
ॲग्रोवन वृत्तसेवा
Anil Kakodkar : बुलडाणा ः जगभरात अनेक प्रयोग होत असतात आणि त्यातून नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या जातात. मात्र, खऱ्या अर्थाने तो प्रयोग ‘लॅब टू लँड’ आला आणि त्याचा लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला, तरच ते खरे ‘इनोव्हेशन’ मानले जाते, असे परखड मत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या ‘संपूर्ण पशू आहार’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप नाफडे होते. श्री. नाफडे यांच्या नेतृत्वात ही जय सरदार कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी ही देशातील एक नामांकित एफपीओ म्हणून ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या प्रसंगी तीन वेळा कंपनीच्या कार्याचे कौतुक केले आहे. याच कंपनीच्या माध्यमातून आयआयटी मुंबईसोबत ‘कपाशीपासून संपूर्ण पशू आहार’ हा नावीन्यपूर्ण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचा प्रारंभ भोरटेक येथे डॉ. काकोडकर यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंपनीचे सीईओ आशिष नाफडे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. कपाशीच्या पेंढ्याचा उपयोग करून गाय आणि बकऱ्यांसाठी संपूर्ण पशू आहार निर्मितीचा हा प्रकल्प असल्याचे म्हणाले. मुंबई आयआयटीच्या प्रा. मधू विंजामूर, डॉ. सुहास झांबरे, बायफचे डॉ. मनोज आवारे यांनी मागील सात वर्षांपासून यावर केलेल्या प्रयोगांची माहिती दिली. तसेच, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सचिव डॉ. नरेंद्र शहा यांनी या आयोगाच्या योगदानाविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संचालक डॉ. शरद उपाध्ये आणि डॉ. अतुल ढोक यांनी माफसूच्या या प्रकल्पातील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी हा प्रयोग दुग्ध उत्पादक आणि शेळीपालक शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त ठरेल, याची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे आणि आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी जिल्ह्यातील परिस्थिती आणि या प्रयोगाचे महत्त्व विशद केले. कृषी विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांनी प्रकल्पाचा प्रवास उलगडून दाखवला.
अध्यक्ष श्री. नाफडे यांनी कंपनीच्या विविध नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. सुनील चोपडे, जयेश पाटील, प्रमोद पाटील, जयंत होल, प्रवीण चौधरी, निवृत्ती बोरले, किरण चोपडे, प्रवीण राणे, सुभाष इंगळे, बाळकृष्ण फिरके, योगेश पाटील, प्रमोद पारसकर, नामदेव भारंबे, गणेश नारखेडे, अंकुश नागे,
सागर बोरसे, आशिष कांबळे, स्वप्नील चोपडे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.