
Mumbai News : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी (ता. ६) राज्यपाल सी. पी. राधानकृष्णन यांच्याकडे केली.
राजभवनावर सकाळी १० वाजता राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन मस्साजोग प्रकरणाची दाहकता मांडत मुंडे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार बजरंग सोनवने, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, विजय वडेट्टीवार, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांनी राज्यपालांसमोर राज्य सरकार कारवाईत चालढकल करत असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसाची भूमिकाही संशयास्पद आणि पक्षपाती असल्याचा आरोप केला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत सामाजिक सलोखा पद्धतशीरपणे बिघडवला आहे. जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या कारवायांत वाढ झाली असून राजकीय स्वार्थ आणि शक्तीचा गैरवापर केला जात आहे. खंडणी, अपहरण आणि इतर गुन्हे सर्रास होत आहेत. राजकीय प्रभावामुळे पोलिस व जिल्हा प्रशासन यात गुंतले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष छळ करून झालेली निर्घृण हत्या हे बीडमधील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदहारण आहे. खंडणीखोर वाल्मीक कराड याने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार धमकावले, तसेच त्याच्या माणसांनी कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. आता जनतेच्या दबावामुळे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर नाट्यमयरित्या आत्मसमर्पण केले. या प्रक्रियेत पोलिसांचा पक्षपातीपणा दिसून येतो. देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेपाची शक्यता लक्षात घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
सरकारवर विश्वास नाही म्हणूनच राज्यपालांना साकडे
राज्य सरकारकडून न्याय मिळत नाही म्हणून आम्ही राज्यपालांना साकडे घालण्यासाठी आल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी माध्यमांसमोर सांगितले. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की ही घटना जातीपातीच्या नजरेतून पाहू नये. बीडमध्ये मानवतेचा क्रूरपणे खून झाला आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडणार आहेत.
त्यामुळे आम्ही राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी आम्ही मागणी केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, की बीडमध्ये देशमुख यांचा गुंडांनी तर परभणीत सूर्यवंशी यांचा पोलिसांनी खून केला. या दोन्ही प्रकरणांत चौकशीसाठी न्यायाधीशांची नेमणूक केलेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.