
संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद ः गुणवत्तापूर्ण रेशीम कोष उत्पादनात (Silk Cacoon Production) आघाडीवर असलेल्या मराठवाड्याची वाटचाल आता अंडीपुंज उत्पादनात स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू झाली आहे.
त्यासाठी महिको (Mahiko) या बीजोत्पादनात नामांकित कंपनीचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील तीन मोठ्या चॉकीचालकांनी अंडीपुंज जालन्यातून खरेदी करणे हे त्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे.
मराठवाड्यात रेशीम उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. राज्यात जवळपास १२ हजार एकर क्षेत्रावर असलेल्या रेशीमसाठीच्या तुती क्षेत्रापैकी जवळपास ८ हजार एकर क्षेत्र एकट्या मराठवाड्यात आहे.
मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या रेशीम कोषाची कर्नाटकातील रामनगरम या सर्वांत मोठ्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची मोठी पसंती असते.
त्यामुळे मराठवाड्यात व महाराष्ट्रात रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू झाल्यानंतर कर्नाटकसह, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व इतर भागांतील रेशीम कोष खरेदीदार व्यापारी मराठवाड्यात येऊन जालना व इतर बाजारपेठेतून रेशीम कोष खरेदी करताना दिसत आहेत.
रेशीम कोष उत्पादनासाठी लागणाऱ्या अंडीपुंजची गरज कर्नाटकमधील सेंट्रल सिल्क बोर्डच्या केंद्रासह महाराष्ट्रातील गडहिंग्लजच्या केंद्रावर अवलंबून आहे.
उत्पादनात अग्रगण्य असलेल्या मराठवाड्याच्या रेशीम उद्योगाला स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने रेशीम विभागाकडून पावले उचलली जात असतानाच बीज उत्पादनात प्रदीर्घ अनुभव व नावलौकिक असलेल्या महिको कंपनीने रेशीम कोषासाठी लागणाऱ्या अंडीपुंज निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
जालना येथे अद्ययावत अशा अंडीपुंज निर्मिती केंद्राची उभारणी कंपनीने केली आहे. त्यातून पहिल्याच वर्षी जवळपास ३ लाख अंडी पुंज उत्पादन केले असून पुढील वर्षी अंडीपुंज उत्पादनाचे उद्दिष्ट वाढविण्याचे कंपनीने ठरविले आहे.
पहिल्याच वर्षी या अंडीपुंज उत्पादनासाठी लागणाऱ्या कोश उत्पादक शेतकऱ्यांनाही वाव मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास ४० शेतकऱ्यांना अंडीपुंज निर्मितीसाठी लागणाऱ्या रेशीम कोष उत्पादनासाठी निवडून कंपनीने त्यांना किमान १ लाख रुपये प्रतिक्विंटलचा दरही दिला आहे.
त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत झाली आहे. नुकतेच कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील तीन चॉकी रेरिंग सेंटरचालकांनी जवळपास १५००० अंडीपुंज जालना येथील महको कंपनीच्या केंद्रावरून खरेदी करून नेली आहेत.
अत्याधुनिक पद्धतीने व दर्जेदार अंडीपुंज निर्मितीमुळे आपण जालना येथून अंडीपुंज नेण्याला प्राधान्य दिले असल्याची माहिती कर्नाटकमधील हरीश रेड्डी, मोहन रेड्डी व आंध्र प्रदेशमधील सुकुमार रेड्डी या तीन चॉकी चालकांनी दिली.
यापैकी दोन शेतकरी अभियांत्रिकी विषयाचे पदवीधर आहेत हे विशेष. ही अंडीपुंज त्यांना सुपूर्द करतेवेळी महिकोच्या अंडीपुंज निर्मिती केंद्राचे मार्गदर्शक डॉ. सोमी रेड्डी, प्रमुख डॉ. हरी कृष्णा मराठवाडा रेशीम विभागाचे उपसंचालक दिलीप हाके आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद येथेही रेशीम विभागाला अंडीपुंज निर्मिती केंद्र मिळाले आहे. त्यामुळे औरंगाबादचे अंडीपुंज निर्मिती केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर केवळ मराठवाडाच नाही तर महाराष्ट्र राज्यही अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.
कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील तीन मोठ्या चॉकीचालकांनी अंडीपुंज जालन्यातून खरेदी करणे हे मराठवाड्याचे अंडीपुंज स्वयंपूर्णतेच्या दिशेने पाहिले पाऊल आहे.
औरंगाबाद येथील केंद्र सुरू झाल्यानंतर मराठवाडाच नाही तर राज्यही स्वयंपूर्ण व जालना सीड हब होईल.
- दिलीप हाके,
उपसंचालक, रेशीम मराठवाडा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.