Agriculture AI : देशात शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर किफायतशीर ठरण्यासाठी ते पूर्णपणे भारतीय बनावटीचे असावेत. शिवाय ते कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे लागतील.
दे शात मजूरटंचाई उग्र रूप धारण करीत आहे. यांत्रिकीकरणामुळे मजूरटंचाईवर मात करता येईल, असे यंत्रे-अवजारे आपण थेट आयात केल्याने आपल्या शेतीत ती फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत. अलीकडे आपल्या येथील शेतीचे आकारमान, पीकपद्धतीनुसार काही यंत्रे-अवजारे बाजारात येत आहेत.
हे एकीकडे चालू असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर वाढू लागला आहे. ड्रोन हा त्याचाच एक भाग! ड्रोनची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख निर्माण होईल तसेच येत्या दीड दशकांत ड्रोनची बाजारपेठेतील उलाढाल चार लाख कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज नीती आयोगाने वर्तविला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरच्या महिला स्वयंसेवी साह्यता गटांना ड्रोन देण्याची योजना नुकतीच मंजूर केली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये पंधरा हजार निवडक महिला स्वयंसाह्यता गटांना आठ लाखांपर्यंतचे ड्रोन देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे. मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशात ड्रोनचा वापर वाढीसाठी स्वतंत्र निधीची तरतूददेखील करण्यात आली होती. असे असताना आपल्या देशात शेतीत ड्रोन्सचा वापर अजूनही प्रायोगिक तत्त्वावरच होतोय.
भारतात शेतीमध्ये पिकांवर कीडनाशकांची फवारणी, जमिनीचे तसेच पिकांचे मॅपिंग, निरीक्षण, सर्व्हेक्षण, नैसर्गिक आपत्तीत नुकसानीची पाहणी तसेच जमिनीच्या मूलभूत घटकांचे मूल्यांकन आदी कामांसाठी ड्रोन वापरले जाऊ लागले आहेl. ड्रोन व विविध प्रकारच्या सेन्सॉरच्या साह्याने जमिनीतील व पिकातील अन्नद्रव्यांची माहिती संकलित करता येते.
संकलित केलेल्या या माहितीचे एकत्रित विश्लेषण करून त्यानुसार पुढील नियोजन केले जाऊ शकते. विशेष म्हणजे ही सर्व कामे अतिजलद आणि अचूक होणार आहेत. एकंदरीत कमी वेळेत शेतीची अनेक कामे ड्रोनद्वारे होऊन उत्पादकता वाढ साधली जाऊ शकते. शेतीतील श्रमांची कामे आणि करावे लागणारे कष्ट यामुळे आज तरुण वर्ग शेतीपासून दूर जात आहे. हा वर्ग या नव्या डिजिटल, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शेतीकडे आकर्षित होऊ शकतो.
असे असले तरी ड्रोनचा भारतीय शेतीत वापराबाबत काही मर्यादा देखील आहेत. ड्रोन तंत्र महाग आणि वापरायला क्लिष्ट आहे. याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील अधिक आहे. ड्रोनला हवेत उडण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. शिवाय आपल्या देशातील ६० टक्क्यांहून अधिक शेती क्षेत्र जिरायती आहे.
हा शेती कसणारा ८० टक्क्यांहून अधिक शेतकरी अल्प-अत्यल्प भूधारक आहे. अशा शेतीत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पातळीवर ड्रोनचा वापर कितपत किफायतशीर ठरणार? हा येणारा काळच ठरवेल. आगामी काळात ड्रोनला मागणी वाढत गेल्यास बाजारात अनेक कंपन्यांचे ड्रोन येतील. परंतु देशात शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर किफायतशीर ठरण्यासाठी पूर्णपणे भारतीय बनावटीचे असावेत, शेतीत काम करण्यासाठी मोठ्या आकाराचे, अधिक क्षमतेचे ड्रोन लागणार असल्याने असे ड्रोन कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे लागतील.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे महिला असो की शेतकरी युवक यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. वैयक्तिक शेतकऱ्यांऐवजी शेतकऱ्यांचे गट, समूह, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांनी ड्रोन खरेदीसाठी पुढे यायला हवे. यांत व्यावसायिक उतरले तर ते यांत्रिकीकरणासारखा आपलाच फायदा बघतील, यातून शेतीत ड्रोन वापरण्याचा हेतू साध्य होणार नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.