Unseasonal Rain Damage : मराठवाड्याला अवकाळीचा तडाखा ; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Marathwada Weather : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील काही भागात गुरुवारी (ता. ३)दुपारनंतर अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला.
Crop Damage
Crop LossAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील काही भागात गुरुवारी (ता. ३)दुपारनंतर अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. बीड जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर जालना व बीड मध्येही वीज पडल्याने काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. वादळी पावसामुळे झाडे उन्हाळून पडण्यासह वीजपुरवठाही खंडित होण्याचा प्रकार झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी, कन्नड, चिकलठाणा, नागद, चापानेर, देवगाव रंगारी, गोंदेगाव, तितुर, हनुमंतखेडा, बनौटी, घोरकुंड, वरठाण, तिडका, घोसला, नांदगाव, बोरमाळा तांडा, करमाड, लासुर स्टेशन, निल्लोड, सिल्लोड शहरासह धोत्रा, पानवडोद बुद्रुक, पानवडोद खुर्द, खुलताबाद तालुक्यांतील सुलतानपूरसह परिसरात बिडकीन परिसरातील नीलजगाव, दोरखेडा, चिंचोली, पारोळा, मारोळा, चितेगाव, शेकटा, रांजणगाव खुरी, वैजापूर तालुक्यातील नारळा, पारोळा, गारज, खंडाळा, परसोडा, धोंदलगाव, झोलेगाव, मनुर,पोखरी, गारज, बाभूळगाव, लोणी खुर्द, तलवाडा, शिऊर, वाकला आदी ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.करमाड परिसरातील गहू, बाजरी, मका, आदी पिके आडवी झाली.

Crop Damage
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे हापूस डागाळण्याची भीती

या परिसरातील कुंभेफळ, शेंद्रा कमंगर, लाडगाव, सटाणा, हिवरा, जडगाव, भांबर्डा, दुधड आदी ठिकाणी पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यातील धोत्रा पानवडोद बु., पाणवडोद खुर्द परिसरात तुरळक गारपीट झाली. कन्नड तालुक्यातील शिवराई, बहिरगाव, डोनगाव, दाभाडी या भागात गारपीट झाली. देवगाव रंगारी गल्ले बोरगाव रस्त्यावर लिंबाचे झाड कोसळले. सोयगाव तालुक्यात सायंकाळी विजांसह तासभर वादळ होते. तालुक्यांतील गोंदेगाव पट्ट्यात दहा गावात अवकाळी पाऊस झाला.

जालना शहरात सायंकाळच्या सुमारास पाऊण तास जोरदार पाऊस झाला भोकरदन तालुक्यातील पारद परिसरात वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला त्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मका पीक आडवे झाले. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रूक परिसरातही अवकाळी पाऊस झाला. इब्राहिमपूर येथील पार्वताबाई कोल्हे, श्रीरंग कोल्हे, दिलीप भेडरवाल यांच्या शेतातील मक्याचे पीक वादळी पावसामुळे आडवे झाले.

मंठा तालुक्यातील उसवद येथे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहागडसह परिसरातील पाथरवाला बुद्रूक, वाळकेश्र्वर, कुरण, गोरी, गंधारी, महाकाळा आदी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी, शेतामध्ये उभे असलेले व काढणीला आलेल्या गहू, बाजरी, चारा पावसामुळे भिजून नुकसान झाले.

Crop Damage
Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना फटका

घाटनांदुर परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. घाटनांदूर परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. सिरसाळा परिसरात अवकाळी पावसाची अर्धा तास तुफान बॅटिंग होती. शिरूरकासार, वडवणी तालुक्यात पाऊस झाला. अंबाजोगाईतही पाऊस झाला. परळी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यावेळी विजांचा लखलखाटही सुरू होता. धानोरा परिसरात पाऊस झाला.माजलगाव परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. घाटनांदूर परिसरात पुन्हा रात्री दहा वाजल्यापासून मेघगर्जनेसह पाऊस झाला. बीडमध्ये रिमझिम पाऊस झाला. किल्लेधारूर परिसरातही रात्री जोरदार पाऊस झाला.

पावसामुळे जिवितहानी...

बीड जिल्ह्यातील केकनवाडी शिवारात वीज पडून झाडाखाली बसलेल्या देविदास शहाजी केकान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली गायही या घटनेत दगावली.

कन्नड तालुक्यातील कुंजखेडा शिवारात शरीफ खा सरदार खा यांनी झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडून बैलाचा मृत्यू झाला.

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे पावसादरम्यान वीज पडून शेतकरी विलास पंडित मगर यांची गाय दगावली.

वरुड बुद्रुक येथील शेतकरी अनिल वाघ यांच्या शेतात वीज पडून

त्यांचे दोन बैल दगावले.

दानापूर येथे विठ्ठल दळवी यांच्या शेतात वीज पडून एक बैल दगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com