Sericulture : उचाट बनले जंगल रेशीमचे गाव

कांदाटी खोऱ्यातील उचाट (ता. महाबळेश्‍वर) या गावाने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.
Silk Farming
Silk Farming Agrowon

Silk Farming News सातारा ः कांदाटी खोऱ्यातील उचाट (ता. महाबळेश्‍वर) या गावाने एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वनपरीक्षेत्र, बामणोली यांच्या टसर (वन्य) रेशीम (Silk Farming) शाश्‍वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पांतर्गत ऐन झाडांवर टसर अळी संगोपन, कोष निर्मिती (Silk Cocoon Production) आणि धागानिर्मिती करण्याचा एक अनोखा प्रयोग करण्यास सुरुवात केली होती.

त्यास यश आले आहे. गावातील ऐनाच्या झाडांवर टसर रेशीम अळ्यांनी उत्कृष्टरीत्या रेशीम कोष तयार केले आहेत. त्यामुळे उचाट गावाची आता जंगल रेशीमचे गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील दुर्गम व जंगल भागातील लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत नाही. रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागते. डोंगराळ व वन्य भागांत राहणाऱ्या लोकांच्या शाश्‍वत विकासासाठी टसर (वन्य) रेशीमसारखे अभिनव तंत्रज्ञान विस्तार संज्ञापनाच्या माध्यमातून वापरण्यात आले आहे.

जलव्यवस्थापन, वृक्षसंवर्धनाच्या कृती कार्यक्रमाशी या तंत्राचा मेळ घालून या डोंगराळ भागातील घटकांच्या शाश्‍वत विकासासाठी प्रयत्न केला आहे. जंगल भागात राहणाऱ्या लोकांच्या शाश्‍वत विकासासाठी अभिनव कृषी तंत्रज्ञान म्हणून टसर (वन्य) रेशीमची ओळख आहे.

टसर रेशीम वन्य जीव प्रकल्पाचे निरीक्षक डॉ. योगेश फोंडे यांच्या संशोधनातून सह्याद्रीच्या डोंगररांगांत टसर (वन्य) रेशीम शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा प्रकल्प प्रायोगिक पातळीवर उचाट येथे एक डिसेंबर २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राबविण्यात आला.

त्यात यशस्वीरीत्या रेशीम कोष निर्मिती झाली आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगांतील गावांना शाश्‍वत रोजगाराची नवी दिशा मिळेल.

या प्रकल्पाचा शनिवारी (ता. ४) लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, सह्याद्री व्याघ्र उपसंचालक उत्तम सावंत, एन. एस. लडकत, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिल्लारी, जिल्हा रेशीम अधिकारी पी. एस पाडवी यांच्या उपस्थितीत झाला.

Silk Farming
Silk Farming : तुमच्याकडे नेमकी कोणती पिके घेतात, शेती करतात कशी?

...असा केला प्रयोग

उचाट येथे एक डिसेंबरपासून ऐन वृक्षाच्या एकूण ६२ झाडांवर टसर अळीची अंडीपुंज उबवण करून त्यांचे ५ अवस्थांत संगोपन, संरक्षण व देखभाल करण्यात आली. प्रत्येक दिवशी टसर अळ्यांची वाढ, ऐन वृक्षाची पाने खाद्य म्हणून, भौगोलिक हवामान, तेथील आर्द्रता, वातावरण यांच्या नोंदी ठेवल्या.

अळ्यांच्या अवस्था पूर्ण होताना त्यातील अडचणी - समस्या व पोषक वाढ यांचे निरीक्षण करण्यात आले. २० जानेवारीपासून काही पूर्ण वाढ झालेल्या अळ्यांनी स्वतःभोवती रेशीम धागा विणत ऐन वृक्षांच्या फांद्यांवर उत्कृष्ट कोष निर्मितीपर्यंत अभ्यास केला.

२२ फेब्रुवारीपर्यंत झाडावरील सर्व अळ्यांनी रेशीम कोष निर्मिती करून प्रयोग यशस्वी केला आहे. निवड केलेल्या ऐन वृक्षांवर सुमारे ७ हजार ३५० कोषांची निर्मिती या प्रयोगादरम्यान झाली आहे. म्हणून उचाट गावाला ‘जंगल रेशीमचे गाव’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

Silk Farming
Silk Farming : अंडीपुंजामध्ये मराठवाडा होतोय स्वयंपूर्ण

...यांनी घेतला पुढाकार

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी संजयराव मोरे यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती तसेच ग्रामपंचायत उचाट, स्थानिक महिला बचत गट यांचे सहकार्याने या प्रयोगाची संकल्पना साकारली.

यात सरपंच सुभाष मोरे, ग्रामसेवक मनीषा तारळकर, अविनाश मोरे, विलास मोरे, कृष्णा साळुंखे, किशोर मोरे, अरविंद मोरे, भिकाजी मोरे, गजानन मोरे यांनी सहभाग घेतला आहे.

या प्रयोगासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, वनसंरक्षक एन. एस. लडकत, सह्याद्री व्याघ्रचे उपसंचालक उत्तम सावंत, सुरेश साळोखे, बाळकृष्ण हसबनीस, प्रसाद हिटमुद्दे, सुमीत चौगुले, सौरभ नांगरे, संदीप पवार, प्रवीण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

टसर रेशीमची खास वैशिष्ट्ये...

* सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील गावांमध्ये टसर (वन्य) रेशीम शेती स्थानिकांकडून स्वीकार

* मुबलक प्रमाणात उपलब्ध ऐन झाडांवर टसर रेशीम कोष निर्मिती

* रेशीम कोष निर्मिती, धागा निर्मिती व कापड निर्मितीची उपलब्धता.

* मशागत, पाणी, औषधाची गरज नसलेली शेती

* जंगल भागातील शेतकरी, महिला व युवकांना नावीन्यपूर्ण व शाश्‍वत उद्योग.

* केवळ दोन महिने कालावधीतच रेशीम कोषांची निर्मिती होणार

* वन्यप्राण्यांपासून ऐन झाड व टसर अळीला कोणत्याही प्रकारची इजा नाही

* टसर रेशीम कोष, धागा व कापड उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता मिळेल

* रोजगार हमी योजनेअंतर्गत ऐन झाडांची लागवड शक्य

* पश्‍चिम घाटातील जैवविविधता वाढण्यास मदत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com