Organic Farming: महिलांच्या हाती खरी सेंद्रिय, शाश्‍वततेची दोरी!

ईशान्येतील सातही राज्ये हवामान बदलास (Climate Change) जास्त संवेदनशील असेल. येत्या दशकामध्ये या राज्यामधून मोठ्या शहरात होणारे स्थलांतर होऊन तेथील ताण कमालीचा वाढू शकतो.
Sustainable Farming
Sustainable FarmingAgrowon

डॉ. नागेश टेकाळे

कोणत्याही कामाला स्थिरता आणायची असेल, तर त्यात महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज असते. हेच ओळखून आसाम राज्याने महिलांना शेती, पूरक व्यवसाय आणि सेंद्रिय उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले आहे. महिलांच्या हाती सेंद्रिय उत्पादनाची दोरी देण्याचे उत्तम परिणाम दिसू लागले आहेत. या वर्षी मॉन्सूनचे (Monsoon) आगमन हेच खोडकर मुलांप्रमाणे अवखळपणे नेहमीची वेळ न पाळता हवामान खात्याचे अंदाज चुकवत झाले. या पहिल्या पावसाने कोकणासारख्या हमखास पावसाच्या पट्ट्यालाही वेठीला धरले, यावरूनच ओळखा. त्याने सर्वांत जास्त कहर केला तो ईशान्येकडील आसाम, मणिपूर या राज्यात.

ईशान्येतील सातही राज्ये हवामान बदलास (Climate Change) जास्त संवेदनशील असेल. येत्या दशकामध्ये या राज्यामधून मोठ्या शहरात होणारे स्थलांतर होऊन तेथील ताण कमालीचा वाढू शकतो. कारण प्रत्येक शहराच्या अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांच्याही काही मर्यादा असतात. त्यावर ताण आला शांतता आणि सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

Sustainable Farming
OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार?

आज आसामच्या (Assam) ३४ दशलक्ष लोकसंख्येपैकी ५ दशलक्ष लोक ब्रह्मपुत्रा, बराक आणि त्यांच्या तब्बल ४० उपनद्यांमुळे विस्थापित झाले आहेत. २५२४ गावे आजही पाण्याखाली असून, २.३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पूर्ण खरीप शेती वाया गेली. बेल्जियममधील एका संशोधन संस्थेने वातावरण बदल आणि नद्यांना येणारे पूर यांचा मागील १२० वर्षांचा अभ्यास (१९०० ते २०२०) नुकताच सादर केला आहे.

या अहवालातील सर्वांत धक्कादायक खुलासा म्हणजे जगामधील महापूरांच्या यादीमध्ये आपल्या देश प्रथम क्रमांकावर आहे. या कालखंडात भारतात तब्बल ३२० महापूर येऊन, मनुष्य हानीसोबतच शेती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले. चीन हा ३१२ महापुरांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Sustainable Farming
Dragon Fruit Cultivation : ड्रॅगन फ्रुटसाठी केंद्राचा पुढाकार

आसाम राज्यामध्ये दोन्ही किनाऱ्यालगत पसरत जाणाऱ्या नद्या आहेत. मात्र त्यांना थोपवणाऱ्या पाणथळ जागा आणि वृक्षांचा अभाव या संकटात वाढ करतो. पाणथळ जागा नद्यांच्या पुरावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाच्या ठरतात. वातावरण बदल, जागतिक तापमानात (Global Warming) होत असलेली वाढ आणि मानवी अतिक्रमण यामुळे आसाममधील हजारो पाणथळ भूमींवर संक्रांत आली आहे. या कोरड्या पडलेल्या जागांवर अनेक ठिकाणी बांधकामे वाढली आहेत. अशा जागा अतिक्रमणमुक्त करून पूर नियंत्रणासाठी वापर करण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र विभाग तयार केला आहे.

शेती व्यवसायात शाश्‍वतेसाठी महिलांना प्रोत्साहनः

आसाममध्ये वातावरण बदलाच्या (Climate Change) प्रक्रियेवर मात करून शेतकऱ्यांना विस्थापित होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या दशकापासून राज्याचा कृषी विभाग, फलोद्यान विभाग, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पारंपरिक पिके, सेंद्रिय शेती (Organic Farming), फळबाग निर्मिती, शेतीपूरक व्यवसाय यातून बाराही महिने शेती हिरवीगार ठेवून उत्पन्नाबरोबरच वाढत्या उष्णतेवर नियंत्रण ठेवण्याकडे कल आहे. या कामात शाश्‍वतता येण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.

१) जोरहाट जिल्ह्यामध्ये ‘नबानीता’ हा सेंद्रिय कृषी उद्योग आहे. कु. नबानीता दास या नर्स म्हणून शासकीय नोकरीत कार्यरत होत्या. मात्र नोकरी सोडून त्या वडिलोपार्जित कृषी व्यवसायात उतरल्या. त्यांनी २०१४ मध्ये फळबागेचे प्रशिक्षण पूर्ण केले. शेतात फळबागेबरोबरच फूल शेती, भात, डाळ वर्गीय व तेल बियांचे उत्पादन घेऊ लागल्या. शेतामध्ये असलेल्या अनेक तळ्यामध्ये मत्स्यपालन, गोपालन, कुक्कुट पालन, शेळीपालन, बदकपालन असे पूरक व्यवसाय सुरू केले. यामुळे त्यांच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली.

