरवठा करावा. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यूजी) अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कारली, दोडका, घोसाळी

या वेलवर्गीय पिकांची फुलगळ होते. पाने करपतात. नवी वाढ थांबते. रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो

उपाय : पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाणीपुरवठा रात्रीच्या वेळी करावा. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड (७० टक्के डब्ल्यूजी) अर्धा मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मंजाबापू गावडे, ९४२२९ २२०६० (उद्यानविद्या, मध्यवर्ती रोपवाटिका, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com