Foxtail Millet : वरी ः एक आरोग्यदायी धान्य

Millet Production : भरड‌धान्यांना श्रीधान्य, तृणधान्य असे देखील म्हटले जाते. गहू, भात या पिकांच्या माध्यमातून हरित क्रांती झाली आणि भरडधान्ये हळूहळू मागे पडत गेली.
Vari
VariAgrowon


श्रीकांत कर्णेवार, स्नेहल नाणेकर

Millet Crop : भरड‌धान्यांना श्रीधान्य, तृणधान्य असे देखील म्हटले जाते. गहू, भात या पिकांच्या माध्यमातून हरित क्रांती झाली आणि भरडधान्ये हळूहळू मागे पडत गेली. याचा कळत नकळत परिणाम आपल्या आरोग्यावर झाला. भरडधान्ये आपल्या आरोग्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. भरडधान्य खाताना त्यांना अगोदर कमीतकमी सहा तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे. धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. याचा परिणाम म्हणजे वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी व्यायाम, राहणीमान, खाण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे.भरडधान्य आपल्याला अन्नसुरक्षा देतात, त्याचबरोबरीने पोषण सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा, पर्यावरण संवर्धनाची सुरक्षा देखील पुरवतात. यापैकीच एक महत्त्वाचे पीक म्हणजे वरी.


वरी पिकाचे महत्त्व ः
१) वरीचे शास्त्रीय नाव पॅनिकम मिलिएसियम आहे. हे पीक गवत वर्गीय आहे. हे महत्त्वाचे भरडधान्य आहे.
२) चीन, भारत, नेपाळ, रशिया, युक्रेन तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये या पिकाची लागवड होते. भारतात तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पंजाब या राज्यात वरी लागवड होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, नगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, धुळे, पालघर, रायगड जिल्ह्यात या पिकाची लागवड केली जाते.
३) साधारण शंभर ग्रॅम वरीमध्ये १२.५ ग्रॅम प्रथिने, ७०.४ ग्रॅम कर्बोदके, ८ मिलीग्रॅम कॅल्शिअम, २.९ मिलीग्रॅम लोह, २०६ मिलीग्रॅम फॉस्फरस आहे.
४) वरीचे तांदूळ पचायला हलके असतात. हे पौष्टिक व सत्वयुक्त धान्य आहे. उपवासाला आपण साबुदाणा, बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ खातो, त्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. परंतु वरीचा भात, भाकरी खाल्याने पित्त होत नाही.
५) सूप, सॅलडमध्ये वरीचा वापर होतो. ब्रेड, आंबवलेले पदार्थ, पास्ता, नूडल्स इत्यादी बनवण्यासाठी वरी वापरतात. फळे आणि काजू मिसळून वरीची लापशी तयार करता येते. चपाती, डोसा किंवा इडली बनवण्यासाठी वरीचे पीठ वापरतात. वरी भाजून लाह्या तयार करतात.

Vari
Foxtail Millet : राळ्याचा भात खा आरोग्य वाढवा

महत्त्वाच्या जाती ः
१) महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने फुले एकादशी या जातीची लागवड करतात. ही जात १२० ते १३० दिवसात तयार होते. तर ओरिसामध्ये ओएलएम २०३, ओएलएम २०८, ओएलएम २१७, तमिळनाडू मध्ये टीएनएयू - १४५, टीएनएयू- १५१, टीएनएयू-२०२, मध्यप्रदेशमध्ये जेके ४, जेके ८, जेके ३६, बिहारमध्ये बीआर-७, गुजरात मध्ये जीव्ही १, जीव्ही २, अशा वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते.
२) महाराष्ट्रात वरी लागवड खरीपामध्ये होते. जुलैचा दुसऱ्या पंधरवड्यामध्ये लागवड केली जाते. साधारणपणे २०-२३ क्विंटल प्रति हेक्टरी धान्याचे उत्पादन मिळते. तसेच ५०-६० क्विंटल चारा मिळतो.

आरोग्यदायी उपयोग ः
१) वरीचे सूप आरोग्यदायी आहे. गहू किंवा कोणत्याही तृणधान्याचा विचार केला तर, तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५२.७ जो की तांदूळ आणि गव्हापेक्षा कमी आहे.
२) वरीमध्ये लेसीथिन नावाचे अमिनो आम्ल असते ते मज्जासंस्थेचे कार्य सुरळीतपणे पार पडते.
३) पेलाग्रा हा एक त्वचाविकार आहे. ज्यामध्ये त्वचा कोरडी, खडबडीत होते. हा त्वचाविकार नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. वरीमध्ये भरपूर प्रमाणात नियासिन असते. जे पेलाग्राला प्रतिबंध करण्यास मदत करते.
४) वरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे की
शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.
५) फ्री रॅडिकल्स त्वचेचा निस्तेजपणा आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी जबाबदार असतात. वरीचा आहारात समावेश केल्यास मधुमेहाचा धोका कमी होता.

६) वरीमध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशिअम असते जे रक्ता‌तील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आणि निरोगी इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते. हाडांच्या मजबुतीसाठी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ७) वरीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असून, पचनास हलकी आहे. भुकेचे शमन लवकर होते. वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात वरीचा वापर वाढविल्यास फायदा होतो.
८) लहान मुले, ज्येष्ठांसाठी अत्यंत पोषक आहे.जीवनसत्त्व, सूक्ष्मपोषकद्रव्यांनीयुक्त असल्यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि कार्य व्यवस्थित राहते. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. मानसिक आरोग्य चांगले राहणे, झोप शांत लागणे.
-------------------------------------------------------------
संपर्क ः श्रीकांत कर्णेवार,९४२२३०२५६९
(डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती,जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com