Vidarbha Citrus Revolution: विदर्भाचा व्हॅलेन्सिया! स्पेनसारखी संत्रा शेती आता महाराष्ट्रात करणे अशक्य नाही

Citrus Processing,: स्पेनच्या अत्याधुनिक संत्रा शेतीचा अनुभव घेत विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग उघडले जात आहेत. ‘सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकाराने टॅंगो संत्र्याच्या लागवडीसह शेती आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ करण्यावर भर दिला जात आहे.
Citrus
Citrus Agrowon
Published on
Updated on

विशाल लंगोटे

Smart Agriculture: स्पेनमध्ये शेती ही केवळ परंपरा नाही; तर ती विज्ञान, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानावर आधारित एक सुनियोजित उद्योग आहे. संपूर्ण स्पेनमध्ये टॅंगो वाणाच्या संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जागतिक पातळीवर फळांच्या ज्यूस प्रकारात सर्वाधिक खप हा टॅंगो वाणाच्या संत्र्याचा आहे. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे बी विरहित, गोड व अत्यंत रसाळ, एकसारख्या आकाराची, आकर्षक रंगाची व उत्तम टिकाऊपणा असलेली फळे. त्यामुळे या वाणाच्या फळांना बाजारात जास्त मागणी असते. ‘सह्याद्री फार्म्स''ने आता संत्र्याच्या टॅंगो वाणाची आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

‘बा बा, शेतीत एवढे कष्ट असतात, मी कधीच शेती करणार नाही...’ लहानपणी मी वडिलांना अनेक वेळा हे वाक्य ऐकवलेले होते. वडिलांचे तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे कष्ट, त्या कष्टाला कुठल्याही शाश्‍वत परताव्याची खात्री नाही, सोबत संकटांची न संपणारी मालिका अशा एक ना अनेक कारणांमुळे माझ्या मनात कळत नकळत शेती व्यवसायाबद्दल काहीशी अढी घर करून राहिलेली होती. त्यातून मग विषय निघेल तेव्हा वरती सांगितलेलं वाक्य आपसूकच माझ्या तोंडातून बाहेर पडत असे. वडिलांनाही सगळं समजत होतं. त्यांनी कधीही मी शेतीच करावी असा आग्रह धरला नाही. मला शिक्षणसाठी प्रोत्साहन देत राहिले. सुदैवाने मी अभ्यासात चांगला होतो. मी बी.ई, एम. टेक. अशा पदव्या घेतल्या. त्या जोरावर मग माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा कॉग्निझंट कंपनीत रुजू झालो. इथे नव्या तंत्रज्ञानाला जोडून घेणं मला शक्य झालं.

Citrus
Citrus Farming : नियोजन लिंबूवर्गीय फळबागेतील आंबिया बहराचे

नोकरी सुरू केल्यावर थोड्याच काळात आपण शिक्षण क्षेत्रात काम केलं पाहिजे, या विचाराने उचल खाल्ली. मी मग अमरावतीमधील एका शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि स्मार्ट सोल्यूशन्स या माझ्या आवडीच्या विषयांकडं माझं कायम लक्ष होतं. मात्र आतमध्ये एक अस्वस्थता जाणवत होती. मन शेतीकडे ओढ घेत होते. मात्र भावनिक विचार न करता आपल्यातील तंत्रज्ञ आणि शेतीचा कसा मेळ घालता येईल, आपल्या व्यावसायिक अनुभवाची जोड शेतीला कशी देता येईल, या दिशेने मी विचार करत गेलो. आणि एका टप्प्यावर मग मी पूर्ण वेळ शेतीत उतरण्याचा निर्णय घेतला. शेती केवळ स्वतःपुरती न करता शेती आणि तंत्रज्ञान यांचा संगम साधत शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग उभारणे हेच माझं अंतिम ध्येय ठरवलं. मी आधी स्वत:च्या ४७ एकर शेतीवर फोकस केला. शेतीत संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. पारंपरिक शेतीपेक्षा ‘स्मार्ट शेती' अधिक फायदेशीर आहे, हे प्रत्यक्ष अनुभवले.

शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याला वडिलांच्या काळानुरूप बदलत गेलेल्या विचारांचा भक्कम आधार होता. यामुळे आमच्या कुटुंबाची शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक विज्ञान, व्यवसाय आणि संधी बनली आहे. मात्र त्याच वेळी आपल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, याचा इतर शेतकऱ्यांप्रमाणे मलाही अनुभव येऊ लागला. त्यातल्या नेमक्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. नेमकी समस्या समजून घेणे, तिच्यावर संभाव्य उपाय काय असू शकतात, इतर कोणी त्याच्यावर कसे काम केले, यश मिळविले अशा प्रकारे विचार करणे हा दृष्टिकोन नोकरीत असताना मिळालेला होताच, त्याची अंमलबजावणी केली.

