
Tehran / Washington News : इराण-इस्राईल संघर्षात अमेरिकेने उडी घेत रविवारी (ता. २२) पहाटे इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बाँब टाकले. या हल्ल्यात या तिन्ही अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
यावर, इराणनेही प्रत्युत्तर देताना, ‘आता चर्चा करण्याची वेळ संपली असून आमचे संरक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे,’ असा इशारा दिला. त्यांनी इस्राईलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत काही प्रमाणात नुकसानही घडवून आणले. या घडामोडींमध्ये प्रादेशिक युद्धाचा भडका उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इस्राईलच्या हल्ल्यांना खुला पाठिंबा देतानाच इराणवर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता. या युद्धात थेट हस्तक्षेप करायचा की नाही, हे दोन आठवड्यात ठरवू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते. प्रत्यक्षात दोन दिवसही वाट न पाहता त्यांनी आज इराणमधील नातांझ, फोर्दो आणि इस्फहान या केंद्रांवर बाँबफेक केली.
जमिनीखाली असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर मारा करण्यासाठी अमेरिकेने ‘बी-२’ बाँबर विमानातून बंकर बस्टर या साडेतेरा हजार किलो वजनाच्या बाँबचा वापर केला. याशिवाय, अमेरिकेने पाणबुड्यांवरून ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचाही मारा केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनीच या हल्ल्याबाबतची माहिती सोशल मीडियावरून जाहीर करताना, ‘हे युद्ध संपविण्यासाठी इराणने आता तयार व्हावे’ असा इशाराही दिला. इराणने हल्ला झाल्याचे मान्य केले असले तरी माघार न घेता अणू कार्यक्रम थांबविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणवरील हल्ल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेने लढाऊ विमानांद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे अणुकेंद्रांमधून किरणोत्सर्ग झाला नसल्याचे इराणच्या अणुऊर्जा संघटनेने सांगितले आहे. या हल्ल्यात डोंगराळ भागात जमिनीखाली असलेल्या फोर्दो अणुकेंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याचे उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांतून दिसून आले आहे. शक्तिशाली बाँबस्फोटामुळे डोंगरही फुटल्याने अणुकेंद्रात जाण्याचा प्रवेशमार्गच बंद झाला आहे. त्यामुळे या केंद्राचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी इराणला हा सर्व मलबा बाजूला काढावा लागणार आहे.
इस्राईलवर हल्ले
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही तासांतच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या निमलष्करी दलाने इस्राईलवर ४० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इस्राईलमधील ८० हून अधिक जण जखमी झाले. तेल अविवमधील काही इमारती आणि रस्त्यांचेही या हल्ल्यात नुकसान झाले. मात्र, ज्या यंत्रणेद्वारे इराणने आज क्षेपणास्त्रांचा मारा केला, ती यंत्रणाच नंतर हल्ला करत नष्ट केल्याचा दावा इस्राईलने केला.
‘इस्त्रायल धार्जिण्या धोरणाचा त्याग करा’
अमेरिकेचा इराणमधील अणुकेंद्रांवरचा हल्ला म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असल्याचे सांगतानाच केंद्रातील मोदी सरकारने अमेरिका तसेच इस्त्रायल धार्जिण्या धोरणाचा त्याग करावा, असे आवाहन डाव्या पक्षांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक तणावात वाढ होईल. पश्चिम आशियात अस्थिरता वाढेल तसेच या घडामोडींचे आर्थिक जगतावर विपरित परिणाम घडून येतील, असे डाव्या पक्षांनी निवेदनात म्हटले आहे.
इराण अण्वस्त्रे तयार करण्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचा दावा करत अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ले केले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ल झाला आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचे उल्लंघन झाले आहे. इराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे अमेरिकन गुप्तचरांनी सांगितले होते. तरीही इराणवर हल्ला करण्यात आल्याचे डाव्या पक्षांनी म्हटले आहे. निवेदनावर माकप, भाकप, माकप एमएल, आरएसपी आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत.
दरम्यान एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील इराणवरील अमेरिकन हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचेच नव्हे तर स्वत:च्या देशातील कायद्यांचेही या हल्ल्याद्वारे उल्लंघन केले असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेची परवानगी न घेताच इराणममध्ये हल्ले करण्याचा आदेश दिला होता. तसेच, गरज पडल्यास आणखी हल्ले करू असेही त्यांनी सांगितले. ‘इराणने आता तरी शांतता कराराला तयार व्हावे. आता एक तर शांतता निर्माण होईल किंवा इराण उद्ध्वस्त होईल,’ असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.