Cotton Farming : बारा महिलांनी केली कपाशीची यशस्वी गटशेती ; मजूरसमस्येवर शोधले उत्तर

Cotton Group Farming : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील चिंचोली येथील बारा महिला एकत्र येऊन त्यांनी अन्नदाता शेतकरी महिला गट स्थापन केला. त्यातून मागील खरिपात कपाशीची गटशेती आकारास आली. मशागत, पेरणीपासून ते काढणी, वेचणी अगदी विक्रीपर्यंतची सर्व कामे या महिलांनी एकमेकींच्या शेतात केली.
Cotton Farming
Cotton Farming Agrowon
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Women Self Help Group : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील चिंचोली येथील बारा महिला एकत्र येऊन त्यांनी अन्नदाता शेतकरी महिला गट स्थापन केला. त्यातून मागील खरिपात कपाशीची गटशेती आकारास आली. मशागत, पेरणीपासून ते काढणी, वेचणी अगदी विक्रीपर्यंतची सर्व कामे या महिलांनी एकमेकींच्या शेतात केली. वर्षभर श्रमांची देवाणघेवाण होत मजूरसमस्येवर मात केली. उत्कृष्ट व्यवस्थापन करून एकरी उल्लेखनीय उत्पादन व उत्पन्न मिळवले. या यशामुळे महिलांचा शेतीतील आत्मविश्‍वास, हुरूप वाढला. सामाजिक पतही वाढली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातील चिंचोली गाव आहे. पाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक गावांनी भाग घेतला होता. त्यात चिंचोली हे एक गाव आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये या संस्थेच्या माध्यमातून गावात बैठक घेण्यात आली. त्यातून गट शेतीला प्रोत्साहन देण्यात आले. गावातील महिलांना सुधारित तंत्र व्यवस्थापनाच्या माध्यमातून कपाशीची शेती करण्याची संधी या निमित्ताने मिळणार होती. त्या अनुषंगाने संस्थेच्या सहकार्यातून जळगाव जिल्ह्यात तीन दिवस निवासी प्रशिक्षणासाठी गावातील वर्षा वाढेकर, मोनाली जंगले, रेखाताई जंगले यांची निवड झाली. रसायनांचा कमीतकमी वापर, रासायनिक अवशेषमुक्त शेती, शेतीच्या सुधारित पद्धती याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आडसूळ यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशिक्षण संपल्यानंतरही पुढे गावात तज्ज्ञांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या वर्षा वाढेकर व अन्य दोन महिलांनी पुढाकार घेत

Cotton Farming
Paddy Farming : पट्टा पद्धतीच्या भात लागवड तंत्रातून मजूरसमस्येवर मात

गावातील महिलांना कपाशीच्या गटशेतीसाठी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून नऊ महिलांनी या गटशेतीसाठी तयारी दर्शविली. प्रशिक्षण घेतलेल्या तीन व उर्वरित नऊ अशा एकूण बारा महिलांचा अन्नदाता शेतकरी महिला गट त्यातून स्थापन केला. या नऊ महिलांमध्ये ज्योती वाढेकर, सोनाली वाढेकर, सरला लोखंडे, नीता पेंढारे, कमल वाढेकर, दुर्गा पेंढारे, सरला वाढेकर, हिराबाई जंगले, वैशाली वाढेकर यांचा समावेश राहिला.

सुधारित तंत्र पध्दतीचा वापर

गटातील महिला पूर्वी पारंपारिक पद्धतीने कपाशीची शेती करायच्या. मात्र प्रशिक्षणात त्यांना व्यवस्थापनातील अनेक बाबी शिकण्यास मिळाल्या. सुधारित पद्धतीत शेती करून उत्पादन वाढ करण्यास चालना मिळाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतीशाळेत ऑनलाइन पद्धतीने सुधारित बियाण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यातून बियाणे निवड करणे शक्य झाले. जिवाणू संवर्धकांची मार्गदर्शनानुसार बीजप्रक्रिया केली. त्याचे परिणाम पुढे चांगले दिसून आले. बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहिली. आता दरवर्षी बीजप्रक्रिया करण्याचा निर्णय या महिला गटाने घेतला आहे. लागवडीसाठी गादीवाफा (बेड) पद्धतीचा वापर झाला. या तंत्रामुळे पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. पाणी कमी पडल्यास ओलावा टिकून राहण्यास मदत होते. लागवडीसाठी बहुतेक सर्व महिलांनी चार ते साडेचार बाय दीड फूट असे अंतर निवडले.