फुलशेतीत ॲन्थुरियम, जरबेरा, ग्लॅडिओलस यांचे उत्पादन घेतात. पारंपरिक भाताची सुगंधी वाणे- केतकी, जोहा, कुणकुणी यांचे उत्पादन घेतात. सेंद्रिय काळा भात तर हातोहात विकला जातो. नबानीता म्हणतात, ‘‘पावसाच्या पाण्यावर नियंत्रण ठेवायचे असल्यास जमिनीत कर्ब वाढू द्या. पावसाचे पाणी आपोआप मुरेल. जे पाणी पृष्ठभागावर राहील, त्याला शेततळ्यांचे रुप द्यायचे. शेतीला पशुपालनाची जोड फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने वातावरण बदलाच्या प्रवाहाखालीही आपली शेती सुरक्षित राहू शकते.

नबानीता यांना त्यांच्या कृषी कार्यासाठी २०१८ चा उपराष्ट्रपती पुरस्कार, भात वाणांच्या संवर्धनासाठी आयसीआरआय यांचा २०१८ चा पुरस्कार मिळाला आहे. नबानीता या पूर परिस्थितीमध्येही भात शेती कशी सुरक्षित ठेवता येईल, हे अभ्यासण्यासाठी शासनातर्फे व्हिएतनामला गेल्या होत्या.

२) दीपिका राबा या गोलपारा जिल्ह्यामधील आदिवासी महिला शेतकरी. शहराकडे स्थलांतर करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये राहूनच २०१५ पासून नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या दीपिका यांना २०१८ मध्ये केंद्राचा महिला कृषी पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या १८ एकर शेतीपैकी सात एकरांमध्ये जोहा या सुगंधी भाताची लागवड करतात. येणाऱ्या उत्पादनातील अर्धा भाग त्या विकतात. ६ एकर शेतीमध्ये त्यांनी वर्षभर पुरतील इतक्या भाज्यांची लागवड असते. या भाज्यांची शेतावरच विक्री केली जाते. २ एकरांमध्ये पपई लागवड, तर अर्धा एकरामध्ये वराहपालन असे त्यांचे नियोजन असते.

३) कोकराजहार जिल्ह्यामधील सुचित्रा रॉय यांनी ५ एकर शेतीमध्ये पारंपरिक भात वाण लावतात. दीड एकरावर विविध प्रकारच्या भाज्या असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गावातल्या महिलांना जोडून घेत उभारलेल्या महिला बचत गटामार्फत ‘सुप्रभात’ नावाने अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय करतात. शेतामधील सुगंधी भात, भाजीपाला, मशरूम आणि बटाटा शेती सांभाळत अगरबत्तीचा जोडधंदा करणाऱ्या सुचित्रा यांचा नाबार्डतर्फे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

सेंद्रिय शेतीला चालनाः

रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर, कीड-रोग नियंत्रणासाठी किडनाशके यामुळे भारतीय शेतीच्या वाळवंटीकरण वेगाने होत आहे. वाळवंटीकरण म्हणजे शेतीमधील सेंद्रिय कर्ब, उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होणे, पाणी न थांबणे आणि पोषण न मिळाल्याने पिकाची वाढ, उत्पादनामध्ये घट होणे इ. होय.

मातीचे सुपीक कण वाऱ्याबरोबर सहज उडून जातात, मागे उरते ती केवळ मातीमिश्रित वाळू. वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम अशा जमिनीवरच होतो. येथे सूर्यप्रकाशाचे परावर्तन जास्त होते, हरितगृह वायूमुळे परावर्तित उष्णता वातावरणात अडकून राहते आणि उष्णतेत वाढ होऊ लागते. जिवाणूंच्या कमतरतेमुळे कृषी उत्पादनावर परिणाम होतो. यावर उपाय एकच - सेंद्रिय शेती (Organic Farming).

भूमातेतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पिकांचे अवशेष तिथेच जिरवले पाहिजेत. प्रत्येक राज्याच्या वातावरण बदल अहवालात सेंद्रिय शेती (Organic Farming) व खताला प्राधान्य दिले गेले आहे. मात्र शेणखताची उपलब्धता कमी होत असून, गांडूळ खतास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आसाममधील नलबारी जिल्ह्यामधील कनिका तालुकदार यांनी कृषी विज्ञान केंद्राकडून गांडूळ खतनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले.

२०१४ मध्ये चार बेडचे गांडूळ खत युनिट टाकले. १ किलो गांडूळ मोफत मिळाले. सिमेंटचे हौद बांधण्यासासाठी पैसे नसल्याने प्रथमच बांबूच्या साह्यानेच हौद तयार केले होते. त्यात १७ क्विंटल खताचे उत्पादन घेतले. हळूहळू दहा सिमेंटचे हौद तयार केले. २०१७ मध्ये त्यात १५० क्विंटल गांडूळ खत उत्पादन घेतले. २०१९ मध्ये त्यांचे उत्पादन दुप्पट होऊन सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले.

आज कनिका यांचे ‘जय गांडूळ खत’ आणि ‘जय वर्मिवॉश’ संपूर्ण आसाम राज्यात प्रसिद्ध आहे. राज्य शासनाचे गांडूळ खतनिर्मितीचे परवाना मिळवणारी पहिली महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या गांडूळ खतामुळे शेती, फळबागेचे उत्पादन वाढले. वाळवंटीकरण रोखले गेले. अर्थात, या हवामान बदलाच्या लढ्यात प्रत्येकाचा हातभार गरजेचा असतो. त्यात कनिकासारख्या महिला आपला नक्की उचलत आहेत, हे विशेष.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com