
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून बुधवारी (ता. २) सायंकाळी अकोले, पारनेर, कर्जत, संगमनेर तालुक्यांत झालेल्या पावसाचा पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे शेतीपिकांसह फळपिकांचेही नुकसान झाले. काही भागांत गारपीट झाली. मिरजगावला तब्बल ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाने अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी (ता. २) सायंकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर, कर्जत, संगमनेर, जामखेड आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. कर्जतमधील मिरजगाव, माहिजळगाव, पारनेरमधील टाकळी, कान्हूर भागांत अधिक पाऊस होता.
विजेच्या कडकडाटासह अकोले तालुक्यात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांचा काढलेला कांदा, हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाले. अकोले, राजूर, माळेगाव, रंधा, वाकी, पिंपरकणे, मानिकोझर, रुंभोडी, इंदोरी या भागांतही कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. होळीनंतर गावागावांतील यात्रा सुरू असून, गोंदोशी, वांदुलशेत, भंडारदरा येथील यात्रेमध्ये पाऊस झाल्याने एकच गोंधळ उडाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
शेतकऱ्यांनी आपली जनावरे झाडाखालून आपल्या वस्तीवर स्थलांतरित केली, तर खळ्यावर असणारी पिके सुरक्षित राहण्यासाठी त्याच्यावर ताडपत्री प्लॅस्टिक कागद टाकून ती झाकण्यात आली होती. संगमनेर तालुक्यातील पठार भागात पाऊस, गारपिट झाली. काढणीला आलेल्या गव्हासह अन्हाळी पिके, कांदा, आंब्यासह अन्य फळपिकांना या पावसाचा फटका बसला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पारनेरमधील टाकळी आणि कान्हूर महसूल मंडलात प्रत्येकी २८ मिलिमीटर, कर्जतमधील कर्जत मंडळात १२, मिरजगाव मंडळात ४४, माहिजळगाव मंडळात १८, वालवड मंडळात १२, कोरेगाव मंडळात १२, जामखेडमधील अरणगाव मंडळात ८, अकोलेतील विरगावात १०, मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ः थोरात
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यासह पठारभागात बुधवारी (ता. २) विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पठारभागावरील नांदूर-खंदरमाळ गावाला अक्षरशः अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले आहे. हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक, वाटाणा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा खच साचला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.