
US Economy Slowdown : शूट द मेसेंजर म्हणजे विपरीत घटना, वाईट बातमी घेऊन येणाऱ्या शिपायाचा शिरच्छेद करण्याचा हुकूम देणाऱ्या राजांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात; पण आधुनिक जगातील महान लोकशाही देशात म्हणजे अर्थातच अमेरिकेत देखील असा राजा राज्य करत आहे. त्या राजाचे नाव आहे डोनाल्ड ट्रम्प.
अमेरिकेत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी मागच्या महिन्यात अर्थव्यवस्थेत किती रोजगार तयार झाले याची आकडेवारी ‘ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’ या शासकीय संस्थेतर्फे नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. तशी ती जुलै महिन्यासाठी एक ऑगस्टला प्रसिद्ध केली गेली. ती आकडेवारी अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती मंदावत असल्याचे दाखवत होती. आधीच्या महिन्यांत देखील फार रोजगारनिर्मिती नव्हती.
ट्रम्प यांना प्रश्न पडला, की अमेरिकी अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण धोरणे आखत आहोत, एक मोठे महत्त्वाकांक्षी ‘बिग ब्यूटीफुल बिल’ आपण अमेरिकेच्या काँग्रेसमधून संमत करून घेतले... मला माहीत आहे की अर्थव्यवस्था चांगले काम करत आहे. आणि हा कोणता ब्यूरो सांगत आहे, की रोजगार निर्मिती वाढत नाहीये आणि कमी होतेय...?
अधिकारी / मंत्र्यांच्या बैठकीत ट्रम्प यांनी विचारले, की ही आकडेवारी कोण प्रसिद्ध करते? त्यांना संस्थेचे नाव सांगितल्यावर त्यांनी विचारणा केली, की कोण आहे त्या संस्थेचा प्रमुख? उत्तर आले - एरिका मॅकएंटरफर.
ट्रम्प यांच्या काही सल्लागारांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, की आपण जे उपाय योजित आहोत, त्याची फळे मिळायला अजून एक-दोन महिने लागतील. थोडी सबुरी दाखवावी लागेल. तेवढ्यात अजून एक सल्लागार ट्रम्प यांच्या कानात पुटपुटला, ‘‘सर, त्या एरिका मॅडम बायडेन यांनी नेमलेल्या आहेत.’’
झाले ! ट्रम्प यांचे पित्त खवळले. हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारविरोधी कट-कारस्थानाचा भाग आहे, असा त्यांनी ग्रह करून घेतला. त्यांनी तडकाफडकी एरिका मॅकएंटरफर यांना बडतर्फ करायचा हुकूम दिला आणि त्या आदेशावर सही सुद्धा केली.
अमेरिकेत स्थूल अर्थव्यवस्थेबाबत आकडेवारी गोळा करण्याचे काम जवळपास ‘ऑटोमेटेड मोड’वर नेले गेले आहे. त्यामुळे तिथे मानवी हस्तक्षेपाला फारसा वाव नाही. त्यामुळे संस्थेचा प्रमुख आकडेवारी औपचारिकरीत्या जाहीर करतो एवढेच. हे ट्रम्पसकट सर्वांना माहीत आहे.
हा ट्रम्प आणि एरिका यांच्यातील मुद्दा नाहीये; सिस्टीमचा मुद्दा आहे. आपल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.
‘ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स’च्या प्रमुख पदी जी कोणी नवीन व्यक्ती येईल तिला ट्रम्प यांना पसंतीस उतरेल अशीच आकडेवारी जाहीर करण्याचे प्रचंड दडपण असेल. ती व्यक्ती पहिल्या दिवसापासून बदनाम झालेली असेल.
त्याने जी काही आकडेवारी जाहीर केलेली असेल, ती कितीही खरी असली, तरी ती शिजवलेलीच असणार असा समज अनेकांच्या मनात तयार होणारच होणार. त्यामुळे ‘ब्यूरो ऑफ लेबल स्टॅटिस्टिक्स’ या अनेक दशके कार्यरत असणाऱ्या शासकीय संस्थेची विश्वासार्हताच धुळीस मिळणार आहे. पण आधुनिक राजांना त्याची फिकीर नाही.
अजून एक विरोधाभास. या सगळ्यात अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये हवी तशी रोजगार निर्मिती होत नाहीये आणि अमेरिकी अर्थव्यवस्था मंदावण्याची चिन्हे आहेत. या वस्तुस्थितीवर सार्वजनिक चर्चाच होत नाही.
सर्व हुकुमशहा स्वतःच्या प्रेमात आकंठ बुडालेले (नार्सिसिस्ट) असतात. हुकुमशाही प्रवृत्ती ही राजकीय विचारधारा नाही, तर एक मानसिक रोग आहे. ही मंडळी राष्ट्रप्रेम वगैरे बोलतात, पण ते फक्त स्वतःच्या प्रेमात असतात. ट्रम्प बघा ना. त्यांना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा नको आहेत. कोणी आकडेवारी बनवली यावर जीव घेतील ते.
हुकूमशहा टीका करणाऱ्या व्यक्तींवर खुन्नस काढतो हे माहीत होते; पण त्याची धोरणे त्याला अपेक्षित परिणाम दाखवत नाहीयेत हे दर्शवणाऱ्या वस्तुनिष्ठ, नॉन ह्युमन आकडेवारीवर देखील खुन्नस काढतो, हे ट्रम्प यांनी दाखवून दिले आहे.
हा अमेरिका, ट्रम्प यांच्यापुरता मर्यादीत मुद्दा नाही. तर अधिक मूलभूत गोष्टी यातून अधोरेखित झाल्या आहेत. लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्यासाठी सच्ची आकडेवारी किती महत्त्वाची असते? हुकूमशहा सच्च्या आकडेवारीला का घाबरत असतील? आणि आपल्या भारत देशातील शासकीय आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्था, जाहीर होणारी आकडेवारी यांची विश्वासार्हता कमी होत आहे का? नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर आकडेवारीकडे बघण्याच्या आणि ती प्रसृत करण्याच्या दृष्टिकोनात काय बदल झाला आहे? याबद्दल आपण कधी विचार करणार आहोत?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.