Pune News : घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील धरणे भरत आली आहे. त्यामुळे राज्यातील २ हजार ९९७ धरणांमध्ये ९१६.७५ टीएमसी म्हणजे ६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ३४ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मराठवाड्याला दिलासा देणाऱ्या जायकवाडी धरणांतील पाणीसाठा १५.३१ टक्केपर्यंत पोहोचला आहे. तर पुण्यात झालेल्या दमदार पावसामुळे अखेर उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणाचे १६ दरवाजे उघडले असून भीमा नदीतील विसर्ग १ लाख १६ हजार क्युसेकपर्यंत वाढवला आहे.
गेल्या वर्षी या काळात राज्यातील धरणांमध्ये ५८ टक्के एवढा पाणीसाठा होता. तुलनेत चालू वर्षी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुणे विभागातील ७२० लहान मोठ्या धरणांमध्ये ४३१.८२ टीएमसी म्हणजेच ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. भीमा खोऱ्यातील जवळपास २२ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्याकडून उजनीत येणारे पाणी पुढे भीमा नदीत सोडण्यात येत आहे. तर दुसरीकडे वीर धरणाकडून नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उजनी शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडला आहे.
पंढरपूरसह नदीकाठच्या शंभर गावांत पूरस्थितीची झळ बसत असून पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग कमी करून २१ हजार १७५ क्युसेक, टेमघर १५४८, वरसगाव दहा हजार १०२, पानशेत १० हजार ५००, पवना ५१८०, कासारसाई १३३६, चासकमान ५९७५,
भामा आसखेड ६२ हजार, आंध्रा २१०४, वडीवळे ११२४, गुंजवणी २२७४, भाटघर १४ हजार २३१, नीरा देवघर १० हजार ७७२, वीर ४४ हजार ९३२, येडगाव ३४३७, वडज २३००, डिंभे १५ हजार घोड २८ हजार २२२, चिल्हेवाडी १६९८ क्युसेकने पाण्याच विसर्ग सुरू आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीच्या पात्रात सुरू असलेला १६ हजार क्युसेक विसर्ग कमी करून १२,११५ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा, मुळा, पवना, आरळा, भीमा, भामा, इंद्रायणी, कानंदी, नीरा, कुकडी, मीना, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी, जास्त केला जाऊ शकतो.
कृष्णा खोऱ्यामधील सर्वच धरणे जवळपास भरली आहेत. कोयना धरणामध्ये एकूण ८६.११ टीएमसी म्हणजेच ८१.८१ पाणीसाठा झाला आहे. सद्यःस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू असून धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक आहे.
कोयनातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात येणार आहे. याशिवाय धोम बलकवडीतू १४३९ क्युसेक, धोम ६२२४, कण्हेर ४९३०, उरमोडी ४५६५, तारळी २८९४, वारणा ११ हजार ५८०, कासारी ५७०, तुळशी १५००, राधानगरी ४३५६, दूधगंगा ८५५०, पाटगाव १५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीला करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, उरमोडी, कोयना, वारणा, पंचगंगा, तुळळी, भोगवती, दूधगंगा, वेदगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सध्या कोकणातील १७३ धरणांमध्ये ११५.७० टीएमसी म्हणजेच ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर भातसा धरणांमधून ४९७ क्युसेक, धामणी २४२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला आहे. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, जगबुडी, वशिष्ठी या नद्या भरून वाहत आहेत. नागपूर विभागात मागील काही दिवस जोरदार पाऊस पडला आहे.
सध्या हलका ते मध्यम पाऊस पडत असल्याने धरणांतील पाणीपातळी वाढत आहे. विभागातील ३८३ धरणांमध्ये ११७.९७ टीएमसी म्हणजेच ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पेंच तोतलाडोह धरणांतून १४४३ क्युसेक, इटियाडोह ९५, शिरपूर ७०, गोसी खुर्द ५०३९, इरई १०१, निम्न वर्धा १२५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
अमरावती विभागातील २६४ धरणांमध्ये अवघा ८०.१४ टीएमसी म्हणजेच ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या विभागातील धरणांतील पाणीसाठा अजूनही वाढलेला नाही. सध्या विभागातील ९२० धरणांमध्ये अवघा ५३.१७ टीएमसी म्हणजेच २० टक्के पाणीसाठा झाला असून अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जायकवाडीच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ
नाशिक विभागात पावसाचे प्रमाण कमीअधिक आहे. त्यामुळे काही धरणे भरत आली आहे. सध्या विभागातील ५३७ धरणांमध्ये ११७.९३ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दारणातून १९ हजार २७६, गंगापूर ८१००, भंडारदरा ५१७६, निळवंडे ८१२२, हतनूर ५३,२९० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणांत पाण्याची आवक सुरू झाली असून धरणांतील पाणीपातळी हळूहळू वाढत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.