
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाने सुमारे १२ हजार आठशे हेक्टरवर नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता. २६) झालेल्या एका दिवसाच्या पावसाने साडेतीन हजार हेक्टरवर नुकसान झाले. महिनाभरात साधारण २४ हजार शेतकऱ्यांना अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला आहे. पंचनामे सुरु असल्याने नुकसानीच्या आकड्यात भर पडू शकते असे दिसतेय.
अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरापासून सातत्याने अवकाळी आणि पूर्वमोसमी पाऊस झाला. मध्यंतरीच्या काळात जोरदार पाऊस झाला. सुमारे तीसपेक्षा अधिक मंडळात अतिवृष्टी झाली. अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर तालुक्यातील सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. महसुल, कृषी विभागाने पंचनामे केले आहे.
आतापर्यंत १२ हजार आठशे हेक्टरवर नुकसान झाले. मंगळवारी (ता. २६) झालेल्या एका दिवसात १६७ गावांत ६ हजार ६५५ शेतकऱ्यांचे ३ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यात एकट्या अहिल्यानगर तालुक्यात ३३९६ शेतकऱ्यांचे २११५ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. पंचनामे सुरु असून चार ते पाच दिवसात निश्चित आकडेवारी स्पष्ट होणार आहे.
अहिल्यानगर तालुक्यात तीन महसूल मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. यामहापुरामुळे ४५ गावे बाधित झाले. या गावांमधील शेती, मालमत्ता आणि जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांमध्ये आठ कर्मचारी नियुक्त केले आहेत. उर्वरित गावांमध्ये चार कर्मचारी नियुक्त आहेत. केडगाव, चास आणि वाळकी महसूल मंडळात शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.
त्यामुळे खडकी, अकोळनेर, सारोळा कासार, वाळकी, शिराढोण, चास, सोनेवाडी, हिवरेझरे, घोसपुरी, कामरगाव, पिंपळगाव कौडा, वाटेफळ, गुंडेगाव आदी गावांमधील नदी काठावरील शेतजमिनीत पुराचे पाणी घुसले. या भागात पूर्वी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम विकास अधिकारी (ग्रामसेवक) आणि कृषी सहायक म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांवर हंगामी स्वरूपात पंचनामे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अशी मिळते नुकसान भरपाई
आपत्तीत होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाचे निकष आहेत. या निकषाचा विचार केला तर काही बाबीत नुकसान भरपाई तोकडी आहे. साधारण १२ प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळते. त्यात प्रामुख्याने ३३ टक्के नुकसानीची अट आहे. त्यात जिरायती, बागायती, यासाठी वेगवेगळी नुकसान भरपाई मिळते. आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास ४ लाख, शेती पिकाचे नुकसान झाल्यास पिकांच्या स्थितीवर भरपाई अवलंबून आहे.
जमीन वाहिल्यास ४७ हजार रुपयांपर्यंत हेक्टरी भरपाई मिळते. दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी घर पाण्यात बुडणे, वाहून गेल्यास एका कुटुंबास केवळ २५०० रुपये, घरातील साहित्याचे नुकसान झाल्यास कुटुंबास २५०० रुपये, घराचे पूर्णत: नुकसान झाल्यास घरांसाठी १ लाख २० हजार रुपये, दुर्गम भागातील घरांसाठी १ लाख ३० हजार, तर घरांची अंशत: पडझड झाल्यास ६ हजार ५०० रुपये दिले जातात. जनावरे मृत्यू झाल्यासही फारशी मदत मिळत नाही
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.