
एस. ए. ढोले, डॉ. ए. ए. जोशी
Solar Technology: सौर ड्रायर म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून भाजीपाला, फळे, मसाले, धान्य, औषधी वनस्पती इत्यादी अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने वाळवण्याचे एक आधुनिक साधन आहे. पारंपरिक पद्धतीत भाजीपाला थेट उन्हात वाळवले जातो, ज्यामुळे धूळ, किडे, प्राणी, पाऊस आणि इतर हवामान बदलांमुळे खराब होण्याचा धोका असतो. सौर ड्रायरमध्ये भाजीपाला बंद ट्रेमध्ये ठेवतात.
त्यावर गरम हवा फुंकर दिल्यासारखी सोडली जाते. ही हवा सौर पॅनेलद्वारे मिळालेल्या उष्णतेने तयार होते. यामुळे भाजीपाला स्वच्छपणे व लवकर वाळतो. त्यातील पोषणमूल्य देखील टिकून राहते. सौर ड्रायरचे तापमान ४० अंश सेल्सिअस ते ७० अंश सेल्सिअस दरम्यान ठेवले जाते. हे तापमान भाजीपाला खराब न होता त्यातील ओलावा कमी करण्यासाठी योग्य असते.
सौर ड्रायरचे थेट, अप्रत्यक्ष आणि हायब्रिड असे प्रकार आहेत. हायब्रिड ड्रायरमध्ये सूर्याची उष्णता आणि वीज दोन्हींचा वापर केला जातो, त्यामुळे ढगाळ हवामानातही भाजीपाला वाळवता येतो. सौर ड्रायर वापरण्याचे मुख्य फायदे म्हणजे ऊर्जेची बचत, पोषणतत्त्वांचे संरक्षण, प्रदूषणमुक्त प्रक्रिया, आणि कमीत कमी खर्चात लघुउद्योग सुरू करता येतो. वाळवलेला भाजीपाला जास्त काळ टिकवू शकतो.
मर्यादा
ढगाळ हवामानात सौर ऊर्जा कमी मिळते, त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. काही वेळा सतत आणि मोठ्या प्रमाणात वाळवणीसाठी अतिरिक्त सौर पंखे किंवा वीज लागते.
हिरव्या पालेभाज्यांसाठी सौर ड्रायर
सौर ड्रायर हे हिरव्या पालेभाज्यांसाठी अतिशय प्रभावी व उपयुक्त तंत्रज्ञान आहे. हिरव्या भाज्यांमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे त्या लवकर सडतात, खराब होतात आणि त्यांचे पोषणमूल्यही कमी होते. त्यामुळे सौर ड्रायरमुळे त्या स्वच्छ, नियंत्रित तापमानात आणि लवकर वाळवल्या जातात.
या प्रक्रियेमुळे भाज्यांतील पोषक घटक जसे की जीवनसत्त्व अ, क, लोह आणि तंतूमय घटक चांगल्या प्रकारे टिकून राहतात.
सौर ड्रायरमध्ये भाज्या सुरक्षित पद्धतीने, धूळ आणि प्रदूषणापासून दूर राहून वाळवल्या जातात.
ऊर्जा खर्चात बचत होते, कारण यामध्ये विजेचा वापर नाही.
वाळवलेली हिरवी पालेभाजी ३ ते ६ महिने टिकू शकते, त्यामुळे हंगाम नसतानाही ती वापरता येते आणि बाजारात विक्री करून उत्पन्नही मिळवता येते.
विशेषतः मेथी, पालक, चुकंदराची पाने, कोथिंबीर, अंबाडी व कढीपत्ता यांसारख्या भाज्या सौर ड्रायरमधून वाळविल्यास चव आणि रंग दोन्ही चांगले राहतात.
पोषकद्रव्यांची टिकवण
खनिजे
सौर ड्रायरमध्ये वाळविलेल्या भाज्यांतील पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात टिकून राहतात. कारण हे घटक उष्णतेने फारसे नष्ट होत नाहीत. त्यामुळे या वाळविलेल्या भाज्या खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारी खनिजे सहज मिळतात.
जीवनसत्त्व अ (कॅरोटीन, बीटा-कॅरोटीन)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन असते, जे शरीरात जीवनसत्त्व अ मध्ये बदलते. सौर ड्रायरमध्ये योग्य तापमानात वाळवल्यास याचे प्रमाण सुमारे ५० ते ७० टक्के राहाते. पालक, मेथी, चुकंदराची पाने, अंबाडी, कोथिंबिरीमध्ये बीटा-कॅरोटीन अधिक असते.