तंत्रज्ञानाचा अभाव, पिकाचा दर्जा, विस्कळीत पुरवठा साखळी, स्केल असे काही मुद्दे समोर दिसायला लागले. यावर मात करायची असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येणे व त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी या संकल्पनेचा पर्याय दिसायला लागला. दरम्यानच्या काळात ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष विलास शिंदे यांचा व ‘सह्याद्री’चा प्रवास समजून घेतला. आपल्याला पाहिजे असलेली वाट हीच आहे, हे मनाला पूर्णपणे जाणवले आणि आपण या वाटेवर यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्‍वासही आला. मग एल. एम. के. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून मूल्यवर्धित शेतीची वाट धरली. शेतीतील मूल्यवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणे या उद्दिष्टांबद्दल पहिल्या दिवसापासून स्पष्टता होती.

Citrus
Citrus Crop Disease Management : फायटोप्थोरा, कोलेटोट्रिकममुळे होणाऱ्या फळगळचे व्यवस्थापन

स्पेन अभ्यास दौऱ्याची संधी

मी नुकताच स्पेनला जाऊन तिथल्या फळ शेतीची बारकाईने माहिती घेतली. मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यामुळे मला ही संधी मिळाली. विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि ‘सह्याद्री फार्म्स’चे विलास शिंदे हे सुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे दौऱ्यात सहभागी असलेल्या प्रतिनिधींच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडून आला. आपण जगाच्या स्पर्धेत कुठपर्यंत धावू शकतो, याचा अंदाज आला. काही निरीक्षणं नोंदविता आली. आम्ही स्पेनमधील व्हॅलेन्सिया, कॉर्डोबा, सेव्हिल येथील संत्रा शेताला भेट दिली.

तिथे आधुनिक शेती पद्धतींची प्रगती प्रत्यक्ष बघता आली. त्याचबरोबर, जगातील उत्कृष्ट कृषी संशोधन व व्यवस्थापन अभ्यासक्रम असलेल्या सँटेल्मो बिझनेस युनिव्हर्सिटीला भेट देण्याची संधी मिळाली. त्यामुळे संत्रा शेतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेता आला. या अभ्यास दौऱ्यात एक हजार एकर क्षेत्रावर पसरलेल्या एरोमिलास या कंपनीच्या प्रगत संत्रा बागांची आणि अत्याधुनिक पॅकिंग फॅसिलिटीची पाहणी करता आली. त्यामुळे तंत्रज्ञानाधारित आणि बाजारपेठ-केंद्रित संत्रा शेती कशी केली जाते, हे जवळून पाहता आले. या अभ्यास दौऱ्यात मी आधुनिक शेती व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि बाजारपेठ-केंद्रित शेती धोरणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

संत्र्याचे टॅंगो वाण

संपूर्ण स्पेनमध्ये टॅंगो वाणाच्या संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जागतिक पातळीवर फळांच्या ज्यूस प्रकारात सर्वाधिक खप हा टॅंगो वाणाच्या संत्र्याचा आहे. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे बी विरहित, गोड व अत्यंत रसाळ, एकसारख्या आकाराची, आकर्षक रंगाची व उत्तम टिकाऊपणा असलेली फळे. त्यामुळे या वाणाच्या फळांना बाजारात जास्त मागणी असते.

‘सह्याद्री फार्म्स’ने आता संत्र्याच्या टॅंगो वाणाची आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना लवकरच ही संत्र्याची उत्तम जात उपलब्ध होणार आहे. राज्यातील व देशातील संत्रा शेतीसाठी हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. ‘सह्याद्री फार्म्स’ने नांदेड येथे आधुनिक सिट्रस प्रोसेसिंग प्रकल्प स्थापन केला आहे. त्यातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या आणि निर्यातीच्या संधी निर्माण होऊ शकतात. संत्र्यापासून ज्यूस, पल्प आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करून जागतिक बाजारात विक्री करता येईल.

