
Raigad News : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका व्हावी, म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. सरपण म्हणून वृक्षांचा वापर कमी व्हावा म्हणून गॅस वापरासाठी विविध सवलती देण्यात आल्या.
दोन वर्षांपूर्वी तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची योजनाही राबवण्यात आली; मात्र आता या सर्व योजना बंद झाल्या आहेत. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने रायगडमधील जवळपास ५० हजार गृहिणींनी घरात गॅस शेगडी असूनही चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात लाकूडफाटा जमवण्याची लगबग सुरू आहे. भल्या पहाटे जंगलात जाऊन महिला पावसाळ्यासाठी सरपणासाठी लाकूडफाटा जमवत आहेत. यामुळे जंगलातील वनसंपदेलाही धोका निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून या महिला जंगलातील लाकूडफाट्याचा वापर चुलीसाठी करीत आहेत.
वृक्षतोडीतून पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांचे आरोग्य सुधारावे म्हणून केंद्र सरकारने ही योजना गावोगावी राबवली होती. गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता देण्यात आले होते. घरगुती गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना गरीब महिलांना प्रत्येक वेळेला मिळणारी सिलिंडरची सवलतही बंद झाली आहे.
मोफत सिलिंडर बंद
सध्या लाडकी बहीण योजनेची तपासणी सुरू आहे. यातील पात्र महिलांनाच तीन मोफत सिलिंडर योजनेचा लाभ मिळू शकेल. सध्याच्या घडीला मोफत सिलिंडरची योजना बंद आहे, अशी माहिती रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली. सुपारी-नारळाच्या बागेची साफसफाईचे काम करणारी महिला घरी परततांना लाकूडफाटा जमा करते. मोलमजुरी करणाऱ्यांना गॅस सिलिंडरची रिफिलिंग परवडत नसल्याने चुलीवर स्वयंपाकाचा मार्ग सोयीचा वाटत असल्याचे कविता पाटील या गृहिणीने सांगितले.
नवीन जोडणी बंद
रायगड जिल्ह्यात ऑगस्ट २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन जोडणी देणे बंद झाले आहे. केंद्र सरकारने ही योजना राबवताना आठ कोटी गॅस जोडणीचे ध्येय दिले होते. केंद्राने ठरवून दिलेली संख्या पूर्ण झाल्याने गॅस कंपन्यांकडून नवीन जोडण्या देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे काही महिलांची इच्छा असूनही नवीन जोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत.
‘उज्ज्वला’ ची ६३ हजार ७८४ गॅस जोडणी
उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल होता. कमीत कमी कागदपत्रांत मोफत शेगडी आणि गॅस सिलिंडर मिळत असल्याने पहिल्या दोन वर्षांत गॅस जोडणीसाठी मोठी मागणी होती. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जवळपास ६३ हजार ७८४ गॅस जोडणी या वेळी करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.