जीवनसत्त्व क (अॅस्कॉर्बिक अॅसिड)
हे सर्वांत नाजूक आणि उष्णतेने नष्ट होणारे जीवनसत्त्व आहे. वाळविताना त्याचे प्रमाण फक्त १ ते १४ टक्क्यांपर्यंत टिकते. ब्लांचिंग योग्य पद्धतीने केले आणि तापमान फार जास्त ठेवले नाही, तर त्याचे प्रमाण थोडे अधिक टिकू शकते.
थायमिन, नायसिन, रिबोफ्लाविन (ब गट जीवनसत्त्वे)
ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे ३० ते ७० टक्क्यांपर्यंत टिकतात. उष्णतेमुळे थोडीफार घट होते, पण ती अजूनही शरीरासाठी उपयुक्त असतात.
तंतुमय घटक
वाळवणीमुळे तंतुमय घटकांवर कोणताही परिणाम होत नाही. ते १०० टक्के प्रमाणात टिकतात. तंतुमय घटक पचन सुधारतात. पोट साफ ठेवतात.
फॅट्स
हिरव्या भाज्यांमध्ये फॅट कमी असते, पण जी असते ती जास्त प्रमाणात टिकून राहते. उष्णता त्यावर फारसा परिणाम करत नाही.
यंत्राचे फायदे
सूर्याच्या उष्णतेचा वापर, विजेचा खर्च नाही. गॅस किंवा इंधन लागत नाही.
भाजीपाला स्वच्छ आणि सुरक्षित राहतो. रंग, चव आणि पोषणमूल्य टिकून राहते.
पालेभाजी, फळे, मिरची, कांदा, लसूण वेळेवर वाळवून जास्त काळ टिकवता येतात.
वाळवणी
यंत्र पारदर्शक झाकण असलेले बॉक्स ज्यात सूर्यप्रकाश आत जातो पण बाहेरून संरक्षण मिळते शेतीमाल स्वच्छ, सुरक्षित, कीटक व पक्षी त्रास नाही १०,००० ते ३०,००० रुपये १० ते ५० किलो
ग्रीन हाउस प्रकार ग्रीन हाउससारखी रचना, ज्यात मोठ्या प्रमाणात शेतीमाल एकाच वेळी वाळवता येते मोठे वाळवणी क्षमतेचे क्षेत्र, हवामानाचा फारसा परिणाम नाही. ५०,००० ते १,५०,००० रुपये ५० ते २०० किलो
टेबलटॉप घरगुती व लहान व्यवसायासाठी छोटे, सोपे आणि हलके सौर वाळवणी यंत्र. कमी खर्च, सहज वापरता येते. ५,००० ते १५,००० रुपये १ ते १० किलो
शासकीय योजना
महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था
ही संस्था शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सौर ड्रायर योजना राबवते. या योजनेअंतर्गत, शेतकरी आपले धान्य, फळे, भाज्या, मसाले आणि इतर अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे कोरडे करू शकतात. पारंपरिक पद्धतीत भाजीपाला उन्हात ठेवले जात असल्याने त्यात धूळ, माती, किडे आणि रोगराई होण्याचा धोका असतो. पण सौर ड्रायरमध्ये ते पूर्णपणे बंद आणि स्वच्छ ठिकाणी सुकवले जाते.
ड्रायरमध्ये एक पारदर्शक काचेचे आवरण असते, ज्यामुळे सूर्याची उष्णता आत येते आणि एकसंध तापमान तयार होते. त्या उष्णतेमुळे आत ठेवलेले अन्न हळूहळू आणि स्वच्छ पद्धतीने सुकते. ड्रायरच्या आत हवा फिरविण्यासाठी विशेष पद्धतीने मोकळ्या जागा ठेवलेल्या असतात, त्यामुळे अन्नावर बुरशी येत नाही आणि त्याचा वास, चव व रंग टिकून राहतो.
यंत्रात वापरलेले साहित्य टिकाऊ आणि मजबूत असते. बाहेरची चौकट लोखंडाची (एमएस किंवा एफआरपी) असते. अन्न ठेवण्यासाठी लाकडी किंवा स्टीलच्या जाळीचे ट्रे असतात. वापरण्यात येणारी काच जाडसर (सुमारे ४ मिलिमीटर) आणि अतिशय पारदर्शक असते, जी दीर्घकाळ टिकते.
सौर ड्रायर बसविण्यासाठी सुरुवातीला सुमारे तीस हजार ते दीड लाख रुपये खर्च येतो, हा खर्च ड्रायरचा आकार आणि क्षमतेवर अवलंबून असतो. पण एकदा ड्रायर बसवल्यानंतर त्याला वीज किंवा इंधन लागत नाही, त्यामुळे नंतर कोणताही नियमित खर्च येत नाही. त्यामुळे दीर्घकाळासाठी खर्चात मोठी बचत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.