Gopalgad Fort : अपरिचित, वैभवकालीन जलदुर्ग गोपालगड

Konkan Tourism : नोव्हेंबर, डिसेंबरनंतर कोकणात पर्यटनासाठी गर्दी वाढू लागते. अथांग, निळसर समुद्राच्या किनारी सफरीसाठी पर्यटक उत्सुक असतात.
Gopalgad Fort
Gopalgad FortAgrowon
Published on
Updated on

Pune News : नोव्हेंबर, डिसेंबरनंतर कोकणात पर्यटनासाठी गर्दी वाढू लागते. अथांग, निळसर समुद्राच्या किनारी सफरीसाठी पर्यटक उत्सुक असतात. काहींना ओढ असते ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य साम्राज्याचे आरमारी वैभव अर्थात जलदुर्ग पाहण्याची. कोकणातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयगड आदी किल्ले लोकप्रिय आहेत.

त्या तुलनेत काहीसा अपरिचित मात्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे गोपालगड. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्याच्या ठिकाणापासून तो सुमारे १५ किलोमीटरवर आहे. अंजनवेल गावाच्या सान्निध्यात असल्याने अंजनवेलचा किल्ला, असेही त्यास म्हणतात.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनाने २० ऑगस्ट २०१६ रोजी अधिसूचनेद्वारे गोपालगड हे प्राचीन ऐतिहासिक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. अर्थात, स्मारक म्हणून त्यास मान्यता मिळावी यासाठी याच परिसरातील अक्षय पवार, डोंबिवली येथील गिरिमित्र संस्था व अन्य इतिहासप्रेमींना चळवळ उभी करून लढा दिला, आज ही जागा स्थानिक व्यक्तीच्या नावे असली तरी स्मारक म्हणून संरक्षण मिळाल्याने त्याच्या अस्तित्वास बाधा पोहोचणार नाही वा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक राहणार आहे.

हा किल्ला आदिलशाह, बहमनी किंवा मराठा यापैकी कोणाच्या राजवटीत बांधला गेला याचे अधिकृत पुरावे नसल्याचे अक्षय सांगतात. तथापि, शासकीय राजपत्रातील माहितीनुसार, विजापूरच्या आदिलशहाने १६ व्या शतकात हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६० मध्ये तो जिंकला.

Gopalgad Fort
Agriculture Warehouse: शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

पुढे सिद्दी खैरातखानने १६९९ मध्ये व पुढे तुळाजी आंग्रे यांनी तो जिंकला. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांनीही किल्ल्यात सुधारणा केल्याचे संदर्भ अक्षय देतात.

अक्षय सांगतात, की किल्ला ज्या खाडीत वसला आहे ते दाभोळ एकेकाळी देशातील श्रीमंत बंदर होते. तेथे जहाजांची रेलचेल असायची. तेथून आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचे. व्यवहारासाठी येथूनच स्थानिक चलनाची निर्मिती व्हायची. आखाती देशापर्यंत ते वापरात होते.

Gopalgad Fort
Agriculture Crisis: शेतीची वाट लागतेच,अभयारण्यांचीही लावू...

किल्ल्याचे वैशिष्ट्य

शत्रूचे आक्रमण झाल्यास त्याला तिथेच थोपवता यावे यासाठी किल्ल्यात मोठा खंदक आहे. ठिकठिकाणी लाल कातळातील बांधीव भक्कम भिंती, पायऱ्या, बुजलेली विहीर, उंच, डेरेदार झाडांनी फुललेली आमराई दृष्टीस पडते. बुरुजाजवळील बाजूच्या तटबंदीच्या उंच भागावरून अथांग निळसर समुद्र, सफरीवरच्या बोटी आणि किनाऱ्यालगत गर्द वृक्षराजीचे बेट हे विलक्षण सुंदर दृश्य स्तंभित करून सोडते.

किल्ल्यापासून जवळच दीपस्तंभ (लाइट हाउस) आणि वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले महादेवाचे मंदिरही मनाला प्रसन्न करून जाते. हे किल्ले केवळ महाराष्ट्राच्या वैभवशाली पाऊलखुणा नव्हेत, तर आपल्या अस्तित्वाचे व रोजच्या जगण्याचे भाग आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपण कायम कटिबद्ध असायला हवे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com