पुढची वाटचाल

स्पेनमध्ये शेती ही केवळ परंपरा नाही; तर ती विज्ञान, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानावर आधारित एक सुनियोजित उद्योग आहे. हाच दृष्टिकोन घेऊन मी यापुढील काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं ठरवलं आहे. आपल्या शेतकऱ्यांना टॅंगो वाणाच्या संत्रा लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यावर माझा भर राहणार आहे. या उच्च-मूल्याच्या संत्रा जातीमुळे भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं आणि त्यातून निर्यातीच्या बाजारपेठेत आपली स्पर्धाक्षमता वाढू शकते हा सरळसाधा विचार त्यामागे आहे. बाजारपेठेतील संधी आणि कॉर्पोरेट कृषी व्यवसायाचा अनुभव लक्षात घेऊन मी पुढीलप्रमाणे माझे प्राधान्यक्रम निश्‍चित केले आहेत

संघटित पुरवठा साखळीचा विकास ः शेतकऱ्यांचा माल थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी आणि पारदर्शक काढणी पश्‍चात सुविधा व लॉजेस्टिक प्रणाली उभारणे.

मूल्यसाखळीच्या माध्यमातून उत्पन्नवाढ ः शेतकऱ्यांसाठी अधिक नफा मिळवून देण्यासाठी आधुनिक प्रक्रिया उद्योग, थेट विक्री प्रणाली आणि सहकारी व्यापार मॉडेल्स विकसित करणे.

उत्तम शेती पद्धतींसाठी प्रशिक्षण आणि सल्ला सेवाः शास्त्रोक्त शेती, सेंद्रिय शेती आणि बाजारपेठ-केंद्रित शेती धोरणांच्या बाबतीत शेतकऱ्यांना सक्षम करणे.

आंतरराष्ट्रीय व्यापार, निर्यात संधी विस्तार ः भारतीय शेतीमालाची गुणवत्ता सुधारून जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवणे.

डिजिटल आणि डेटा-ड्रिव्हन शेतीचा अवलंब ः हवामान, पाणी आणि खत व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान-आधारित निर्णयक्षम पद्धती राबवणे.

B2B आणि B2C मार्केटद्वारे थेट विक्री प्रणाली ः शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ आणि चांगली किंमत मिळवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे.

स्पेनच्या प्रगत शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण संत्रा शेतीत मोठा बदल घडवून आणू शकतो. व्हॅलेन्सिया हा संत्रा शेतीमुळे समृद्ध झालेला स्पेनमधील प्रांत. सह्याद्री फार्म्ससारख्या शेतकरी उत्पादक कंपन्या, नितीन गडकरी यांच्यासारखे धोरणकर्ते, विलास शिंदे यांच्यासारखे प्रोफेशनल्स आणि संत्रा पट्ट्यातील युवा शेतकरी यांनी हातात हात घालून काम केले तर विदर्भाचा व्हॅलेन्सिया करण्याची क्षमता निश्‍चितच आहे, एवढा आत्मविश्‍वास व भान मला या स्पेन वारीतून मिळाले.

स्पेनमधील संत्रा शेतीची वैशिष्ट्ये

स्पेनमध्ये हे सगळं पाहत असताना आपण संत्रा उत्पादक शेतकरी नेमके कुठं चुकतो आणि स्पेनमधील शेतकरी काय करतात, असा तुलनात्मक अभ्यास सहज होत गेला. महाराष्ट्रातील संत्रा बागायतदार करीत असलेल्या प्रमुख चुका लक्षात आल्या. लागवडीचे अंतर, पाण्याचे परिणामकारक नियोजन, जैविक कीड व्यवस्थापन, काढणीपश्‍चात व्यवस्थापनाचा अभाव या आघाड्यांवर आपण खूपच कमी पडतो.

स्पेनमधील संत्रा शेती पद्धतीचे प्रमुख घटक

संपूर्ण नियोजनावर आधारित लागवड आणि व्यवस्थापन. झाडांची उंची, त्यांची वाढ, फांद्यांची रचना, प्रकाशसंश्‍लेषणाची क्षमता, जमिनीची धूप आणि सिंचन व्यवस्था याचा विचार करून शेती केली जाते.

झाडांची योग्य छाटणी करत प्रकाश आणि हवेचे संतुलन राखणे.

भरपूर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी पूर्व-पश्‍चिम दिशेतील लागवड.

उंच बेडवर लागवडीमुळे मुळांसाठी उत्तम जलनियोजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा.

जैविक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅपचा प्रभावी वापर.

मातीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर.

तणनाशकाचा वापर टाळून नैसर्गिक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब.

काढणीपश्‍चात व्यवस्थापन आणि मार्केटिंग.

९०९६३९३२९३

(लेखक थुगाव पिंपरी (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील युवा शेतकरी असून एल. एम. के. शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com