Agriculture Entrepreneurs : शेतकरी हेच खरे उद्योजक

Entrepreneurship of Farmer : ग्राहकोपयोगी वस्तू-उत्पादने शेतकरी तयार करतात. त्यासाठी ते प्रचंड जोखीम पत्करतात. त्यांच्यात नवकल्पनाशीलता दिसते. उद्यमशीलता तर जन्मापासून आहेच. उद्योजकतेच्या गुणधर्मांमध्ये शेतकरी तंतोतंत फिट बसतो. मग शेतकऱ्यांना उद्योजक का म्हटलं जात नाही?
Farmer
Farmer Agrowon
Published on
Updated on

अच्युत गंगणे

Agriculture Real Entrepreneurs : अर्थव्यवस्थेचा असा एक घटक, जिथे व्यक्ती, कंपनी, संस्था किंवा संस्थांचा समूह समान घटकांचा वापर करून संबंधित उत्पादन किंवा सेवा तयार करतात त्यांना उद्योग म्हटले जाते. ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार ‘उद्योग’ या शब्दाची व्याख्या अशाप्रकारे करण्यात आली आहे.

‘उद्योजक’ या शब्दाचा अर्थ... ‘‘अशी व्यक्ती जी उद्योग चालवते, ज्यात जोखीम घेण्याची क्षमता, नवकल्पनाशीलता, उद्यमशीलता, धैर्य, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आदी साऱ्या गुणधर्मांचा समावेश असतो. या सर्वांची तुलना मी अनेक वेळा शेती आणि शेतकरी यांच्याशी करून पाहतो तेव्हा ‘शेती म्हणजे उद्योग आणि शेतकरी म्हणजे उद्योजक’ असे मला वाटते.

ग्राहकोपयोगी, गरजेच्या, उत्तम वस्तू-उत्पादने शेतकरी तयार करतात. त्यासाठी ते जोखीम घेण्याची प्रचंड क्षमता बाळगतात. त्यांच्यात नवकल्पनाशीलता दिसते. उद्यमशीलता तर जन्मापासून आहेच. संकटांचा सामना करण्याचे प्रचंड धैर्य शेतकऱ्यांमध्ये आहे.

नेतृत्वगुणही अफाट आहेत. मजूर, कृषी निविष्ठा, पुरवठादार, मशिनरी पुरवठादार या सर्वांशी जोडण्याचे अफाट नेतृत्व शेतकऱ्यांत आहे. म्हणजे संघटन कौशल्य आहे. समस्या सोडविण्याची क्षमता आहे. उद्योजकतेच्या गुणधर्मांमध्ये शेतकरी तंतोतंत फिट बसतो. मग त्याला शेतकरी म्हणण्याऐवजी उद्योजक का म्हटलं जात नाही, हा सवाल आहे.

शेतकऱ्यांकडून शेतीमालाच्या भावाच्या अनुषंगाने अनेक चळवळी आंदोलने झाली, आणखीही आंदोलने, मोर्चे, मेळावे, परिषदा सातत्याने चालू असतात. शेतकऱ्यांचा जन्म दरवर्षी आंदोलने करण्यासाठी, शेतात राबण्यासाठी, राबूनही हाती काही लागत नाही म्हणून आत्महत्या करण्यासाठीच झाला आहे की काय, असा प्रश्‍न आपल्याला पडला पाहिजे. ही सर्व परिस्थिती पाहता मी विचार करतो की शेतकरी म्हणजे कोण?

काय आहे शेतकरी आणि त्याचा शेती व्यवसाय? हा देश शेतीप्रधान आहे का? तो किती दिवस कृषिप्रधानच राहणार आहे? शेती उद्योगप्रधान होणार आहे की नाही? बळीराजा, अन्नदाता, पोशिंदा, शेतकरी राजा अशा मोठाल्या पदव्या देऊन किती दिवस केवळ शब्दांनीच त्यांचे उदात्तीकरण केले जाणार आहे?

Farmer
Farmer E-KYC : अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावे

शेतकरी आंदोलनांची भाषा संसदेत, विधान भवनात केली जाते, चर्चाही होते पण ठोस निर्णय मात्र होताना दिसत नाहीत. या उलट औद्योगिक क्षेत्राची भरभराट सुरू आहे. धनदांडग्या उद्योजकांसाठी पूरक धोरणे आखली जातात. त्यांच्या फेवरमध्ये वेगाने निर्णय होतात. असे का होते? या दृष्टिकोनात बदल करायचा असेल तर मुळात शेतकरी आणि शेती वेगळी क्षेत्रे आहेत ही संकल्पना पुसावी लागेल, या निष्कर्षाप्रत मी पोहोचलो आहे.

शेतीकडे पिढ्यान् पिढ्या उपजीविकेचे साधन, म्हणून पहिले गेले. हजारो वर्षांच्या परंपरेत शेतकऱ्यांवर ठरवून केले गेलेले संस्कार म्हणजे तो ‘बळीराजा’ आहे, ‘अन्नदाता’ आहे, जगाचा ‘पोशिंदा’ आहे आदी. शेतकरी ‘उद्योजक’ नाही आणि शेती हा ‘उद्योग’ नाही हे त्याच्या मनात खोलवर बिंबवण्यात आले आहे.