चिकट सापळ्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केल्याने फवारण्यांची संख्या कमी होऊन किडींवर नियंत्रण मिळविता आले. गटातील महिलांनी कीड नियंत्रणासाठी आपल्या शेतातच निंबोळी अर्क तयार केला. त्याचबरोबर एरंड, करंज, गुळवेल, पपई, लाल कण्हेर, टणटणी आदींच्या पाल्यापासून दशपर्णी अर्कही तयार केले. एका आठवड्याला निंबोळीचा तर पुढील आठवड्याला दशपर्णी अर्क असे फवारणीचे नियोजन केले. त्यातून फवारण्यांवरील खर्च कमी करणे शक्य झाले.

गटशेतीचा फायदा

पूर्वी गटातील महिलांना पारंपरिक पद्धतीत एकरी सात ते आठ

क्विंटलपर्यंत कपाशीचे उत्पादन मिळायचे. आता सुधारित व्यवस्थापनातून फरदडसहित १० क्विंटलच्या पुढे म्हणजे १४ ते कमाल १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. गटाच्या प्रत्येक महिलेचे सरासरी एक एकर ते दोन एकर असे क्षेत्र होते.

बारा महिलांनी मिळून एकूण १७० ते २०० क्विंटलच्या पुढे कपाशीचे उत्पादन घेतले. स्थानिक व्यापाऱ्याने जागेवरच त्याची खरेदी प्रति क्विंटल सातहजार चारशे रुपये दराने केली. गटशेतीतील एकूण उत्पन्न १४ लाख ते सतरा लाखांपर्यंत मिळाले.

गटशेतीतून आम्ही सारे केले शक्य

अलीकडील काळाच शेतीत मजुरांची समस्या गंभीर झाली आहे. मात्र अन्नदाता गटातील महिलांनी गटशेतीतून या समस्येवर उत्तर शोधले. अन्नदाता गटाच्या अध्यक्षा वर्षा वाढेकर यांची पाच एकर शेती आहे. त्यांची पाच एकर शेती आहे. त्या सांगतात, की आम्हा बाराही महिलांना घरच्या सर्व सदस्यांची मदत मिळाली. म्हणूनच पहिल्याच प्रयत्नांत आम्हाला चांगले यश मिळाले. माझे पती ज्ञानेश्‍वर यांनी मुलांना शाळेत सोडणे, शाळेतून त्यांना आणणे. अभ्यास घेणे आणि त्याचबरोबर शेती अशी सर्व कामांमध्ये साथ दिली. वर्षा म्हणाल्या की आजकाल एकट्याने शेती होत नाही. आम्ही जेव्हा

गटशेतीतून कापूस उत्पादन घेऊया असा विचार मांडला त्या वेळी अनेकांनी आमच्यावर टीका केली. तुमच्याकडून हे होणार नाही असे शब्द ऐकवले. पण त्यामुळेच आमच्यातील जिद्द जागी झाली आणि आम्ही करून दाखवायचेच असा निश्‍चय केला.

श्रमांची झाली देवाणघेवाण

वर्षा म्हणाल्या, की मशागत, पेरणीपासून ते काढणी, वेचणी अगदी विक्रीपर्यंतची सर्व कामे एकत्र केली. सर्व जणी एकमेकांच्या शेतात वर्षभर राबलो. बारा महिलांच्या शेतीला लागणारे बियाणे एकत्रितपणे खरेदी केले. त्यासाठी आम्ही जेव्हा कृषी सेवा केंद्रावर गेलो त्या वेळी सर्व महिलांना एकत्र आलेले पाहून संबंधित कृषी सेवा चालकालाही आश्‍चर्य वाटले होते. गटाने बियाणे खरेदी केल्याने प्रति बॅग ५० रुपये अशी दरांत सवलत मिळाली. आम्हाला बीजप्रक्रिया शिकवण्यात आली होती. त्यातून उगवणक्षमतेचे महत्त्व लक्षात आले होते. या पद्धतीतून दुबार पेरणीच्या संकटाचा धोका आम्ही केला. आम्ही बारा महिलांमध्ये प्रत्येकी सहा महिलांचे दोन गट तयार केले. पहिल्या टप्प्यात एक गटाची पेरणी पूर्ण केली. यात एकीच्या शेतावर सर्व महिला पेरणीला जायच्या. बारा महिलांनी तीन दिवसांत १६ एकरांवरील खुरपणीचे काम फत्ते केले. महिलांनी फवारणीमध्येही एकमेकांना मदत केली. कापसाच्या तीन वेचण्यांमध्ये प्रति वेचणी खर्च पूर्वी एकरी पाच हजार रुपयांपर्यंत यायचा. गटशेतीमुळे तो दोन हजार रुपये येऊन एकरी तीन हजार रुपयांची बचत आम्ही केली.

