Sugarcane Farming Technology : डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयोटी), ड्रोन, रोबोट, वेगवेगळ्या जैविक व अजैविक ताणांसाठी ऊस पिकाच्या संपूर्ण लागवड कालावधीमधील वर्णक्रमीय प्रतिमेचे संग्रहीकरण, सुदूर संवेदन-भौगोलिक माहिती प्रणाली-वैश्विक स्थान निश्चितीकरण प्रणालींचा समावेश आहे. तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी उपयोगी शाश्वत डिजिटल तंत्रज्ञान आणि साधने विकसित करण्यात येत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता
कोणत्याही क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे लागतात. याची गरज ओळखून कृषी विद्यापीठात मागील दहा वर्षांपासून यावर काम चालू आहे. त्यामध्ये विशेषतः ऊस पीक वेगवेगळ्या जैविक आणि अजैविक ताणामध्ये असताना त्याच्या हायपर स्पेक्ट्रल छायाचित्रे घेणे आवश्यक असते. सुरुवातीला हातात धरून स्पेक्ट्रो रेडिओ मीटरच्या साह्याने ही छायाचित्रे घेण्यात आली.
२०१९ पासून ड्रोनच्या साह्याने छायाचित्रे घेण्यात येत आहेत आणि उसासाठी हायपर स्पेक्ट्रल छायाचित्रांचा संग्रह करण्यात आला आहे. या छायाचित्रांचा उपयोग ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी करण्यात येणार आहे.मागील दहा वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर ऊस पिकासाठी संशोधनाचे प्रयोग घेण्यात आलेले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात एक सुसज्ज ड्रोन प्रयोगशाळा आहे. ड्रोनवर हायपर स्पेक्ट्रल आणि मल्टिस्पेक्टर कॅमेरे बसवलेले आहेत.
पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन
पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये कमीत कमी उत्पादन खर्चात, जमिनीचे आरोग्य सुधारून खोडवा उसाचे जादा उत्पादन व साखर उतारा मिळवता येतो. तसेच उसाचे दोनपेक्षा जास्त खोडवा घेण्यासाठी शून्य मशागत, शेतातील उपलब्ध पाचटाचे मूलस्थानी आच्छादन, शिफारशीनुसार रासायनिक खतमात्रा देण्यासाठी पहारीच्या अवजाराचा वापर, ठिबक सिंचनातून फर्टिगेशन, आंतरपिकांचा वापर तसेच एकात्मिक अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आहे.
या तंत्रज्ञानाच्या धर्तीवर कवठेपिरान (ता. मिरज, जि. सांगली) या गावासारखी अनेक खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करणारी गावे तयार झाली आहेत. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी महाविद्यालय, पुणे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सातारा जिल्ह्यातील सात साखर कारखान्याचे संयुक्त विद्यमाने एकरी १०० टन पर्यावरणपूरक खोडवा ऊस व्यवस्थापन प्रकल्प ३,०२५ शेतकऱ्यांच्या शेतावर २०२३-२४ मध्ये राबविण्यात आला.
या प्रकल्पाचा विस्तार सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ७,००० शेतकऱ्यांच्या शेतावर या वर्षी होत आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग अनुदानित प्रकल्पांतर्गत खोडवा उसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्यातील तीन साखर उतारा विभागातील १८ साखर कारखान्यांसाठी दीर्घकालीन मार्गदर्शिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट हवामान केंद्र
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग करत असताना हवामानाचा घटक महत्त्वाचा दुवा आहे. यासाठी विद्यापीठाने बाजारातील हवामान केंद्रावर अवलंबून न राहता स्वतःचीच स्मार्ट हवामान केंद्र विकसित केलेली आहेत. हवामान केंद्र हवामानाच्या घटकांबरोबरच काही विशेष घटकांचे सुद्धा निष्कर्ष देते, जे कृषी क्षेत्रातील विशिष्ट बाबींसाठी महत्त्वाचे ठरते.
फवारणीसाठी ड्रोनचा वापर
शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकावरती ड्रोनद्वारे फवारणीसाठी मोठ्या संधी आहेत. यासाठी विद्यापीठाने मागील तीन वर्षांपासून संशोधन हाती घेतले. वेगवेगळ्या खासगी कंपन्या यासाठी विद्यापीठाबरोबर करार करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.फवारणीसाठी ड्रोनला जरी भरपूर वाव असेल तरी फवारणी ड्रोनसाठी प्रमाणित शिफारशी उपलब्ध नाहीत. विद्यापीठातर्फे मोठ्या प्रमाणावर याबाबत संशोधन सुरू आहे. लवकरच वेगवेगळ्या पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणीसाठी शिफारशी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील.
प्रक्षेत्रावर ‘आयओटी’ तंत्रज्ञानाचा वापर
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ऊस पिकासाठी आयओटी, इन्व्हर्टेड स्पिंक्रलर आणि पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून एक आडसाली, दोन खोडवे अशी तीन पिके घेऊन संशोधन करण्यात आले. पाणी देण्यासाठी मृद् ओलावा संवेदके आधारित ठिबक सिंचनाचा उपयोग करण्यात आला. विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे खतमात्रा देण्यात आल्या.
इन्व्हर्टेड स्प्रिंकलर्स लावल्यामुळे उसाच्या कॅनॉपीवर सूक्ष्म हवामान तयार झाले जे उसाला पोषक ठरले आणि त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढण्यास मदत झाली. भारतामध्ये अशा प्रकारे ऊस पिकामध्ये प्रयोग पहिल्यांदाच महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात आला. प्रयोगामध्ये पहिल्या वर्षी सुरू उसाचे एकरी १०३ टन आणि दुसऱ्या वर्षी खोडव्याचे एकरी ९९ टन, तिसऱ्या वर्षी खोडव्याचे ७६ टन उत्पादन आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.