
Pune News: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांची १ ऑगस्ट रोजी १०५ वी पुण्यतिथी आहे. त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल, अशी माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. ‘टिमवि’च्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, ‘टिमवि’ ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे या वेळी उपस्थित असतील.
रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नाने लोकचळवळीचे स्वरूप आले, असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले.
ते म्हणाले, ‘लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची २०२५ च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस. एम. जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉ. डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहनसिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला, सुधा मूर्ती आदींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.