संध्याकाळी दररोज शेतीशाळा

वर्षा सांगतात, की सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी साडेसात वाजता ऑनलाइन पद्धतीची शेतीशाळा असायची. गटातील प्रत्येकीला दररोज त्यात सहभागी होणे शक्य व्हायचे नाही. मात्र मी दररोज शेतीशाळा पूर्ण केली. काही वेळा एकीकडे स्वयंपाक सुरू असायचा. दुसरीकडे मोबाइल बाजूला ठेऊन शेतीशाळेतद्वारे सुरू असलेले मार्गदर्शन मी ग्रहण करीत होते. आठवडाभर संकलित केलेल्या ज्ञानाची मी गटातील अन्य महिलांना पुढे देवाणघेवाण करायचे. येत्या खरिपात आम्ही सर्व महिला गटशेतीतूनच तूर लागवड करणार आहोत. डाळ मिल घेण्याचा आमचा विचार आहे. त्यातून तूरडाळ तयार करून त्याची सामूहिक विक्री करण्याचा मानस असल्याचे वर्षा यांनी सांगितले.

सामूहिकपणे कुट्टी यंत्रणेचा वापर

कपाशीची काढणी जानेवारी अखेरपर्यंत संपली. पिकाच्या अवशेषांची कुट्टी करून त्यांचा शेतात खत म्हणून वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. मग आम्ही महिलांनीच कुट्टी यंत्राची सेवा देणाऱ्या

व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यांनी एकरी १५०० रुपये शुल्क सांगितले होते. मात्र गटातील सर्व महिलांच्या शेतात हे काम मिळणार असल्याने चर्चेद्वारे एकरी १२०० रुपये दराने कुट्टी करून देण्यासाठी संबंधित व्यावसायिक तयार झाला. तिथेही एकरी तीनशे रुपयांची बचत झाल्याचे वर्षा म्हणाल्या.

पुरस्कार सोहळ्याने दिली प्रेरणा

वर्षा म्हणाल्या, की मागील वर्षी पुणे शहरातील बालेवाडी येथे पाणी फाउंडेशनतर्फे पुरस्कार सोहळा झाला होता. त्याला उपस्थित राहून अनेक शेतकरी तसेच महिलांना पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा क्षण अनुभवता आला. त्यातून आपणही एक दिवस असेच कार्य घडवू, व्यासपीठावर जाऊन असे बक्षीस पटकावू अशी प्रेरणा व जिद्द तयार झाली. त्यातूनच गटातील सर्व जणी झपाट्याने कामाला लागलो. यंदाच्या स्पर्धेत तालुक्यातील चार हजार गटांमध्ये आमची निवड झाली. पुढील टप्प्यात राज्यस्तरावर २५ गटांमध्ये आमची निवड झाली. आता येत्या काळात स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र आतापर्यंत केलेल्या आमच्या प्रयत्नांवर आम्ही समाधानी आहोत, असे वर्षा म्हणाल्या. गटशेतीतून वाढलेले उत्पादन, हाती आलेले उत्पन्न यामुळे सर्व महिलांच्या घरचे सदस्यही समाधानी झाले आहेत. प्रगतिशील महिला म्हणून आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तयार झाला आहे. आमचा शेतीतील हुरूप वाढला आहे, असेही वर्षा यांनी सांगितले.

संपर्क ः वर्षा वाढेकर, ८६२४९९०६६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com