ज्या दिवशी शेतकरी स्वतःला बळीराजा, जगाचा पोशिंदा आदी आहोत असे समजणे सोडून देईल, त्याच्यावर शेकडो वर्षांपासून थोपवले गेलेले हे संस्कार झिडकारून देईल तेव्हाच तो पुढचा टप्पा गाठू शकेल, असे आता स्पष्ट जाणवू लागले आहे. केवळ असा विचार करूनच थांबण्यात अर्थ नाही या निष्कर्षाला येऊन आम्ही मित्रांनी नवीन प्रयोग करण्याचे ठरवले.

हे विचार मनात घोळत असतानाच उसाच्या प्रश्‍नावर परिषद घ्यावी असे ठरवले. या निमित्ताने ऊस शेतकरी आणि ऊस शेती व्यवसायाच्या प्रश्‍नाकडे बघण्याचा जो प्रस्थापित दृष्टिकोन आहे तो, आणि ऊस कारखानदाराचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला हवा, असे मनाशी निश्‍चित केले.

शेतकऱ्यांचे अश्रू, घाम आणि रक्त या गोष्टीचे भांडवल करून सध्या अनेक आंदोलने सुरू आहेत. हमीभाव, एफआरपी, द्विस्तरीय भाव ठरविण्याची पद्धत, मागील थकलेले हप्ते आणि दुधाचा स्निग्धांश इत्यादी गोष्टीवर आधारलेल्या आंदोलनातून शेतकरी हितापेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षेचा वास हल्ली येऊ लागला आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत शेतीच्या बाबतीतील शेती वेगळी आणि उद्योग वेगळा ही परंपरागत धारणाच बदलायला हवी म्हणून आम्ही ऊस परिषदेला केवळ ‘ऊस परिषद’ असे नाव न देता ‘ऊस व्यावसायिक व उद्योजक परिषद’ असे नावीन्यपूर्ण नाव दिले.

Farmer
National Farmer's Day 2023 : देशाचे पंतप्रधान तरीही शेतकऱ्यांचे कैवारी ; कोण होते चौधरी चरणसिंह?

या परिषदेच्या प्रचारासाठी आम्ही पारंपरिक घोषवाक्य न वापरता ‘शिक बाबा शिक व्यापार करायला शिक. तेजीमंदीचा खेळ आता खेळायला शिक.’ आणि ‘बोली लावून ऊस आता विकायला शिक’ अशा घोषणा तयार केल्या. ज्या घोषणा शेतकऱ्यांना देवघेवीच्या जाणिवांचे महत्त्व सांगतात. या परिषदेला मार्गदर्शक म्हणून कोणीही प्रस्थापित किंवा नामांकित नेतृत्व नव्हते, सर्वसाधारणपणे गाव पातळीवर, तालुका पातळीवर वेगवेगळ्या प्रश्‍नांवर आंदोलने करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनीच या परिषदेचे नेतृत्व केले. या परिषदेचे निमंत्रण परिसरातील साखर कारखान्यांनाही देण्यात आले होते.

या परिषदेची भूमिका आगळी-वेगळी होती, या परिषदेमध्ये आम्ही कोण आहोत? ज्यांना आपण साखर कारखानदार समजत आहोत त्यांचं आणि आमचं नेमकं नातं काय? यावर परिषदेतील नेत्यांच्या भाषणांचा फोकस होता. शेतकरी नेत्यांनी साखरेचा उत्पादन खर्च किंवा साखर कारखान्यांच्या उत्पादनांचा खर्च काढत बसण्याऐवजी उसाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, साखर आयुक्त यांच्यासोबत बैठका घ्याव्यात.

कृषिप्रधान संस्कृतीतून उद्योगप्रधान संस्कृतीत प्रवेश करून शेकडो वर्षे उलटून गेली तरी आम्हाला शेतकरी म्हणूनच का संबोधले जाते? आम्ही केवळ रानात राबणारे कास्तकार, शेतकरी किंवा शेतमजूर नसून आम्ही उद्योजक आहोत. उद्योजकता म्हणजे केवळ मालकशाही नसून व्यापक अर्थाने नवनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणारी व्यवस्था असते.

शेती हे मूळ भांडवल, उत्पादनासाठी लागणारी इतर भांडवली गुंतवणूक, श्रम, नैसर्गिक धोका पत्करून शेतीत उसाचे उत्पादन घेतले जाते. हाच ऊस साखर कारखान्यांत प्रक्रियेला नेला जातो, तिथे प्रक्रिया करून साखर अथवा अन्य उपपदार्थ निर्माण केले जातात. थोडक्यात, ऊस लागवड केलेल्या जमिनीपासून ते साखर किंवा उसापासून तयार केली जाणारी अन्य उत्पादने घेईपर्यंत ऊसशेती उद्योग हा एकच उद्योग समजला पाहिजे. त्यातील फायदा तोट्यात शेतकरी आणि साखर कारखानदार भागीदार समजले गेले पाहिजेत, अशी मांडणी या परिषदेत केली गेली.

(लेखक कृषिमूल्य आयोग, महाराष्ट्राचे माजी सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com